भाष्य : खासगी उद्योगांसाठी ‘अवकाश’

pslv
pslv

‘इस्रो’सारख्या अवकाश संशोधनातील आघाडीच्या संस्थेबरोबर काम करणे, त्याची साधनसामग्री आणि इतर माहिती वापरणे, त्याद्वारे जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, यामुळे भारतातील उद्योगधंद्यांना व्यवसायाचे नवे अवकाश आणि नवा आयाम मिळेल. 

‘अवकाशक्षेत्र उद्योगांसाठी खुले’ करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच अवकाशक्षेत्राशी संबंधित या मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयाची दखल घ्यायला हवी. भारतामध्ये IN-SPACe (Indian National Space Promotion and Authorisation Centre) ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र’(आयएन-स्पेस) सुरू करायला मान्यता मिळाली. ही संस्था भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) शाखा असेल. ‘आयएन-स्पेस’ देशाच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये खासगी कंपन्यांना अवकाश उपक्रमात सहभागासाठी प्रोत्साहन देईल, मार्गदर्शन करेल.

आजपर्यंत अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये ‘इस्रो’ने कार्टोसॅट, इन्सॅट, मंगलयान, चांद्रयान, ॲस्ट्रोसॅट असे महत्वाचे एकूण १०९ उपग्रह, स्वदेशी प्रक्षेपण वाहनांची निर्मिती आणि त्याद्वारे प्रक्षेपण, ३१९ परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण अशी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रात खासगी उद्योगांचा सहभाग प्रामुख्याने रॉकेट आणि उपग्रहांच्या घटकांची निर्मिती आणि बनावटीपुरता मर्यादित होता. अनेक संशोधन संस्थांचाही सहभाग असायचा. ‘इस्रो’च्या केंद्रांच्या सहयोगाने मुख्यत्वे हा सहभाग असतो. आता तो व्यापक करण्यासाठी निश्‍चित पावले उचलणे, धोरणे ठरवून त्याद्वारे उद्योगधंद्यांना उत्तेजन यासाठी ‘आयएन-स्पेस’ मार्गदर्शक आणि नियामक म्हणून काम करेल. नवीन केंद्र ‘इस्रो’ आणि खासगी उद्योग यांच्यातील दुवा ठरेल. ‘इस्रो’मधील आणि इतर सर्व साधनसुविधांचा समर्पक वापर करण्याकरीता मार्गदर्शक संहिता आखणे आणि त्याची अंमलबजावणी अशी कामे या संस्थेद्वारे होतील. आजमितीला ३६० अब्ज डॉलर्सच्या जागतिक अवकाश बाजारात भारतीय उद्योगांचा वाटा फक्त ३% आहे. यामध्ये उपग्रह प्रक्षेपणामध्ये २%, तर उपग्रह-आधारित सेवा आणि ग्राउंड-बेस्ड सिस्टमसारखे कार्यक्रम १% आहेत. अवकाश मंत्रालयातर्फे ‘अँट्रिक्‍स’ ही कंपनी ‘इस्रो’च्या व्यावसायिक उपक्रमांची देखभाल करते. ‘अँट्रिक्‍स’तर्फे व्यावसायिक उलाढाल होते. याआधीच अवकाश मंत्रालयाच्या अधिपत्याखाली मार्च २०१९ रोजी ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ (एनएसआयएल) ही कंपनी सुरु केली. ‘इस्त्रो’ची ती व्यावसायिक शाखा आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यावसायिकांसाठी मोठी संधी
उच्च तंत्रज्ञानासह अवकाशाशी संबंधित उपक्रम राबविण्यासाठी भारतीय उद्योगांची क्षमता वाढवणे आणि भारतीय अवकाश कार्यक्रमातून निर्माण होणारी उत्पादने आणि तंत्रज्ञान यांचा प्रचार, प्रसार, व्यावसायिक वापर आणि उपग्रहनिर्मिती, प्रक्षेपण अशा क्षेत्रांमध्ये खासगी उद्योगांना प्रोत्साहन ‘न्यूस्पेस इंडिया’तर्फे मिळेल. जगात अवकाश क्षेत्रामध्ये अनेक खासगी कंपन्या आहेत. जगभरातील अवकाशसंस्थांबरोबर त्या काम करतात. एलोन मस्कच्या ‘स्पेस एक्‍स’सारख्या उपग्रह सोडणाऱ्या कंपन्यांबद्दल आपल्याला माहिती आहेच. आपल्या देशामध्ये जरी अनेक कंपन्या ‘इस्रो’बरोबर कार्यरत असल्या, तरी स्वतंत्रपणे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याही कामे करू शकत नव्हत्या. अवकाश उद्योगांचा आवाका खूप मोठा आहे. उपग्रह, उपग्रह समूह आणि रॉकेट्‌स सोडणे, प्रक्षेपक तयार करणे याशिवाय अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये हवामानाचा अचूक अंदाज, दळणवळण, विमानांचे उड्डाण, ऊर्जा, पर्यावरण, शेती, भूगर्भातील आणि जमिनीवरील पाण्याचे आणि नद्यांचे मोजमाप/नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, अनेक आपत्तींचा अंदाज आणि आपत्तीनिवारण, इ-गव्हर्नन्स, शहरे आणि ग्रामीण भागाचे नियोजन, पर्यावरण आणि प्रदूषण, स्मार्ट शहरांचे नियोजन, मासेमारी, समुद्राचा अभ्यास आणि ब्ल्यू इकॉनॉमी अशा अनेक क्षेत्रांमध्ये होतो. ‘भुवन’ (भारतीय आणि सभोवतातील भूभागाची अनेक प्रकारची माहिती साठवून उपलब्ध करून देणारी प्रणाली), ‘वेदांज’ (Visualization of Earth observation Data and Archival System) (पृथ्वी निरीक्षण), नाविक (NAVIK) भारता  नेव्हिगेशन (अचूक स्थळ वेळ आणि अंतर मोजणारी स्वदेशी) प्रणाली यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो. या सगळ्याबरोबर अवकाश प्रक्षेपण आणि उपग्रह यासाठीची अवजारे, यंत्रे, संवेदके आणि प्रणाली बनवताना वापरलेल्या अनेक नावीन्यपूर्ण पॉलिमर्स, वजनाने हलके मटेरिअल्स, तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणावर दैनंदिन जीवनात करणे अपेक्षित आहे. या अनेक गोष्टी व्यावसायिक पातळीवर करण्यासाठी आता खासगी कंपन्यांना अवकाश मोकळे झाले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेतीपासून वाहतूक, दळणवळण, हवामान, संरक्षण आणि अगदी शहरी विकासापर्यंत जवळपास प्रत्येक क्षेत्राला त्यांचे भविष्यातले धोरण आणि व्यवसाय वाढवण्यासाठी उपग्रह डाटा, प्रतिमा आणि अवकाश तंत्रज्ञानाची आवश्‍यकता आहे. भारतातील वाढती मागणी आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ‘इस्रो’ला सध्याचे आकारमान आणि काम किमान दहापट वाढवावे लागेल. जगभरातील बऱ्याच खासगी कंपन्या हवामान आणि संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित करण्यामध्ये आणि त्याद्वारे उपलब्ध माहितीचा वापर करण्यात व्यग्र आहेत. आपल्या देशात खासगी कंपन्यांनी या उपक्रमांचा ताबा घेतला, तर ‘इस्रो’सारख्या संस्था वैज्ञानिक अभियान राबवून अवकाश संशोधनावर लक्ष केंद्रीत करतील. ‘इस्त्रो’ संशोधन, नवीन तंत्रज्ञान आणि विकास उपक्रम, शोध मोहीम आणि मानवी अंतराळ कार्यक्रम यांसारख्या आव्हानात्मक उपक्रमांकडे अधिक लक्ष देईल. भविष्यातील आव्हाने स्वीकारायला सज्ज होईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘इनस्पेस’ एकल खिडकी
हे सर्व प्रत्यक्षात आणणे तेवढे सोपेदेखील नाही. त्यासाठी अनेक योजना आखल्या जाताहेत. ‘इनस्पेस’ एकल खिडकी (सिंगल विंडो) नोडल एजन्सी म्हणून काम करेल, असे ठरवले आहे. त्यासाठी ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ, तांत्रिक माहिती, भांडवल, सामायिक साधन सुविधा, जागा, सामग्री, तंत्रज्ञान सुलभतेने आणि आवश्‍यकतेप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारल्या जातील. एखाद्या कंपनीला किंवा त्यांच्या समुहाला मदत, कौशल्य लागेल ते ठरवण्यासाठी प्रक्रिया निश्‍चित केल्या जातील. उद्योजकांशी सुसंवादासाठी आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इस्रो-उद्योग इंटरफेस यंत्रणा स्थापित केली जाईल. त्याद्वारे इस्रो गुणवत्ता आणि विश्वासार्हता पडताळणे, दस्तऐवजीकरण, चाचणी प्रक्रिया इत्यादीसाठीही मदत करेल. तंत्रज्ञानातील नवीन प्रक्रियांसाठी प्रस्ताव मागितले जातील. या सगळ्यांमध्ये खूप मोठा माहितीसमूह आणि माहितीसाठा हाताळणे आणि त्यासंबंधी महत्त्वाचे निष्कर्ष वेळेत देणे खूप महत्त्वाचे असल्याने माहितीशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक प्रणाली या सर्व तंत्रज्ञानाचा आणि प्रणालींचा खूप मोठा वाटा असेल. देशामध्ये संगणक आणि माहितीशास्त्राच्या कंपन्या आणि तज्ज्ञ आहेतच. विविध क्षमता असलेल्या आणि एकमेकांना पूरक असे काम करू शकणाऱ्या कंपन्यांचे समूह संयुक्तपणे काम करू शकतील. उत्कृष्ट प्रस्तावांना सरकारकडून काही प्रमाणात निधीही मिळेल. निवडक विज्ञान संस्था आणि खासगी उद्योगांना शोध मोहिमेमध्ये भाग घेता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी या यंत्रणेद्वारे उद्योगांना प्रोत्साहन, उत्तेजन मिळेल. त्यामुळे भविष्यात जागतिक अवकाश उद्योगांत सहभाग वाढवता येईल. आजपर्यंत ‘इस्रो’च्या कार्यकक्षेतील अवकाश क्षेत्र स्वतंत्र उद्योगांसाठी खुले करण्याचे परिणाम दूरगामी असतील. ‘इस्त्रो’ने बनवलेल्या प्रणाली, तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे व्यावसायिकांमार्फत सर्वसामान्यांना होतील. प्रत्येक राज्याला, शहरांना, गावाला आसपासचे पाण्याचे, शेतीचे, हवापाण्याचे, पर्यावरणाचे, जैववैविध्याचे, उद्योगांचे, रस्ते आणि वाहतुकीचे विकासात्मक नियोजन करायला मदत होईल. व्यावसायिकांना उद्योगधंद्याच्या अनेक नवीन संधी आणि आव्हाने उपलब्ध होतील. जमिनीवर पाय घट्ट रोवून नजर दूर आकाशावर स्थिरावण्यासाठी अवकाशात झेप घेण्याची तयारी मात्र करावी लागेल.

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘इस्रो चेअर प्रोफेसर’ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com