पेपरफुटीमुळे 'साफसफाई' गरजेची

अनंत कोळमकर 
मंगळवार, 18 जून 2019

सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्या.

सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्या. त्यावरून हा प्रकार करणारी टोळी प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकून विद्यापीठाला बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे, अशी शंका आहे. या टोळीचा वेळीच बीमोड करण्याची गरज आहे. 

सुमारे दोन दशकांपूर्वी नागपूर विद्यापीठातील बोगस पदवी व गुणपत्रिकेचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे देशभरात विद्यापीठाची नाचक्की झाली. परिणामी नोकरी देणाऱ्या कंपन्या, अन्य विद्यापीठे व परदेशी विद्यापीठे ही नागपूर विद्यापीठाच्या पदवीकडे, गुणपत्रिकेकडे व पर्यायाने तेथील विद्यार्थ्यांकडे संशयाने पाहत होती. हे प्रकरण 1999 मध्ये उघडकीस आले होते. नागपूर विद्यापीठातून 1983मध्ये पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेले अमरावती विद्यापीठ वेगळे झाले होते. म्हणजे नागपूर विद्यापीठातील बोगस पदवी प्रकरणाच्या वेळी अमरावती विद्यापीठाला केवळ 16 वर्षे झाली होती. पण मातृ-विद्यापीठाच्या नालस्तीचे चटके त्या विद्यापीठाला त्या काळात बसले होते. सध्या गाजत असलेले पेपरफुटीचे प्रकरण अमरावती विद्यापीठाला त्याच्या मातृ-विद्यापीठाच्या दिशेने नेत आहे, असे दिसू लागले आहे.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख व सारणी विभागाचे उपकुलसचिव ऋतुराज दशमुखे यांना या प्रकरणाची कुणकुण लागली होती. त्यांनी सिनेट सदस्य अमोल ठाकरे यांच्यासोबत 20 मे रोजी मार्डा मार्गावरील संत अच्युत महाराज हॉस्पिटलजवळ सापळा रचला होता. पण त्यांना यश मिळाले नाही. मात्र त्याच दिवशी मार्डा मार्गावरील गोडे अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर तेथील परीक्षा सहअधिकारी प्रा. अनंत बोंबटकर यांनी एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले. ती कॉपी पाहिली असता त्यांना धक्का बसला. प्रश्‍नपत्रिकेत असलेले प्रश्‍न व त्या प्रश्‍नांची त्याच क्रमाने उत्तरे त्याच्या मोबाईलमध्ये होती. त्यावरून या प्रकरणाचे गांभीर्य या सहअधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी केवळ कॉपीचे प्रकरण असे नोंद न करता त्याची माहिती दशमुखे यांना दिली.

दुसऱ्याच दिवशी इंजिनिअरिंग मेकॅनिक्‍स या विषयातील अशीच कॉपी बडनेऱ्याच्या प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात पकडण्यात आली. तेथील परीक्षा सहकेंद्रअधिकारी प्रा. व्ही. यू. काळे यांनीही ही बाब परीक्षा नियंत्रकांना कळविली. लगेच ते दशमुखे यांना घेऊन परीक्षा केंद्रावर पोचले व तपास सुरू केला. दोन्ही प्रकरणांत ज्या विद्यार्थ्यांना पकडण्यात आले, त्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. त्यात असलेल्या प्रश्‍नपत्रिका व प्रत्यक्षातील प्रश्‍नपत्रिका सारख्याच होत्या. 

खबरदारी घेऊनही पेपर फुटले 
आता प्रश्‍न असा होता, इतकी सुरक्षा व्यवस्था केल्यानंतरही प्रश्नपत्रिका कशी फुटली? विद्यापीठातून ती फुटणे शक्‍य आहे काय? खरे तर प्रश्‍नपत्रिका एका विशिष्ट प्रक्रियेतून सारणी विभागाचे उपकुलसचिव ऋतुराज दशमुखे यांच्या कस्टडीत येते. केंद्र अधिकाऱ्यांच्या "आयडी'वर प्रश्नपत्रिका अपलोड करण्याची जबाबदारी दशमुखे यांची असते. सर्व परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या सारणी विभागातून एकाच वेळी अपलोड करण्यात येते. ती प्रश्नपत्रिका केव्हाही अपलोड केली, तरीही ती पेपर ज्या दिवशी आहे, त्या पेपरच्या वेळेच्या दीड तास अगोदरच केंद्रअधिकारी ती उघडू शकतो. त्याअगोदर ती उघडलीच जात नाही. विशेष म्हणजे प्रश्नपत्रिकेची फाइल स्वतः दशमुखे यांनाही उघडता येत नाही. ही प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्र असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्राधिकारी यांच्या पासवर्डशिवाय ओपन होत नाही. प्रत्येक परीक्षेच्या वेळी हा पासवर्डही बदलला जातो. पेपरच्या दीड तास आधी ही प्रश्‍नपत्रिका डाउनलोड करण्याची जबाबदारी केंद्र अधिकारी व सहायक केंद्र अधिकारी यांची असते. एवढी मजबूत सुरक्षा यंत्रणा असतानाही प्रश्‍नपत्रिकेला पाय फुटलेच. 

अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा 
तपासाने गती घेतल्यानंतर जे उघडकीस आले ते धक्कादायक होते. या चौकशीतून परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा धूर्तपणा, धंदेवाईक कोचिंग क्‍लासेसशी असलेले लागेबांधे उघड झाले. या प्रकरणाची सुरवात झाली वाशीमच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून. या परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख व सहअधिकारी यांनी स्वतःच्या जबाबदारीचे भान ठेवले नाही. त्यांनी प्रश्‍नपत्रिका डाउनलोड करण्याचे काम स्वतः न करता ती जबाबदारी एका कर्मचाऱ्याकडे सोपवली. त्याने प्रश्‍नपत्रिका डाउनलोड करताच ती त्याच्या एका सहकाऱ्याकडे पाठवली. त्याने ती एका कोचिंग क्‍लासच्या संचालकाला दिली आणि मग त्या प्रश्‍नपत्रिकेचा बाजार सुरू झाला. या पद्धतीने मॅथेमॅटिक्‍स, नेटवर्क्‍स ऍनेलिसिस, इंजिनिअरिंग केमिकल व इंजिनिअरिंग मेकॅनिक्‍स अशा चार विषयांच्या प्रश्नपत्रिका बाजारात विकल्या गेल्या. 

प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे 
खरे तर कोणत्याही यंत्रणेला सर्वाधिक धोका बाहेरच्यांपेक्षा घरभेद्यांचा अधिक असतो. विद्यापीठाने मजबूत सुरक्षा यंत्रणा उभारली. पण त्याला सुरुंग लावला परीक्षा केंद्राचे अधिकारी, महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख, उपकुलसचिव ऋतुराज दशमुखे व काही प्राध्यापक यांनी दक्षता दाखवली. पण विद्यापीठाची सारी यंत्रणा त्यांच्यासारखीच दक्ष व जबाबदारीचे भान ठेवणारी असेल, अशी अपेक्षा बाळगणे धाडसाचे होईल. एखाद्या परीक्षा केंद्राचे अधिकारी, कर्मचारी वा कोचिंग क्‍लासेसचे संचालक, विद्यार्थी ही या कटातील छोटी प्यादी आहेत. इतकी मजबूत सुरक्षा यंत्रणा अक्कलहुशारीने भेदण्याचे कसब या प्याद्यांमध्ये आहे, हे कुणीही मान्य करणार नाही. त्यामुळे या प्रकरणातील मोठे मासे गळाला लागले पाहिजेत. संत गाडगेबाबांच्या हाती सतत झाडू असायचा व कुठेही घाण दिसली की ती ते अगोदर साफ करायचे. त्यांचे नाव लावणाऱ्या अमरावती विद्यापीठातील ही घाण तातडीने साफ करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Issues of Amravati University written by Anant Kolamkar