आता वेळ आली पावसाला 'पड रे पाण्या' म्हणण्याची

डॉ. श्रीरंग गायकवाड
गुरुवार, 27 जून 2019

आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी...' अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे.

आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी...' अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे. 

यंदाच्या उन्हाळ्याने महाराष्ट्राला भाजून काढले. एरवी दुष्काळाच्या झळांपासून दूर असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रालाही चारा-पाण्याची मोठी टंचाई जाणवली. उन्हाळ्याच्या शेवटी येणाऱ्या वळवाच्या पावसानेही पाठ फिरवली. त्यामुळे शेतात नांगरून पडलेली ढेकळेही विरघळली नाहीत. मशागत आणि पेरणी दूरच. पण, संत तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालख्यांच्या स्वागताला का होईना पावसाने सलामी दिली आणि शेतकरी-वारकऱ्यांच्या मनाला आशेचे कोंब फुटले आहेत. 

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या "वायू' नावाच्या चक्रीवादळाने मॉन्सूनची वाट अडवली. त्यामुळे साधारणपणे 7 जूनपर्यंत तळकोकणात, 10 जूनपर्यंत पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मॉन्सून व्यापतो. मात्र, यंदा 20 जूननंतरही आभाळ कोरडेच राहिले. रविवारी राज्याच्या 80 टक्के भागात मोसमी वारे दाखल झाले. दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा या दुष्काळग्रस्त भागातही पावसाचे आगमन झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन दिवसांमध्ये आणि 27 जूनपर्यंत मुंबई, पुणे, नाशिकसह मोसमी पाऊस सर्वत्र पोचणार आहे. 

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, तर तो शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच सुखकारक असेल. कारण, पाणी मुबलक असणाऱ्या कोल्हापूरसारख्या परिसरालाही यंदा चांगलीच पाणीटंचाई जाणवली. राधानगरी धरणाने तळ गाठला. मृत साठ्यावर कशीबशी पिण्याच्या पाण्याची तहान भागत आहे. हीच परिस्थिती अन्य धरणांचीही आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 87 टीएमसी पाणीसाठा होतो. पैकी सध्या 8 टीएमसी साठा शिल्लक आहे. पिण्यासाठी हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल. त्यानंतर पावसावरच हवाला असेल. यंदा तुलनेने तापमान जास्त असल्याने पाण्याचे बाष्पीभवन झाले. वळवाचा पाऊस झाला नसल्याने पाण्याची मागणी वाढली. 

कोकण किनारपट्टीलाही यंदा पाणीटंचाईने सतावले. तिथे गंभीरपणे पाण्याच्या प्रश्नाचा विचार करावा लागेल. सांगलीतील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यातून सांगली जिल्ह्यात 67 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 64 सुरू आहेत. 40 हजारांच्या आसपास जनावरे या छावण्यांमध्ये आहेत. चार लाख लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो, तर 70 हजार जनावरेही टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. प्रत्येक जनावराला सरकार 35 लिटर पाणी देत आहे. 
या उन्हाळ्यात साताऱ्यातील जवळपास सव्वासातशे तलाव कोरडे पडले होते. नेहमीप्रमाणे माण, खटाव तालुक्‍यांना चटके सहन करावे लागले. 

सोलापूर शहराला एक आठवड्याने पिण्याचे पाणी मिळते आहे. तेथे पाणीपुरवठा करणारे उजनी धरण गेल्या वर्षी 100 टक्के भरले होते. या महिन्यात उजनीतील पाणीसाठा उणे 35 टक्‍क्‍यांच्या खाली गेला आहे. 

गेल्या आठवड्यात "सकाळ'च्या कोल्हापूर कार्यालयात आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांनी दुबार पेरण्यांचे संकट टाळण्यासाठी पेरण्यांची घाई करू नये, पावसाची वाट पाहावी, असा सल्ला दिला. खतसाठा पुरेसा असल्याचीही ग्वाही दिली. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना बियाणे मिळाली नव्हती. दुसरीकडे, पीककर्जासाठी बॅंकांनी अडवणूक करणे, हीसुद्धा चिंतेची बाब. 

राज्यात पेरणीखालील क्षेत्र 208 लाख हेक्‍टर आहे. त्यात 55 ते 60 टक्के क्षेत्रावर सोयाबीन आणि कापूस, 15 टक्के क्षेत्रावर भात, 11 टक्के क्षेत्रावर ऊस आणि बाकी क्षेत्रावर उडीद, तूर अशी पिके घेतली जातात. गेल्या वर्षी 73 टक्के पाऊस पडला. त्यामुळे 11 कोटी 50 लाख टन उत्पादन मिळाले. यंदा पावसाने ताण दिल्यास या उत्पादनात घट होऊ शकते. 

शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. टंचाईनिवारणासाठी सरकारने दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात. पाण्यावर गुंतवणूक करायला हवी. त्यासाठी ठिबक सिंचनावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

र. वा. दिघे त्यांच्या "पड रे पाण्या' या कादंबरीत सध्याच्या परिस्थितीचे आणि शेतकऱ्यांच्या मनोवस्थेचे समर्पक चित्रण केले आहे. त्यातील कवितेत ते म्हणतात, 

पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी 

शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी.. 

बघ नांगरलं नांगरलं, कुळवून वज केली, 

सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली... 

तापली धरणी, पोळले चरणी मी अनवाणी, 

पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी... 

वारीला निघालेला महाराष्ट्र हीच प्रार्थना पाऊस आणि माउलींकडे करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about It is the time to request the rain written by Dr Shrirang Gaikwad