नाममुद्रा :  तडफदार नि धीरोदात्त

प्रसाद इनामदार
Saturday, 24 October 2020

वयाच्या २८व्या वर्षी २००८ मध्ये त्या संसदसदस्य म्हणून निवडून आल्या आणि राजकीय व सामाजिक व्यासपीठांवर त्यांचा वावर वाढला. अवघ्या ३७व्या वर्षी त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा बाजी मारली. त्यांच्या उदारमतवादी मजूर पक्षाला ४९ टक्के मते मिळाली. ‘कोरोना’मुळे संपूर्ण जग ग्रासलेले असताना अर्डर्न यांनी सात- आठ महिने तडफेने काम करून ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. पन्नास लाख लोकसंख्येच्या न्यूझीलंडमध्ये ‘कोरोना’मुळे फक्त २५ बळी गेले. हे अर्डर्न यांच्या नियोजनबद्ध उपायांचे यश.त्यांनी तातडीने रुग्णशोधमोहीम हाती घेऊन त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू केले. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा हे सूत्र राबविले आणि हेच नागरिकांना भावले. सद्यःस्थितीत न्यूझीलंड ‘कोरोना’मुक्त बनला आहे. ‘कोरोना’च्या आधीही ख्राईस्टचर्चमधील दहशतवादी हल्ला आणि नैसर्गिक आपत्ती यांचा खंबीरपणे सामना करताना अर्डर्न यांनी ‘नेशन फर्स्ट’ हे कृतीतून दाखवून दिले. न्यूझीलंडसारख्या देशाच्या प्रमुख म्हणून त्या २०१८ मध्ये जागतिक पातळीवर प्रकाशझोतात आल्या. त्या वर्षीच्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी त्या केवळ तीन महिन्यांच्या तान्हुल्यासह आल्या होत्या. तो प्रसंग महिलांच्या राजकारणातील  प्रवेशासाठी कमालीचा प्रेरणादायी ठरला. त्यावेळचे त्यांचे भाषणही गाजले.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

`जगात केवळ पाच टक्के महिला नेत्या सत्तेत पदावर आहेत. त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे,’ ही संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया या प्रसंगाचे महत्त्व स्पष्ट करून गेली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चाळीस वर्षीय अर्डर्न यांनी पदवीनंतर तत्कालीन पंतप्रधान हेलेन क्‍लर्क यांच्या कार्यालयात संशोधक म्हणून काम सुरू केले. त्यानंतर लंडनमध्ये काम करताना त्यांची आंतरराष्ट्रीय युवा समाजवादी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. वयाच्या २८व्या वर्षी २००८ मध्ये त्या संसदसदस्य म्हणून निवडून आल्या आणि राजकीय व सामाजिक व्यासपीठांवर त्यांचा वावर वाढला. अवघ्या ३७व्या वर्षी त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या. आता दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या अर्डर्न यांच्यापुढे मंदीची लाट, दारिद्रय निर्मूलन आणि रोजगारनिर्मिती ही आव्हाने आहेत. देशवासीयांचा विश्‍वास त्या सार्थ ठरवतील यात शंका नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about New Zealand Prime Minister Jacinda Ardern