esakal | भाष्य : अँड अवॉर्ड गोज टू...
sakal

बोलून बातमी शोधा

hollywood

कलांचे आणि कलावंतांचे मूल्यमापन याचा निकष केवळ गुणात्मकता आणि दर्जेदार सादरीकरण, हा असायला हवा. ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी निवड करण्याच्या निकषांबाबत अकादमीने तयार केलेल्या नव्या नियमांमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 

भाष्य : अँड अवॉर्ड गोज टू...

sakal_logo
By
डॉ. केशव साठये

‘अँड अवॉर्ड  गोज टू...’ हे वाक्‍य पूर्ण ऐकण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यातील एका  सोमवारी सकाळी भारतातल्या लाखो घरांतील टीव्ही संचावर  रसिकांचे कान लागलेले आणि डोळे खिळलेले असतात.  त्याचे कारणही तेवढे तगडे असते, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेला आणि जगातल्या सिनेविश्वाला भुरळ घालणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहोळ्याचे थेट प्रक्षेपण. ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट्‌स अँड सायन्सेस’ यांच्या वतीने आयोजित केला जात असलेला आणि ९० वर्षांचा देदीप्यमान वारसा असलेला हा अकादमी पुरस्कार सोहळा २०२४ पासून मात्र एक नवे वळण घेणार आहे आणि त्यामुळे हॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या गटात पुरस्कार मिळवण्यासाठी काही नवे नियम अकादमीने तयार केले आहेत. चित्रपट उद्योगात समाजातील सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळावे, या हेतूने हे नियम तयार केल्याचे सांगितले जात आहे. नियमानुसार किमान दोन निकष आम्ही पूर्ण करत आहोत, असे प्रमाणपत्र ९४व्या आणि ९५व्या ऑस्करसाठी म्हणजेच पुढील दोन वर्षांसाठी स्पर्धकांना भरून द्यावे लागणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजवणी मात्र २०२४ मधील ९६व्या ऑस्करपासून सुरू होणार आहे 

विकसनशील देशातील, प्रांतातील व्यक्ती, भिन्नलिंगी व्यक्ती,(एलजीबीटी)स्त्रिया, अपंग अशांना चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत आणि पुढेही विपणन, वितरणसारख्या क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी चार नियम केले आहेत.  त्यातील दोन नियमांची पूर्तता करणारा चित्रपटच `उत्कृष्ट चित्रपट’ या गटातील पुरस्कारासाठी पात्र ठरेल. या घोषणेमुळे कलेच्या क्षेत्रात आरक्षणांनी असा शिरकाव करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण होतो. साहित्य, नाटक, चित्रकला, संगीत आणि सिनेमा या क्षेत्रांना केवळ प्रतिभा, प्रज्ञा यांना स्थान आहे. कलावंतांच्या मूल्यमापनाचा निकष केवळ गुणवत्ता व दर्जेदार सादरीकरण हा असायला हवा. व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘डिसायपल’ या चित्रपटासाठी चैतन्य ताम्हाणे या मराठमोळ्या दिग्दर्शकाला नुकताच मिळालेला सन्मान हे तत्त्व अधोरेखित करते. कलावंत विशिष्ट प्रांतातला, मागास भागातला यावर पारितोषिके ठरवली गेली तर सृजनांचा महोत्सव झाकोळून जाईल. हॉलिवूडचा इतिहास पाहिला तर कृष्णवर्णीय कलावंतांना अमेरिकेतील चित्रपटसृष्टीत पूर्वी डावलले जात होते, हे खरे आहे; पण त्याचे कारण वंशभेद होते,असे मानता येणार नाही. एकूण नागरिकांत कृष्णवर्णीय नागरिकांचे त्यावेळी असलेले अल्प प्रमाण आणि त्यामुळे बहुसंख्य अमेरिकी प्रेक्षकांना आपले वाटतील, अशा कलाकारांना पसंती हा व्यावसायिक दृष्टिकोन त्यामागे दिसतो. अर्थात त्यामुळे पुरस्कारांचे प्रमाणही अत्यल्प राहिले. तीन हजार सन्मानांपैकी जेमतेम ५० पुरस्कार कृष्णवर्णीय कलाकारांना मिळाले होते. पण गेल्या आठ-दहा वर्षात ही स्थिती बदललेली दिसते. पुरस्कारप्राप्त आणि नामांकनाच्या यादीतही ही मंडळी आता दिसतात. हॉलिवूडवर केला जाणारा आरोप म्हणजे कृष्णवर्णीयांना नोकर, सहायक अशा दुय्यम भूमिका दिल्या जातात. ‘गॉन विथ द विंड’साठी पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवणारी अमेरिकी कलाकार, हॅती मॅकडॅनिअल हिची यासंदर्भातील प्रतिक्रिया बोलकी आहे. ती म्हणते ‘प्रत्यक्षात तसे काम करण्यापेक्षा पडद्यावर हे काम करणे अधिक सोपे आहे’, अशा विदारक सामाजिक परिस्थितीत ऑस्करची वाट कृष्णवर्णीयांसाठी त्यावेळी किती कठीण होती, हे लक्षात येते. या तिच्या पुरस्कारापर्यंत फक्त श्वेतवर्णीयांना या सोहोळ्याला प्रवेश होता. हिला प्रवेश मिळाला; पण मागच्या बाकावर बसवले गेले हेही खरे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑस्कर आणि वाद 
ऑस्कर आणि वाद ही परंपरा जुनी आहे. मार्लन ब्रॅंडोने ‘गॉडफादर’साठी मिळालेला पुरस्कार घेण्यासाठी न जाण्याचा निर्णय आणि लिहून पाठवलेले भाषण गाजले होते. कृष्णवर्णीय मंडळीना डावलले जात असल्याचे झालेले आरोप, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या व्यासपीठावरून झालेली टीका अशा अनेक घटनांमुळे हा सोहोळा चर्चेत राहिला. हॉलिवूडमध्ये गाजलेल्या मंडळीनी मोठ्या संघर्षाला तोंड देत कलांची जोपासना केली. चार्ली चाप्लीनपासून ते लिओनारदो दिक्‍याप्रिओपर्यंत अनेकांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत हॉलिवूड सर केले. सिडने पॉयशर, मॉर्गन फ्रीमन ,विल स्मिथ, डेन्झेल वाशिंग्टन, हॅले बेली या कृष्णवर्णीय मंडळीनी ऑस्करमध्ये अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवून दाखवले आहे. कुठल्याही घराणेशाहीशिवाय/ कौटुंबिक इतिहासाशिवाय हॉलिवूडमध्ये यश मिळवलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या नवीन नियमांची खरंच आवश्‍यकता आहे का? ऑस्कर पुरस्काराचा तोंडावळा हा अमेरिकी आहे. त्यातील सहभागाच्या मूळ अटी वाचल्यानंतर ते लक्षात येते. अशा स्थितीत नियमांचा आलेला हा नवा फतवा निर्माते, दिग्दर्शक, स्टुडिओ यांना अडचणीचा ठरु शकतो. याचे थेट परिणाम निर्मितीप्रक्रियेवर आणि सिनेमांच्या दर्जावर होऊ शकतात. यापेक्षा सध्या सुचवलेल्या निकषांना पूर्ण करणाऱ्या चित्रपटाला विशेष पुरस्कार देता येईल. ‘सर्वसमावेशक चित्रपट’ म्हणून याचा सन्मान होऊ शकतो. सध्या २४ प्रमुख गटात पुरस्कार दिले जातात. एकाची भर पडल्याने फारसे बिघडणार नाही.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉबिंगचे प्रकार
अर्थात ऑस्कर पुरस्कार मिळवणे हे केवळ चित्रपटाच्या अंगभूत दर्जावर अवलंबून नसते, तर त्यासाठी तुम्ही किती लॉबिंग केले यावरही चित्रपटाचे यश ठरताना आपण पाहतो. सध्या आठ हजारांहून अधिकजण ऑस्करच्या  विविध विभागातील मतदार आहेत. चित्रपटसृष्टीतील जाणकार, लेखक, समीक्षक अशांचा त्यात समावेश असतो. त्यांच्यापर्यंत पोहोचून ‘आपला चित्रपट कसा श्रेष्ठ आहे आणि याला ऑस्कर मिळणे, हा ऑस्कर पुरस्काराचा कसा सन्मान आहे’ हे जे पटवून देऊ शकतात, त्यांना ऑस्करची बाहुली मिळण्याची शक्‍यता वाढते. लाखो, कोट्यवधी डॉलर खर्च करुन लॉबिंग करणे, ही ऑस्कर पुरस्कारासाठीची अघोषित गरज झाली आहे. यात जे कमी पडतात त्यांच्यावर चित्रपट चांगला असूनही अन्याय होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या खर्चिक प्रथा बंद करण्यावर आणि या पी.आर.मोहिमेला प्रतिबंध घालण्यावर अकादमीने भर देऊन संधीची समानता या तत्त्वाची बूज राखावी.  या सर्व गुणदोषांसहित ऑस्करची तकाकी टिकून आहे ती तिच्या चांगल्या अर्थाने अंगिकारलेल्या काही व्यावसायिक मूल्यांमुळे. सामाजिक बांधिलकीची सक्ती त्याला तडा देण्याचा धोका आहे. समाजकल्याण हवेच; पण सांस्कृतिक विभागाला ओढूनताणून समाजकल्याण विभागाच्या दावणीला बांधणे, हे केवळ अव्यवहार्य नाही, तर कलात्मकतेला आणि अभिव्यक्तीलाही बाधा आणणारे आहे.