esakal | रजनीकांत यांचा फक्त चेहरा!
sakal

बोलून बातमी शोधा

रजनीकांत यांचा फक्त चेहरा!

रजनीकांत यांच्या राजकारणप्रवेशासाठी भाजप व संघपरिवाराचे प्रयत्न चालू होते. त्यांचे मन वळविण्यासाठी संघाचे चेन्नईमधील एक प्रमुख नेते एस. गुरुमूर्ती प्रयत्नशील होते.

रजनीकांत यांचा फक्त चेहरा!

sakal_logo
By
अनंत बागाईतकर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुपरस्टार रजनीकांत यांनी सक्रिय राजकारण प्रवेशाची घोषणा केल्याने तमिळनाडूचे राजकारण रंगतदार होणार आहे. त्यांच्या या घोषणेमागे भाजपचे प्रोत्साहन आहे, हे निर्विवाद. द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांवर भरवसा नसल्यानेच भाजप नेतृत्वाने रजनीकांत यांना पुढे करण्याची खेळी केली. 

‘चांदोबा’मधील जादुई गोष्टींमध्ये एक गोष्ट हमखास असायची, की अमुक एकाचे शरीर, पण आत्मा दुसऱ्याचा! किंवा परकाया प्रवेशाच्या गोष्टीही ऐकण्या-वाचण्यातल्या आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या असेच काहीसे जादूचे खेळ सुरू झाले आहेत. इतके दिवस ‘ना ना’ करणारे सुपरस्टार रजनीकांत यांना अचानक उपरती झाली आणि त्यांनी सक्रिय राजकारण प्रवेशाची घोषणा करून टाकली. साधारणपणे मे महिन्यात होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष उतरणार आहे. रजनीकांत हे वलयांकित तमीळ ‘हिरो’ आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीशी निगडित तमिळनाडूच्या राजकारणात आणखी एका नव्या ताऱ्याचे पदार्पण होणार आहे. यापूर्वीचे अनेक दिग्गज तमीळ नेते हे चित्रपटसृष्टीतलेच होते. अण्णा दुराई, एमजीआर, जयललिता, करुणानिधी ही काही उदाहरणे ! ही मंडळी मुख्यतः पेरियार रामस्वामी यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या द्रविडी चळवळीतून पुढे आली होती. राजकारणावरील उत्तर भारतीयांचे वर्चस्व व त्या राजकारणातील उच्चवर्णीयांचे प्राबल्य यांच्या विरोधातील ही चळवळ होती. त्यामुळेच तमिळनाडूत काही प्रमाणात काँग्रेस सोडल्यास अन्य कोणाही पक्षाला पाय रोवता आले नाहीत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुरुवातीला अण्णा दुराई यांनी स्थापन केलेल्या द्रमुकचे तमिळनाडूवर प्रभुत्व राहिले. परंतु त्यांच्या निधनानंतर एम. जी. रामचंद्रन यांनी बंड करून दुराई यांच्या नावानेच अण्णा द्रमुक पक्ष स्थापन केला आणि स्वतःच्या चित्रपट वलयाचा लाभ उठवून राज्याच्या राजकारणावर प्रभाव दीर्घकाळ गाजविला. त्यांच्यानंतर त्यांच्या सहकारी व राजकीय वारसदार जयललिता याही प्रख्यात अभिनेत्री होत्या व त्यांनी रामचंद्रन यांचीच गादी चालवली. करुणानिधी हेही चित्रपटसृष्टीशी निगडित होते. ही सर्व मंडळी काळाच्या पडद्याआड गेली आहेत. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन आणि मुलगी कनिमोळी त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवीत आहेत. त्यांचा द्रमुक पक्ष हा राज्यात अजूनही संघटनात्मकदृष्ट्या ताकदवान मानला जातो. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकचे सरकार कसेबसे पाच वर्षे टिकले ते मुख्यतः केंद्र सरकारच्या दयेवर. त्यामुळे त्या सरकारला केंद्राबरोबर सक्तीची हातमिळवणी करावी लागली. ‘जीएसटी’च्या मुद्‌द्‌यावर मात्र भाजप व अण्णा द्रमुकचे काही काळ मतभेद झाले होते. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची आघाडी कायम राखण्याचे आश्‍वासन भाजपने मिळवले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केवळ अण्णा द्रमुकच्या आश्‍वासनावर भाजप संतुष्ट नाही हे आता स्पष्ट झाले आहे. कारण पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेनंतरच रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केली. अन्यथा ते पक्षाची स्थापना, तसेच निवडणूक लढविण्याच्या फारशा मनःस्थितीत नव्हते. प्रकृतीमुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर राहिले, पण आता राजकारणात प्रवेशाच्या घोषणेबरोबरच तमिळनाडूसाठी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा करणार नसल्याचे भावनिक निवेदन त्यांनी केले. रजनीकांत यांच्या राजकारणप्रवेशासाठी भाजप व संघपरिवाराचे प्रयत्न चालू होते. त्यांचे मन वळविण्यासाठी संघाचे चेन्नईमधील एक प्रमुख नेते एस. गुरुमूर्ती प्रयत्नशील होते. दोन नोव्हेंबर रोजी त्यांनी रजनीकांत यांची भेट घेतली होती. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा चेन्नईच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांची व रजनीकांत यांची भेट होण्याची चर्चा होती, परंतु ती झाली नाही. अर्थात आभासी भेटीनेही गोष्टी साध्य होऊ शकतात. परंतु रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या घोषणेमागे भाजपचे प्रोत्साहन आहे हे निर्विवाद. किंबहुना रजनीकांत यांनी स्वतःच्या चाहत्यांच्या संघटनांच्या राज्यभरातील जाळ्याच्या समन्वयासाठी नेमणूक केलेले अर्जुनमूर्ती हे भाजपच्या विचार विभागाचे प्रमुख होते. ते संघाची पार्श्‍वभूमी असलेले आहेत आणि आठवड्यापूर्वीच त्यांनी भाजपमधून निवृत्ती घेतली होती.आता ते रजनीकांत यांच्यासाठी संघटनात्मक जबाबदारी सांभाळणार आहेत.

राजकारणात रंगत 
रजनीकांत यांच्या कायेत प्रवेश करून भाजप आता तमिळनाडूच्या राजकारणात उतरत आहे. यातून राज्याच्या राजकारणात रंगत येणार आहे. तमिळनाडूचे राजकारण १९६७ पासून म्हणजे अण्णा दुराई यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळापासून द्रविडी राजकारणाभोवती केंद्रित राहिलेले आहे. या राजकारणाचे प्रतिनिधित्व द्रविडी चळवळीतूनच पुढे आलेले द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन पक्षांनी केले. उच्चवर्णीय व विशेषतः ब्राह्मण वर्चस्वाविरुद्धच्या चळवळीची पार्श्‍वभूमी लाभलेल्या द्रविडी राजकारणात पट्टली मक्कल काची (पीएमके) यासारखे पक्षही पाय रोवू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर तमिळनाडूत भाजपची प्रतिमा ही हिंदी-हिंदुत्व किंवा उच्चवर्णीयांचे राजकारण करणारा पक्ष अशी मानली जाते. तमिळी जनतेने या कारणामुळेच काँग्रेसचे उच्चाटन केले होते. त्यामुळे भाजपला स्वबळावर तमिळनाडूच्या राजकारणात फारसे यश मिळू शकले नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनीही काँग्रेसचा कित्ता गिरवीत एकदा अण्णा द्रमुक व एकदा द्रमुकबरोबर हातमिळवणी करून काही जागा पदरात पाडून घेतल्या होत्या, परंतु त्यापलीकडे पक्षाला यश मिळू शकले नव्हते.

भाजप-अण्णा द्रमुक युतीवर प्रश्‍नचिन्ह
भाजपला किंवा वर्तमान नेतृत्वाला आता दोन्ही द्रमुक पक्षांवर फारसा भरवसा राहिलेला नसावा. त्यामुळेच राजकारणात नावीन्य आणण्याचा प्रयत्न त्यांनी रजनीकांत यांच्यामार्फत केला आहे. रजनीकांत हे भाजपचे ‘प्रॉक्‍सी’ असतील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. ते मोदी यांचे प्रशंसक आहेत आणि त्यांचा पक्ष भाजप प्रोत्साहित व पुरस्कृत राहणार हे स्पष्ट आहे. रजनीकांत यांचा सामना मुख्यतः दोन्ही द्रमुक पक्षांबरोबर होणार हे उघड आहे. कारण अमित शहा यांनी चेन्नई दौऱ्यात अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाकडून म्हणजे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याकडून भाजपबरोबरची आघाडी विधानसभा निवडणुकीत कायम राहील असे वचन घेतले. तशी घोषणाही करण्यात आली. परंतु रजनीकांत यांच्या घोषणेनंतर आता भाजप व अण्णा द्रमुक निवडणूक समझोत्याचे काय हा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. रजनीकांत यांचा नवा पक्ष निवडणुकीत उतरणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलेच आहे. त्यामुळे हा पक्ष आणि अण्णा द्रमुक व भाजप यांच्या परस्परसंबंधांबाबत नकळत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. निवडणूक जवळ येईल तसे हे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल. 

तमिळनाडूतील भाजप-संघ परिवाराच्या या प्रयोगाचा अन्वयार्थ काय? आगामी काळात भाजपच्या ‘हिटलिस्ट’ वर प्रादेशिक पक्ष राहणार हा तर याचा अर्थ नव्हे? हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय नेत्यांना उतरवून भाजपने केलेला प्रयोग, त्याला मिळालेले यश आणि स्थानिक प्रश्‍नांऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाचा करण्यात आलेला प्रयोग यांतून भाजपला चमकदार यश मिळाले. आता त्यांनी तेलंगणामध्ये स्वबळावर सरकारस्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचेही स्पष्ट केले आहे. पश्‍चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जींना त्यांनी बॅकफूटवर नेले आहे. तमिळनाडूचे राजकारण काहीसे वेगळे असल्याने त्यांना हा ‘रजनी-परकाया प्रवेश’ करावा लागला आहे. परंतु आगामी काळात प्रादेशिक पक्षांना भाजपच्या आक्रमणाला तोंड देण्याची तयारी करावी लागण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने राष्ट्रीय पर्यायी पक्ष म्हणून केवळ पाटी लावली आहे, आत सर्व पोकळ आहे. उत्कंठावर्धक राजकारणाकडे ही वाटचाल आहे!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image