esakal | उद्योगनगरीने पकडला विकासाचा ‘महामार्ग’

बोलून बातमी शोधा

shirwal}

आजही शिवछत्रपतींनी जिंकलेला सुभानमंगळ भुईकोट किल्हा आणि दगडी भव्य पाणपोई त्याची साक्ष देतात. ४०हजार लोकवस्तीच्या शिरवळचे पूर्वीचे नाव श्रीमाळ. कालौघात त्याचे शिरवळ झाले.

उद्योगनगरीने पकडला विकासाचा ‘महामार्ग’
sakal_logo
By
अश्‍फाक पटेल

बदलती गावे  : शिरवळ
शिरवळ...गाव तसं पहिल्यापासूनच महामार्गावर. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमा या गावातूनच फुटतात. उत्तरेकडे पुणे आणि दक्षिणेकडे सातारा. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नीरा नदीच्या तिरावरच्या शिरवळला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. आजही शिवछत्रपतींनी जिंकलेला सुभानमंगळ भुईकोट किल्हा आणि दगडी भव्य पाणपोई त्याची साक्ष देतात. ४०हजार लोकवस्तीच्या शिरवळचे पूर्वीचे नाव श्रीमाळ. कालौघात त्याचे शिरवळ झाले. अलीकडेच शिरवळने कात टाकली, ऐतिहासिक वारश्‍याच्या गावाने उद्योगात गरूडझेप घेतली आहे. अगदी निरेच्या खळाळत्या पात्राप्रमाणेच अामूलाग्र. 

शिरवळचे भूक्षेत्र ५४७हेक्‍टर. सध्या १८०मोठे उद्योगधंदे असलेल्या या गावात शिवपूर्वकाळात देशमुखांची घराणी नांदत होती. चौदाव्या शतकात ते विजापूरची आदिलशाही, निजामशाही व बिदरच्या ईमादशाही यांच्या अधिपत्याखाली होते. नजीकच चौपाळा येथे चालुक्‍यकालीन पाणपोई आहे. निगडे-देशमुख, मांडके, देशपांडे काझी, नायकवडी, शेटे, महाजन इथले मूळनिवासी. गावाला धार्मिक परंपराही मोठी आहे. इतिहासकालीन केदारेश्‍वर व अंबाबाई मंदिर त्याची साक्ष देतात. स्वातंत्र्यपूर्वकालीन प्राथमिक शाळा आणि १९४७मध्ये डॉ. स. शि. वाळिंबे, डी. जी. कुलकर्णी, पांडुरंग तांबे, पांडुरंग कांबळे, गेनबा वैद्य यांनी आदर्श विद्यालयाद्वारे शैक्षणिक कार्य केले. १९८३मध्ये तालुक्‍यात प्रथमच ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी श्रीपतराव कदम महाविद्यालय सुरू झाले. १९८८मध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच केंद्र सरकारच्या पशुवैद्यकीय विद्यालयाला सुरवात झाली. महामार्गावरील गाव असल्याने येथे हॉटेले, ढाबे, रेस्टॉरंट यांचा व्यवसाय मुळात होताच, तो उद्योगांच्या विस्ताराने बहरला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गतिमान औद्योगिकरण 
दरम्यानच्या काळात नीरा नदीचे पाणी, धोम-बलकवडी व नीरा-देवघरचे पाणलोट क्षेत्र, जवळच पुण्यासारखी मोठी बाजारपेठ व महामार्ग असे उद्योगांसाठी पोषक वातावरणामुळे येथील औद्योगिकरण झपाट्याने वाढले. सर्वप्रथम उद्योगपती बी. जी. शिर्के यांनी शिर्के पेपरमिल १९८०मध्ये उभारली. उद्यमनगरी शिरवळची मुहूर्तमेढ झाली. त्यानंतर पराजंपे व कमल कोटिंग आणि इतर लहान-मोठ्या कंपन्या आल्या. परिसरातील लोकांना रोजगार मिळाला. शिरवळमध्ये लोकवस्ती वाढू लागली. नंतर सरकारने शिरवळची बाजारपेठ ओळखून खास औद्योगिक क्षेत्र (सेझ) जाहीर केले. औद्योगिक टप्पा क्रमांक एक ते तीननुसार परिसरात मोठ्या कंपन्यांनीही ठाण मांडले. यामध्ये रिएटर, एशियन पेंट्स, थरमॅक्‍स, निप्रो, के.एस.बी पंप, प्रविण मसाले, गोदरेज ग्रुप, एसीजी फार्मा, टायको यासारख्या १६५ कंपन्या याठिकाणी आल्या. यामुळे शिरवळचा लौकीक औद्योगिकनगरी होवू लागला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या औद्योगिकरणाने महामार्गावरील खेडे असलेलेल शिरवळ शहर म्हणून नावारूपाला आले. गृहप्रकल्पाचे जाळेही वाढत गेले आहे. अनेक पुणेकर येथे निवांत राहण्यासाठी गावाला पसंती देत असल्याने परिसरात गृहप्रकल्पांचे सिमेंटचे जंगल उभे राहिले. शिरवळचे शहरीकरण दिवसेंदिवस गतिमान होत असून, तालुक्‍यात सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरवळला ओळख मिळाली आहे. या ग्रामपंचायतीचे उत्पन्न सध्या सरासरी तीन ते चार कोटी रुपये असून, ग्रामपंचायतीच्या आजवरच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी शिरवळच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. 

परिसरात धोम व देवघर धरण तसेच नीरा नदीचे पाणी असल्याने येथील जमिनीतून सोन्याचा धूर निघेल, अशी जमिनीला किंमत मिळत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा