गोव्याला आली जाग; कोकणाचे काय? 

शिवप्रसाद देसाई
शुक्रवार, 7 जून 2019

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे. अशा वेळी वाढलेले पर्यटन टिकवून पुढे जाण्याचे आव्हान कोकणापुढे आहे.

गोव्याशी तुलना करता कोकणातील पर्यटन अजून रांगायलाही सुरवात झालेली नाही; मात्र गोवा सरकारचे पर्यटनाकडे झालेले दुर्लक्ष, किनाऱ्यावरील वर्दळ, विविध निर्बंध अशा कारणांमुळे गोव्यातील पर्यटक रत्नागिरी, सिंधुदुर्गाकडे वळू लागले. त्यांची संख्या मर्यादित असली, तरी ती गोव्यातील पर्यटनवाढीला खीळ घालणारी आहे. त्याची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे. गोव्याचे पर्यटन साधारण ऐंशीच्या दशकात विस्तारायला सुरवात झाली. युरोपातील हिप्पी तेव्हा गोव्यात किनाऱ्यावर फिरायला यायचे. चरस, गांजा, दारू यांच्या धुंदीत असायचे. हिप्पींमुळे गोव्याचे पर्यटन जगाच्या नकाशावर पोचले. पोर्तुगीज संस्कृतीमुळे तेथे दारू खुली होती. त्याचाही परिणाम झाला. हळूहळू तेथील पर्यटन व्यवसाय विस्तारला. त्याच्या जोडीला देशी पर्यटकांची संख्याही वाढली. महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह देशभरातील पर्यटकांसाठी गोवा हे आकर्षण बनले. 

गोव्याच्या पर्यटनाला कोकणाचा पर्याय 
साधारण दहा वर्षांपूर्वी कोकणातील किनाऱ्यावर पर्यटन बाळसे धरू लागले. हॉटेल उभी राहिली, वॉटर स्पोर्टस सुरू झाले. याच दरम्यान गोव्याच्या पर्यटनावर वेगवेगळ्या नकारात्मक घटकांचा परिणाम झाला. गोव्यात पर्यटन म्हणजे दारू पिऊन धिंगाणा असा समज झाला, त्याला अमली पदार्थांची जोड मिळाली. हे लक्षात येताच तेथील अमली पदार्थविरोधी पथकासह अन्य सुरक्षा यंत्रणांनी निर्बंध लादले. साहजिकच मोकळेपणाच्या शोधातील पर्यटक पर्याय शोधू लागले. किनाऱ्यावर कमालीचा गजबजाट असल्याने निवांतपणा शोधणारा कुटुंबवत्सल पर्यटकही गोव्यापासून दूर जाऊ लागला. गोव्यातील पर्यटन सुविधांचा दर जास्त असल्याने "बजेट पर्यटन' करणारे गोवा टाळू लागले. 

याच दरम्यान कोकणात पर्याय तयार होत होता. इथले किनारे स्वच्छ, निवांत होते. तुलनेत दरही कमी होते. वॉटर स्पोर्टसचा पर्याय होता. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, बेळगाव अशा भागांतील पर्यटक रत्नागिरी, सिंधुदुर्गात येऊ लागले. गोव्यातील बहुसंख्य टूर ऑपरेटर मूळचे सिंधुदुर्गातील आहेत. गोव्यातील पर्यटनाचे वाढीव बजेट व इतर अडचणींमुळे हे टूर ऑपरेटर पर्यटकांना सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आणू लागले. यामुळे दोन्ही जिल्ह्यांत किनारपट्टीवरील पर्यटन वाढले. 

गोव्याच्या पर्यटनवाढीचा आभास 
गोव्यात 2012 मध्ये भाजप सरकार सत्तेत आले. तेथे पर्यटनाच्या वाढीचे प्रमाण 8 ते 12 टक्के होते. नव्या सरकारने 32 टक्‍क्‍यांपर्यत ही वाढ असल्याचे सांगितले. यातून गोव्याच्या पर्यटनवाढीचे आभासी विश्‍व निर्माण होऊ लागले. खरेतर गोव्यातील पर्यटन व्यवसाय कोसळत होता. चार-पाच महिन्यांपूर्वी "टूर ऍण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा'च्या पत्रकार परिषदेने सरकारचे डोळे उघडले. त्यांनी गेल्या हंगामात 30 टक्के हॉटेल रिकामी राहिल्याचे सांगत उच्चभ्रू पर्यटकांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांनी घटल्याचा दावा केला. हे पर्यटक सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच कर्नाटकातील कुमठा, मुरूडेश्‍वर, कारवारकडे जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. "ही स्थिती सुधारली नाही, तर आम्ही पर्यटन रोजगारवृद्धी करू शकणार नाही,' असे सांगून, गेल्या पाच वर्षांपासून हाच ट्रेंड असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याची दखल घेऊन गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी पर्यटन का, घटले याचा अभ्यास सुरू केल्याची घोषणा केली. गोव्याचे अर्थकारण प्रामुख्याने खाण व पर्यटनावर चालते. त्यामुळे गोवा सरकार लवकरच पर्यटनवाढीसाठी कृती आराखडा बनवून त्याची कार्यवाही करणार हे स्पष्ट आहे. 

पुरेशा सुविधांचा अभाव 

गोव्याने पर्यटनाकडे लक्ष दिल्यास त्याचा फटका कोकणाला बसू शकतो. कारण इथल्या पर्यटनात अनेक अडचणी आहेत. रस्ते चांगले नाहीत, किनारपट्टीवरील शहरांत वाहतूक कोंडीचे प्रश्‍न आहेत. हॉटेल व इतर क्षेत्रातील अवाजवी दरामुळे मध्यवर्गीय पर्यटक नाराज आहेत. वॉटर स्पोर्टसच्या दरावर कोणाचे नियंत्रण नाही. पार्किंगची वानवा आहे. पर्यटकांना आकर्षित करतील असे नवे प्रकल्प नाहीत. किनाऱ्याच्या पलीकडे इतर भागांत पर्यटकांना वळविण्यात यश आलेले नाही. या सगळ्या स्थितीचा विचार केला, तर गोव्याने आपल्या अडचणी दूर केल्यास कोकणाच्या पर्यटनाला धक्का बसू शकतो. वाढलेले पर्यटन स्थिरावून त्याच्या विस्तारासाठी खरे तर आधीच धोरण ठरायला हवे होते; पण तसे झालेले नाही.

"सी-वर्ल्ड'सह अनेक पर्यटन प्रकल्प कागदावरच आहेत. लोकप्रतिनिधी पर्यटन विकासाच्या केवळ गप्पा मारतात. किनारपट्टीवर विस्तारलेले पर्यटन व्यवसाय लक्षात घेता येथील मानसिकता सकारात्मक होत आहे; पण त्याला सरकारी स्तरावर पाठबळ मिळत नाही. उलट वनसंज्ञा, वनप्रश्‍न, "सीआरझेड' यांच्या नावाखाली पर्यटन व्यावसायिकांना ना उमेद करण्याचे प्रयत्न होत आहेत. पर्यटन महामंडळाची बरीच विकासकामे रखडलेली आहेत. नवे पर्यटन मॉडेल बनविण्याचे प्रयत्न सोडाच, सध्याचे प्रकल्पही अडचणीत आले आहेत. कोकण पर्यायाने महाराष्ट्र सरकार आणि राज्यकर्ते वेळीच सावध झाले नाहीत, तर गोव्याशी स्पर्धा तर दूरच, पण असलेला व्यवसाय राखणेही कठीण होणार आहे. 

अपप्रवृत्तींमुळे धोक्‍याची घंटा 
गोवा गेल्या काही वर्षांत अमली पदार्थाचे "ट्रेडिंग सेंटर' झाले आहे. तेथील सुरक्षा यंत्रणांनी निर्बंध कडक केल्यामुळे अमली पदार्थांसाठी गोव्यात येणारे पर्यटक सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या किनाऱ्याकडे वळाले तर नाहीत ना, अशी शंका आहे. अलीकडे अमली पदार्थांची तस्करी, वेश्‍याव्यवसायात मूळ सिंधुदुर्गातील दलालांना गोव्यात अटक झाल्याची उदाहरणे आहेत. ही नक्कीच धोक्‍याची घंटा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about the tourism status in Kokan