esakal | भाष्य : व्यापारयुद्ध नि पुरवठा साखळ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Trade

व्यापार युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांवर किंमतवाढीचे संकट ओढवणार आहे. त्याच वेळी छोट्या व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने या साखळ्या अधिक कार्यक्षम होतील. परंतु, वाढत्या खर्चामुळे चलनफुगवट्याचे भूत पुन्हा डोके वर काढेल, असे दिसते. 

भाष्य : व्यापारयुद्ध नि पुरवठा साखळ्या

sakal_logo
By
वसुधा जोशी

चीनला धडा शिकवण्याच्या उद्देशाने अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धात सध्या तह झालेला असला, तरी ऑक्‍टोबरपर्यंत सर्व चिनी आयात मालावर 25 टक्‍क्‍यांपर्यंत शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मानस आहे. तो त्यांनी प्रत्यक्षात आणला, तर चीनच्या प्रगतीला निश्‍चितच खीळ बसेल; पण सर्वच वस्तूंच्या किमती वाढून चलनफुगवट्याला आमंत्रण मिळेल.

अमेरिकी उद्योगांना संरक्षण मिळून ते जोमाने वाढतील असे होणार नाही; कारण त्यांच्या आयात कच्च्या मालाचा व सुट्या भागांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. 2010पर्यंतच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे फलित म्हणजे अनेक उद्योगांमध्ये जागतिक पुरवठा साखळ्या अस्तित्वात आल्या आहेत. जागतिक व्यापाराच्या 70 टक्के व्यापारात या साखळ्यांचा संबंध येतो. व्यापार युद्ध आणि वाढलेले आयात शुल्क यांच्यामुळे त्यांच्यात काय बदल होईल हे पाहिले पाहिजे. 

1990 ते 2010 या दोन दशकांत आयात शुल्क कमी होऊन जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला मोठी चालना मिळाली. देशादेशांमधील सीमारेषांचा विचार न करता, जगात जेथे स्वस्त कच्चा माल असेल, जेथे स्वस्तात मालप्रक्रिया होत असेल तिथून ती करवून घेण्याचा आणि जास्त नफा मिळवण्याचा धडाका बहुराष्ट्रीय कंपन्यांनी लावला. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळ्या (सप्लाय चेन) अस्तित्वात आल्या. बहुराष्ट्रीय कंपन्या बहुतेक काम उक्ते करवून घेतात. कच्चा माल खरेदी व वाहतूक, प्रक्रिया व वस्तूनिर्मिती, उत्पादनांची वाहतूक, साठवणूक व विक्री यासाठी त्या वेगवेगळ्या कंत्राटी उत्पादकांना व पुरवठादारांना नेमतात. त्यांना एकत्र जोडण्यासाठी पुरवठा साखळ्या तयार केल्या जातात. त्या बांधल्यावर त्यांच्या दुव्यांमध्ये समन्वय साधायचा, ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करायचा आणि पक्‍क्‍या मालावर ब्रॅंडचा ठसा उमटवायचा, एवढेच काम बहुराष्ट्रीय कंपन्या करतात. प्रक्रिया, वाहतूक, साठवणूक व विक्री या प्रत्येक टप्प्यात वस्तूचे मूल्य वाढत असल्याने पुरवठा साखळ्यांना मूल्यवर्धन किंवा मूल्य साखळ्या असेही म्हटले जाते. 

पुरवठा साखळ्यांची रचना गुंतागुंतीची, पण कार्यक्षम असते. स्थानिक उत्पादनापेक्षा वाहतुकीचा जास्त खर्च लक्षात घेऊनही, त्या उत्पादनखर्चात घसघशीत बचत करतात आणि कमी किमतीत खूप माल बाजारात ओततात. 'वॉलमार्ट', 'ऍमेझॉन' या व्यापारी संस्थांनीही अशा साखळ्या तयार करण्यात मोठा वाटा उचलला आहे. 1990 - 2000 या दशकात रोज कमी किंमत ही घोषणा करून 'वॉलमॉर्ट'ने जगभरातून स्वस्त वस्तू अमेरिकेतील दुकानांमध्ये आणण्यासाठी कार्यक्षम पुरवठा साखळ्या तयार केल्या. माहितीची देवाण-घेवाण, जलद संदेशवहन, स्वतःचे ट्रक, विमाने ही वाहतुकीची साधने, माल एका बिंदूवर साठून न राहता सतत पुढे ढकलला जाण्यासाठी योग्य असे व्यवस्थापनतंत्र यांची जोड त्यांना देऊन 'वॉलमार्ट'ने त्यांच्या कोणत्याही दुकानात शेल्फवरील वस्तू संपली की संबंधित पुरवठादाराने ती लवकरात लवकर परत भरली पाहिजे, असा दंडक घालून दिला. सध्या 'ऍमेझॉन'ने कमी किंमत व केव्हाही उपलब्ध हा नारा दिला असून, स्वयंचलित यंत्रे, रोबो, वाहतुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी ड्रोन विमाने, बिग डेटा ऍनॅलिटिक्‍स यांच्या साह्याने ऑर्डर दिल्याच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकाच्या हातात वस्तू देण्यासाठी कंबर कसली आहे. 

पुरवठा साखळी एकदा स्थिरावली, की तिच्यात पुरवठादारांची संख्या वाढू लागते. मग त्यांचे स्तर एक, दोन, तीन व पुढे असे वर्गीकरण होते. बहुराष्ट्रीय कंपन्या फक्त पहिल्या, दुसऱ्या स्तरावरच्या पुरवठादारांच्या संपर्कात असतात. ते स्वतः कसे काम करवून घेतात, हे बघायला त्यांना वेळ नसतो. पुरवठा साखळ्यांची क्‍लिष्टता अशी की 2011मध्ये जपानला सुनामीचा धक्का बसल्यावर तेथील सेमी-कंडक्‍टर्स बनवणाऱ्या कंपनीने तिच्या पुरवठा साखळीतले कच्चे दुवे शोधण्याचे काम हाती घेतल्यावर शंभर व्यवस्थापकांच्या चमूला संपूर्ण पुरवठादारांचा मागोवा घ्यायला वर्षाहून जास्त अवधी लागला! साखळीत काही बिघाड झाला; कुठे अपघात वा नैसर्गिक आपत्ती ओढवली तर नक्की दोष कुणाचा हे ठरवणे कठीण होते.

2013 मध्ये ढाक्‍क्‍यात इमारत कोसळून तयार कपडे शिवणारे 1100 हून जास्त कामगार मरण पावले. ते सगळे तयार कपड्यांच्या जागतिक पुरवठा साखळीचा भाग होते. अपघातानंतरही साखळीचे काम पूर्ववत चालू राहिले. 
'सिलिकॉन व्हॅली'तील उद्योगांनी विकसित केलेले माहिती तंत्रज्ञान, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव हे आजचे उगवते तंत्रज्ञान, आशिया खंडातील स्वस्त श्रमिक आणि चीनची वस्तुनिर्माण क्षेत्रातील प्रचंड ताकद यांचा मिलाफ जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये दिसून येतो.

जागतिकीकरणावरच्या दृढ विश्‍वासामुळे त्या तयार करताना कमी खर्च आणि जास्त वेग या दोनच बाबींकडे लक्ष पुरवण्यात आले. जगभर पसरलेल्या व्यवहारांमधील जोखीम दुर्लक्षित राहिली.2008मध्ये वित्तीय अरिष्टानंतर जागतिकीकरणाला ओहोटी लागली. मुक्त जागतिक व्यापाराऐवजी प्रादेशिक व्यापार वाढू लागला. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांवर मोठा परिणाम होऊन त्या आखूड होत आहेत. सहाशे बहुराष्ट्रीय कंपन्यांची एप्रिल 2019मध्ये पाहणी झाली. तीनुसार त्यांनी पुरवठा साखळ्यांची रचना बदलण्यास सुरवात केली आहे. ते करताना पुरवठा केंद्रे युरोपकडे वळणे आणि साखळीतील व्यवहारांच्या जोखमीकडे लक्ष पुरवणे हे त्यांचे अग्रक्रम आहेत. त्यामुळे आशियाई देशांमधील काम कमी होऊन त्यांच्या आर्थिक वाढीचा वेग मंदावणार आहे. त्याचवेळी उत्पादन खर्च वाढून वस्तूंची किंमतवाढ, वेतनात वाढ आणि त्यातून चलनफुगवट्याकडे वाटचाल होणार आहे. 

ऑक्‍टोबरमध्ये अमेरिकेने चिनी आयात मालावर 25 टक्‍क्‍यांपर्यंत आयात शुल्क आकारले, तर पुरवठा साखळ्यांवर नक्की काय परिणाम होईल याचा अंदाज घेण्यासाठी 'लामासॉफ्ट' या संस्थेने तयार कपडे, मोटारी आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू यांच्या पुरवठा साखळ्यांचा नुकताच अभ्यास केला. त्यावरून त्यांच्या एकूण खर्चात इलेक्‍ट्रॉनिक्‍स दोन टक्के, मोटारी चार टक्के, तर तयार कपडे अकरा टक्के एवढी वाढ होईल. पण त्याचवेळी साखळीतील सरासरी व्यवहार पूर्ण होण्यासाठीचा कालावधी कमी होईल, असा अंदाज आहे. पुरवठा युरोपकडे वळवण्याचा प्रयत्न करूनही 'जगाचा कारखानदार' हे चीनचे स्थान अबाधित राहणार आहे. 

नवीन तंत्रज्ञान पुरवठा साखळ्यांमध्ये लागू करण्यासाठी सध्या अनेक प्रयोग सुरू आहेत. बिग डेटा ऍनॅलिटिक्‍सच्या साह्याने ग्राहकांच्या आवडीनिवडीचे बारकाईने निरीक्षण करून भविष्यात कोणत्या मालाची, किती प्रमाणात मागणी होईल याचे अंदाज करण्यात येत आहेत. 'सेल्फ लर्निंग ऍल्गोरिदम'च्या साह्याने त्यात आणखी अचूकता येईल. नवीन मालासाठी ऑर्डर देणे, मालाच्या बिलानुसार पैसे अदा करणे, पुरवठादारांचे व्यवस्थापन करणे, उठाव नसलेला माल खपण्यासाठी किमती कमी करणे ही कामे यापुढे स्वयंचलित पद्धतीने होतील. माल हाताळणी यंत्रमानवांकडून होईल. येऊ घातलेल्या 5जी मोबाईल टेलिफोनमुळे 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' साध्य झाल्यावर विविध सेन्सरच्या वापराने पुरवठा साखळ्या पारदर्शक बनतील. माल साठवणुकीच्या गोदामातील, तसेच वाहतुकीच्या कंटेनरमधील इंच-न्‌-इंच जागेचा वापर करून अपव्यय टाळला जाईल. 

मात्र तंत्रज्ञानाच्या वाढच्या वापराबरोबर हॅकिंग, व्हायरस हल्ले, माहितीची चोरी, सायबर गुन्हे यांची जोखीमही वाढणार आहे. पुरवठा साखळीतील तिसऱ्या, चौथ्या आणि आणखी खालच्या फळीवरचे पुरवठादार तिच्यावर पुरेशा प्रमाणावर मात करू शकणार नाहीत व त्यामुळे साखळ्या कमजोर बनतील. व्यापार युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांवर किंमतवाढीचे संकट ओढवणार आहे. त्याच वेळी छोट्या व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे त्या जास्त कार्यक्षम होतील.

या दोन विरोधी बळांचा एकत्रित परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांत कमी-जास्त असेल. परंतु, वाढत्या खर्चामुळे चलनफुगवट्याचे गाडलेले भूत परत डोके वर काढेल, असा एकुणात रंग दिसतो.

loading image