व्यापक आव्हाने, संकुचित प्रतिसाद

धनंजय बिजले
Monday, 28 September 2020

आमसभेमध्ये कोरोनाच्या लसीवर, लस संशोधनासाठीच्या सहकार्यावर,लसीच्या जगभरातील वितरणावर गांभीर्याने चर्चा व्हावी,त्यावर सर्वकष मार्ग निघावा ही सरचिटणीस अँटेनिओ गुटेरेस यांची अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे.

संयुक्त राष्ट्रांचे हे ७५ वे वर्ष. सध्याच्या घडीला जगातील १९३ देशांचे प्रतिनिधित्व करणारी ही एकमेव संघटना. तिचे अस्तित्व अबाधित राखणे फार गरजेचे आहे. मात्र, ही संघटना कालबाह्य झाली आहे, अशी चर्चा अधूनमधून झडत असते. नुकतेच पार पडलेले अधिवेशन त्याच चर्चेला चालना देणारे ठरले. त्याचे पडसाद जगभरातील माध्यमांत उमटले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाऊणशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेचे काय होणार, या प्रश्‍नाची अलीकडे गांभीर्यांने चर्चा होते. त्याविषयीच्या चिंतेला खतपाणी घालण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग, तायेप एर्दोगान, ब्लादिमीर पुतीन अशांसारखे जागतिक शक्तिशाली नेते करीत असल्याचे दिसून येत आहे.आमसभेमध्ये कोरोनाच्या लसीवर, लस संशोधनासाठीच्या सहकार्यावर, लसीच्या जगभरातील वितरणावर गांभीर्याने चर्चा व्हावी, त्यावर सर्वकष मार्ग निघावा ही सरचिटणीस अँटेनिओ गुटेरेस यांची अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. जगभरातील माध्यमांत याचे तरंग उमटणे अपरिहार्य होते.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकमेव आशादायक पाऊल
जगातील आतापर्यतची सर्वात खराब झूम मिटिंग अशा खरमरीत शब्दांत ‘गार्डियन’ने आमसभेचे वर्णन केले आहे. ‘गार्डियन’ने म्हटले आहे की, व्यापक चर्चा यंदा होणारच नव्हती. मात्र विविध शक्तिशाली नेत्यांची ध्वनीमुद्रित भाषणे कोठेच जागतिक वाटली नाहीत. या नेत्यांनी आपापल्या देशातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवत भाषणे केली. ट्रम्प, पुतीन, जिनपिंग, एर्दोगान अशा स्वयंघोषित शक्तिशाली नेत्यांच्या भाषणांची परेड हेच सांगून गेली. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्या पन्नास वक्‍त्यांच्या मांदियाळीत एकही महिला नव्हती. कोरोनासारख्या महामारीच्या काळात अमेरिका व चीन यांसारख्या महासत्तांमधील दरी रुंदावत असून सुरक्षा समितीसारखी व्यवस्थाही त्यामुळे अस्तित्वहीन होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे भाषण तर प्रचारसभेसारखेच होते. इराणबरोबरचे त्यांनी थेट संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेलाही इशारा दिला. सरचिटणीस गुट्रेस यांनी कोरोनावरील लसीच्या वितरणासाठी घेतलेला पुढाकार हे आमसभेतील एकमेव आशादायक पाऊल म्हणावे लागेल. कारण १५६ देशांनी त्यांच्या कोव्हॅक्‍स मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महासत्तांमधील संघर्ष चव्हाट्यावर
 ‘बीबीसी’ने म्हटले आहे की, अमेरिका व चीनमधील संघर्ष आमसभेतदेखील पहायला मिळाला. ट्रम्प यांनी कोरोनाच्या फैलावाला पुन्हा एकदा चीनला जबाबदार धरले. तर शी जिनपिंग यांनी आपण कोणत्याही देशाशी शीतयुद्ध करण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले. पण यातून या दोन्ही महासत्तांमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला. अमेरिकेत कोरोना साथ नियंत्रण आणण्यात अपयश आल्याने निवडणुकीत फटका बसू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मतदारांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा चीनर खापर फोडले. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या तालावर नाचते हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. थोडक्‍यात जागतिक महासत्तेच्या प्रमुखाचे जगाला उद्देशून केलेले भाषण खरे तर साऱ्या जगासाठी नव्हे तर केवळ अमेरिकी मतदारांसाठी होते. त्यामुळेच की काय सरचिटणीस गुटेरस यांनी मात्र शीतयुद्ध टाळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे कोणाचेही नाव न घेता स्पष्टपणे सांगितले.    

 न्यूयॉर्कमध्ये अधिवेशन असूनही ट्रम्प यांनी येणे टाळले यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या, असे निरीक्षण ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीने नोंदविले आहे. यावरून आमसभेला आपण फार महत्व देत नसल्याचे एकप्रकारे ट्रम्प यांना दाखवून द्यायचे होते, असा निष्कर्ष निघतो. जागतिक राजकारणात संयुक्त राष्ट्रांनी याआधी महत्त्वाची भूमिका पार पाडली असली तरी काळानुरूप बदल करण्यात, पारदर्शकता राखण्यात, हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध भूमिका घेण्यात ती नक्कीच कमी पडली आहे. ७५व्या वर्षानिमित्त हे बदल करण्याची नामी संधी होती ती घालविली आहे.

डिजिटल आमसभेने काय साधले?
‘सीएनएन’ वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, यावेळी डिजिटल आमसभा झाल्याने काय साधले गेले कोणास ठाउक. ट्रंप यांच्या भाषणानंतर सभागृह जवळपास रिकामेच झाले होते. मुळात अडीच हजाराची क्षमता असलेल्या सभागृहात यंदा केवळ २१० जणांनाच प्रवेश होता. शिवाय जागतिक नेत्यांची भाषणे अन्य देशांच्या नेत्यांनी आपल्या घरात बसून शांतपणे व गांभीर्याने ऐकली असतील, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. सध्याच्या अशांत वातावरणात डिप्लोपसीला फार महत्त्व होते. पण डिप्लोमसीमध्ये प्रत्यक्ष भेटीगाठींना फार महत्व असते. यंदा तेच न घडल्याने अनेक प्रश्नांवर मार्ग निघण्याची संधी संपुष्टात आली. अर्थात दरवर्षी या काळात जागतिक नेत्यांच्या मांदियाळीमुळे न्यूयॉर्कमधील वाहतूकव्यवस्था पूर्ण बदलून जाते. यंदा तसे न झाल्याने न्यूयॉर्कवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about United Nations UN Secretary General Antonio Guterres