शिक्षकाच्या नजरेतून ऑनलाइन तास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

काही शाळांनी झूम अथवा तत्सम अॅप वापरून ऑनलाइन पद्धतीने तासिका घेण्याचा प्रयोग करून पाहिला. त्या अनुभवातून शिक्षकांना काय जाणवत आहे आणि त्यात काय सुधारणा करता येतील, याची चर्चा करणारा लेख.

देशात २२ मार्च रोजी अभूतपूर्व लॉकडाउन लागू झाल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून मागील सत्रात काही शाळांनी झूम अथवा तत्सम अॅप वापरून ऑनलाइन पद्धतीने तासिका घेण्याचा प्रयोग करून पाहिला. त्या अनुभवातून शिक्षकांना काय जाणवत आहे आणि त्यात काय सुधारणा करता येतील, याची चर्चा करणारा लेख. 

जूनमध्ये सुरू झालेल्या नवीन सत्रातही अनेक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने तासिका सुरू केल्या आहेत. यात मुख्य अडचण शिक्षकांना येते ती स्थित्यंतरात बदललेल्या शिक्षणशैलीशी जुळवून घेताना. अल्लड वयातील बालचमूच्या उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या वर्गात वर्षाचा तास सुरू करता न आल्याची हुरहूर त्यांना आहेच; पण जणू आपले प्रतिबिंबच असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समोर नसताना शिकवण्याची त्रेधासुद्धा तणावजनकच आहे. प्रत्येक शिक्षकाची एक शैली असते, ज्यामध्ये टप्प्याटप्प्यावर मुलांकडून प्रतिसाद घेत राहणे, त्यांना समोर बोलावून घेऊन एखादी कृती करून घेणे, मुद्दाम खोचक प्रश्न विचारून त्यांना विचार करण्यास उद्युक्त करणे, असे अनेक टप्पे समाविष्ट असतात. ज्याला शिक्षणतज्ज्ञ शिकवण्याचे शास्त्र (पेडागॉगि) म्हणतात. एरवी शिकवताना अतिशय सहजपणाने येणारे; पण अतिशय आवश्यक असे टप्पे जे गृहीत असतात, त्यातील अनेक टप्पे ऑनलाइन पद्धतीने शिकवताना येणाऱ्या स्वाभाविक मर्यादांमुळे सुटून जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

शंका आणि निरसनाच्या सहज प्रक्रियेत अडथळा : 
एरवी वर्गात विद्यार्थ्यांत आपापसात चाललेली बडबड हा वैतागाचा मुद्दा असतो; पण एखादा शिक्षक याच बडबडीचा अतिशय खुबीने उपयोग करून घेत त्याला अपेक्षित अशा विषयास पूरक अशी चर्चा घडवून आणतो, की त्या ‘बडबड’ प्रक्रियेतूनदेखील अनेक गोष्टी मुले शिकून जातात. वर्गात एरवी व्यत्यय म्हणून वाटणारी शंकेखोर मुले आणि त्यांच्या शंका हासुद्धा शिकवतानाचा असाधारण महत्त्व असलेला टप्पा आहे. टीचिंग स्ट्रॅटेजी ठरविताना यातील अनेक मुद्दे ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट करता येत नाहीत. किंबहुना ओढूनताणून तसा प्रयत्न केला, तर ते अव्यवहार्य ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

तांत्रिक प्रश्न : 

ऑनलाईन सत्रात अनेकदा मुलांच्या बाजूने जोडणीचे प्रश्न येतात. काही मुले मध्येच दाखल होतात, तर काही मध्येच बाहेर पडतात. आवाज, व्हिडिओ सुरू असेल तर अनेकदा तो तुटक स्वरूपात पोचत असतो. यात एकच गोष्ट अनेकदा सांगताना आणि मुख्य म्हणजे सलग शिकवण्यात वारंवार व्यत्यय आल्याने अध्यापकांच्या आवाजावरदेखील अवाजवी ताण येतो. केवळ शिक्षण क्षेत्रातील अध्यापकच नाही तर कॉर्पोरेट क्षेत्रात, अन्य व्यावसायिक क्षेत्रात जे गट व्यवस्थापक काहीतरी प्रशिक्षण देत असतात किंवा सूचना देत असतात, त्यांनाही या प्रकारच्या अडचणी जाणवू लागल्या आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपाय ‘ई-ऑडिओ लेसन प्लॅन’चा 
यावर एक मध्यममार्ग म्हणून अध्यापक ‘ई-ऑडिओ लेसन प्लॅन’ चा अवलंब करू शकतात. आणि या ‘ई-ऑडिओ लेसन प्लॅन’च्या धर्तीवर अन्य ई-प्रशिक्षण अथवा ई-मॅनेजमेंट करणारे वर्किंग प्रोफेशनल स्वतःचा ‘ई-ऑडिओ इंस्ट्रक्शन प्लॅन’ अमलात आणू शकतात. 

हा ई-लेसन प्लॅन आहे तरी काय? जणू आपण वर्गात अथवा वर्गसदृश ठिकाणी आहोत, अशा भावनेने ७ ते १० मिनिटांच्या सुट्या सुट्या २ ते ३ ऑडिओ रेकॉर्डिंग अध्यापकाने अथवा प्रशिक्षकाने आधीच ध्वनिमुद्रित करून ठेवाव्यात. त्या दिवसासाठीचा आशय अशाप्रकारे रेकॉर्ड करतांना मध्ये-मध्ये जे अवघड परवलीचे शब्द (की वर्ड), व्याख्या, आकृत्या अथवा सूत्रे एका वेगळ्या फोल्डरमध्ये सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात टाइप करून घ्याव्या. ऑनलाईन लेक्चर सुरू असताना एकीकडे ‘स्क्रीन शेअर’च्या माध्यमातून ती सॉफ्ट कॉपी शेअर करता येते अथवा चॅट बॉक्समधून या गोष्टी पाठवता येतात. 

वैयक्तिक शैलीची जपणूक 

आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या सूचना चालू करून त्यात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण शेअर केलेल्या सॉफ्ट कॉपीबरोबर ताडून बघण्याचे आवाहनदेखील मध्ये-मध्ये करता येईल. ती ऑडिओ फाईल ऐकून झाली, की मध्ये कुणाला शंका असल्यास एक आढावा घेऊन पुढचे रेकॉर्डिंग सुरू करावे. या प्रकारे तासिका घेतल्याने तीन मुख्य गोष्टी साध्य होऊ शकतात. एक तर मध्ये कुणाला व्यत्यय आला असेल, तर तासिका झाल्यावर रेकॉर्डिंग आपण परत पाठवू शकतो. दुसरे म्हणजे सतत स्क्रीन बघण्याऐवजी विद्यार्थ्याना मध्ये-मध्ये डोळ्यांना विश्रांती मिळते आणि तिसरे म्हणजे अध्यापकाला सलगतेने तासिका घेता येते. यात त्याची वैयक्तिक शैली काही प्रमाणात जपली जाऊन तासिका समाधानकारक रीतीने पुढे जात राहते आणि आवाजावरील ताणदेखील लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या स्थित्यंतराशी जुळवून घेताना कसरत करावी लागणारा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आतुरला आहे. विद्यार्थी चमूसुद्धा अस्वस्थ आहे. हे ऑनलाइन शिक्षण लवकर ‘अपॉन’लाईन म्हणजेच पूर्ववत रुळावर आल्याशिवाय दोघांना चैन पडणार नाही हे मात्र नक्की. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about what teachers online class experience & what can be improved