संत्राबागांच्या जीवन-मरणाचा प्रश्न : अनंत कोळमकर

अनंत कोळमकर
मंगळवार, 4 जून 2019

वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.

वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.

मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही म्हणायला गेल्या आठवड्यात एक दिवस जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. त्याने काहीसा थंडावा निर्माण झाला; पण तो पाऊसही सर्वत्र पडला नाही. तुकड्या-तुकड्यांत त्याने हजेरी लावली. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तापमान वाढलेच. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सूनच्या आगमनाला विदर्भात अजून पंधरवडा तरी लागणार. पण तो आणखी लांबला तर... तोवर कसे? पाण्याची पातळी खालावली आहे. धरणे, तलाव, जलाशयांनी तळ गाठला आहे. जेथून नागरी वस्त्यांना पाणीपुरवठा होतो, त्या जलाशयांचे स्वरूपही आता मोठ्या डबक्‍यापेक्षा वेगळे नाही. आताच पाण्याची आणीबाणी सुरू झाली आहे. अनेक भागांत दोन-दोन, तीन-तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. पण हे झाले वापरावयाच्या पाण्याबाबत. शेतीचे काय? विदर्भातील संत्रा प्रसिद्ध आहे. यंदाचे वाढते तापमान व पाण्याचा तुटवडा, या दुष्काळसदृश स्थितीमुळे संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. 

संत्रा उत्पादकांवर आर्थिक ताण
नागपूर, अमरावती, वर्धा हे जिल्हे संत्रा उत्पादनाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. मोसंबीची शेतीही मोठ्या प्रमाणात आहे. त्याबरोबरच संत्रा व मोसंबीची कलमे तयार करण्याचा व्यवसायही मोठा आहे. हे तिन्ही जिल्हे वर्धा नदीच्या खोऱ्यातील जिल्हे म्हणून ओळखले जातात. पण वर्धा नदीचे पात्रच कोरडे असेल, तेथे ते खोरे म्हणण्यालाही काय अर्थ आहे? ज्यांच्या शेतात विहिरी वा कूपनलिकांना पाणी आहे, ते कसेबसे संत्रा-मोसंबी झाडे वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. एकूणच भूजलपातळी खोल गेली आहे. अशा स्थितीत दुसरीकडून टॅंकरने पाणी आणायचे व झाडे जगवायचे याशिवाय दुसरा पर्याय नाही. अगोदरच सततच्या नापिकीने गांजलेल्या संत्रा बागाईतदाराला हा नवा खर्च आर्थिक अडचणीत आणणारा आहे. मुळात संत्रा व मोसंबीची झाडे फळावर येईस्तोवर जगवणे हेच त्रासदायक असते. चार-पाच वर्षांनंतर ती जेव्हा फळे देण्यासाठी लायक होतात, त्यानंतर त्याची निगा ठेवणे आवश्‍यक असते. उन्हाळ्यात मातीची व झाडांची मशागत, झाडांना डिंक्‍या रोगापासून वाचविण्यासाठी साली खरडणे, झाडांना बोरडा पेस्ट लावणे या साऱ्या कामात मोठा पैसा खर्च होतो. त्यात पुन्हा टॅंकरने पाणी देण्यासाठी वा विहिरी खोल करण्यासाठी वेगळा पैसा काढणे हा एक आर्थिक ताणच असतो. 

राजकीय पक्षांचेही दुर्लक्ष
ही स्थिती काही प्रमाणात २०१२मध्ये मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळासारखी आहे. त्या वेळच्या दुष्काळात जालना जिल्ह्यातील संत्राबागांची स्थिती हलाखीची झाली होती. तेव्हा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी तातडीने हालचाली करून प्रतिहेक्‍टर ३० हजार याप्रमाणे दोन हेक्‍टर बागांसाठी प्रत्येक बागाइतदाराला मदत जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्याचप्रमाणे या वर्षी विदर्भातील संत्रा-बागाईतदारांनाही मदत करण्याची गरज आहे. आतापर्यंत सारेच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत होते. आता ती धामधूम संपली आहे. तरीही अजून राजकीय पक्षांचे याकडे फारसे लक्ष गेलेले नाही. नाही म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी हा विषय पुढे आणला आहे. त्यांनी संत्रा बागाईतदारांना मदत करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. मात्र देशमुखांचा अपवाद वगळता कुणाही नेत्याने वा पक्षाने हा विषय मांडलेला नाही.

राज्य सरकारकडून अपेक्षा
राज्यात भाजपचे सरकार आहे आणि केंद्रातही त्याच पक्षाचे सरकार आले आहे. राज्यात चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रिपद आणि मदतीसाठी पैसा देणारे अर्थमंत्रिपद दोन्ही विदर्भाकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संत्रा बागाईतदारांच्या व्यथा माहीत आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे. 

चांगला, समाधानकारक पाऊस होईपर्यंत, म्हणजेच जवळपास येत्या महिनाभर तरी संत्रा बागा वाचवाव्या लागणार आहेत. याकडे वेळीच व तातडीने लक्ष दिले नाही तर ‘महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जाणारा हा संत्रापट्टा रखरखीत व्हायला वेळ लागणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Anant Kolamkar on Orange Horticulture