क्वारंटाइन न समजल्याने घात

Home-Quarantine
Home-Quarantine

होम क्वारंटाइन संकल्पना आपल्या सोयीसाठी आहे. होम क्वारंटाइनमध्ये नेमके काय करायचे, याविषयी नेमकी माहिती संबंधिताला दिल्यास त्याचे योग्य परिणाम आपल्याला दिसतील. अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य आणि कडक नियमांची आवश्‍यकता आहे.

कोरोनाची साथ महाराष्ट्रात प्रवेश करून दोन महिने झाले तरी अजून साथशास्रातील, इपिडीमीऑलोजीतील काही मुलभूत व्याख्या धोरण आखणी करणारे शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य समजून घेण्यास तयार नाही, हा वैद्यकीय अज्ञानाचा कळस आहे. यासाठी क्वारंटाइनचा इतिहास आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊ. चौदाव्या शतकात प्लेगची साथ आली तेव्हा बहुतांश प्रवास हा जहाजाने व्हायचा. एका देशातून दुसऱ्या देशात जहाजाने येणाऱ्या प्रवाशांना ४० दिवस वेगळे व एकत्र ठेवून त्यांची राहणे, जेवणाची सोय केली जायची. याला ग्रीकमध्ये quaranta giorni म्हणतात म्हणून क्वारंटाइन. प्लेगसह अन्य आजार, बाधीत व्यक्तीपासून होण्यास किमान एक व कमाल ४० दिवस लागतात. यलो फिवरची १८७८मधील व एकोणिसाव्या शतकातली कॉलराची साथ रोखण्यात गांभीर्याने राबवलेल्या क्वारंटाइनचा मोठा वाटा होता. चौदाव्या शतकात समजले ते आज कोरोनाविषयी कळेनासे झाले आहे.

होम क्वारंटाइन ही संकल्पना आपल्या सोयीसाठी आहे. बाधित देशातून आलेल्याला वेगळे ठेवण्यासाठी ‘तुझ्या घरी तू वेगळा राहा’ असा हातावर शिक्का मारून सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत परत पाठवतो, यासारखा विनोद या देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासात घडणार नाही. होम क्वारंटाइन पाळला जातोय का, यासाठी सिंगापूरसारखी लक्ष ठेवणारी सक्षम व्हिजिलन्स आपल्याकडे आहे का?

मुंबईसारख्या ठिकाणी काही प्रमाणात ती सुरू झाली आहे. तीही सदोष आणि जुजबीच आहे. हातावर शिक्का दिसल्यास पोलिसांना फोन करा एवढ्यावर विषय संपायला ही काही रात्री वाजणाऱ्या डीजे एवढी साधी गोष्ट वाटते आहे का? परिणामी शिक्षित, उच्चभ्रू लोकांनी ही संकल्पना धुडकावून लावली. यापुढे निम्न शिक्षित लोकांकडून काय अपेक्षा करता येईल? अजूनही वेळ गेलेली नाही. आजमितीला ११ हजार लोकांना होम क्वारंटाइनचे हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून आपण एकप्रकारे कोरोना पसरवण्याचे परवानेच दिले आहेत. साडेबारा कोटी लोकसंख्येच्या राज्याला ११ हजार लोकांना वेगळे ठेवून त्यांची १४ दिवस व्यवस्था ठेवणे एवढे अवघड आहे का? सव्वाशे कोटीच्या देशात परदेशातून येणाऱ्या सगळ्यांना जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात शिस्तबद्ध क्वारंटाइन केले असते तर आपण जगापुढे एक उदाहरण घालून दिले असते. अजूनही महाराष्ट्राला ही संधी आहे.

क्वारंटाइनमधील व्यक्तीला कुठलीही लक्षणे नसतात. त्याचा फक्त कोरोनाबाधीत देशात प्रवास झालेला असतो किंवा कोरोनाग्रस्त रुग्णाशी थेट संपर्क आलेला असतो. एकीकडे हा घटक आपण क्वारंटाइन मोडीत काढत समाजात कोरोना पसरवण्यासाठी मोकळे सोडत आहोत तसेच जास्तीत जास्त टेस्ट करून कोरोनाबाधीत व्यक्तीचा शोधही आपण घेत नाही. कमी टेस्टिंगमुळे कोरोनाचे आपले आकडे त्या मानाने कमी आहेत या आनंदात स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. हे सर्व शोधण्याची प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असावी. ही प्रक्रिया केवळ पुढील एक महिन्यासाठी राबवायची आहे. सध्या लॉक डाऊनमुळे ती सोपी आहे. मात्र ती यंत्रणेला थकवणारी असल्याने होम क्वारंटाइनची फसवी पळवाट शासनाने स्वीकारलेली दिसते. शासकीय इमारती आरोग्य खात्याने अधिग्रहीत करून तातडीने होम क्वारंटाइन मोडीत काढून थेट क्वारंटाइन सुरू करावे. सिंगापूरप्रमाणे होम क्वारंटाइनमध्ये प्रत्येकाला थोड्या-थोड्या वेळाने मेसेज करून त्याचे लोकेशन ट्रॅक करणे, त्यांच्या घरी भेटी देऊन चाचपणी करणे व होम क्वारंटाइनचे नियम मोडल्यास स्पेनप्रमाणे दंड आकारणे अशा गोष्टी कराव्यात. क्वारंटाइन किंवा कडक नियमांचे होम क्वारंटाइन या दोन्हीपैकी काहीही न केल्यास आपल्या देशाचा एका साथीने कसा घात केला, हा इतिहास भावी पिढीसाठी उरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com