टोळधाडीमुळे अन्न सुरक्षिततेचा प्रश्न

डॉ. नितीन उबाळे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

इराण, येमेन आणि नंतर पाकिस्तानमार्गे टोळधाडीने नोव्हेंबरमध्ये गुजरात व राजस्थानमध्ये प्रवेश केला. टोळधाडीमुळे या दोन राज्यांमध्ये सुमारे ३.५ लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दशकांत टोळधाडीमुळे जगभरात पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता उत्पादन, निर्यात, रोजगार आणि अन्न सुरक्षिततेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.  

इराण, येमेन आणि नंतर पाकिस्तानमार्गे टोळधाडीने नोव्हेंबरमध्ये गुजरात व राजस्थानमध्ये प्रवेश केला. टोळधाडीमुळे या दोन राज्यांमध्ये सुमारे ३.५ लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दशकांत टोळधाडीमुळे जगभरात पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता उत्पादन, निर्यात, रोजगार आणि अन्न सुरक्षिततेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगातील कोणताही मोठा भूखंड टोळांच्या उपद्रवापासून मुक्त नाही. वाळवंटीय टोळ (शिस्टोसर्का ग्रेगरिया), प्रवासी टोळ (लोकस्टा मायग्रेटोरिया) आणि मुंबई टोळ (नोमॅडक्रिस सक्‍सीकटा) या तीन जातींमुळे भारतातील पिकांचे व वनस्पतींचे वेळोवेळी मोठे नुकसान झाले आहे. खूप वेगाने दूरवर स्थलांतर करण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन क्षमता असल्याने टोळांच्या प्रजातींपैकी वाळवंटीय टोळ ही प्रजाती महत्त्वाची मानली जाते. वाळवंटीय टोळ हे पश्‍चिम आफ्रिका आणि भारत यांच्यामधील वाळवंटीय प्रदेशात आढळतात. ते नाकतोड्यापेक्षा आकार व रंगाने वेगळे असून आणि योग्य वातावरणाची स्थिती मिळाल्यास मोठ्या संख्येने वाढतात. मुबलक पाऊस पडून हिरवळ विकसित होते, तेव्हा वाळवंटीय टोळांची संख्या वाढते. एक-दोन महिन्यात प्रौढ टोळ लाखोंच्या घरात एकत्र येऊन झुंड तयार करतात.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये टोळधाडीने अरबी द्वीपकल्पापासून आफ्रिकेतील सुदान आणि एरिट्रिया देशामधील तांबडा समुद्र किनारपट्टीकडे स्थलांतर केले. परंतु, जानेवारी २०१९ मध्ये सुदान आणि इरिट्रियामध्ये पाऊस थांबल्यामुळे वनस्पती सुकण्यास सुरुवात झाली. फेब्रुवारीत येमेन, सौदी अरेबिया आणि इराणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मुबलक प्रमाणात हिरव्या वनस्पती वाढल्या. त्यामुळे टोळांचे स्थलांतर झाले. इराण आणि येमेनमध्ये टोळधाडीचे नियंत्रण कमी प्रमाणात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. मार्चमध्ये नैॡत्य पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात प्रवेश करून टोळधाडीने कापूस पिकाचे काही प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर सिंध आणि पंजाब प्रांतात शिरकाव करून कापूस, गहू, मका आदी पिकांचे नुकसान केले. गतवर्षी जूनमध्ये टोळधाडीने कापूस लागवड क्षेत्रापैकी २३ टक्के क्षेत्र असलेल्या सिंध प्रांतात मोर्चा वळविला. सिंध प्रांत हा गुजरात व राजस्थानच्या सीमालगतचा भूभाग आहे.

पंचवीस वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला
टोळधाडीने नोव्हेंबरच्या शेवटी पाकिस्तानातून गुजरात व राजस्थानमध्ये प्रवेश केला. मॉन्सून लांबल्यामुळे टोळांच्या प्रजोत्पादनासाठी योग्य वातावरण लाभले आणि त्यांची संख्या प्रचंड वाढली. गुजरातमधील बनासकांठा, मेहसाणा, कच्छ आणि पाटण, तर राजस्थानमधील जैसलमेर, बारमेर, जोधपूर, जालोर, हनुमानगढ, गंगानगर, बिकानेर आणि सिरोही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुजरात व राजस्थानमधील विविध जिल्ह्यांत मिळून ३.५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. देशातील गेल्या २५ वर्षांतील टोळधाडीचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे. यामुळे मोहरी, जिरे आणि गहू पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारताने नियंत्रणात्मक उपाय राबविल्याने भारत-पाकिस्तान सीमा प्रदेशात टोळधाडीचे प्रमाण व संख्या कमी होत असून, टोळसमूहाने पाकिस्तानकडे जाण्यास सुरुवात केली आहे. पूर ओसरल्यानंतर टोळ प्रजननासाठी नैसर्गिक परिस्थिती तयार होईल, त्यामुळे वसंत ऋतूत मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘एफएओ’च्या मते एका टोळझुंडीत सुमारे चार कोटी प्रौढ टोळ कीटक असतात जे एका दिवसांत ३५ हजार लोक किंवा दहा हत्ती किंवा २५ उंट  यांना आवश्‍यक एवढे अन्न खाऊ शकतात. यावरून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची तीव्रता समजू शकते. सद्यःस्थितीत हॉर्न ऑफ आफ्रिका प्रदेशातील स्थिती चिंताजनक असून, त्याचा अन्न सुरक्षितता आणि उपजीविकेवर  मोठा परिणाम होणार असल्याचे दिसते. सोमालियात लोकांच्या अन्नाचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे सुमारे १.९ कोटी लोकांवर तीव्र उपासमारीचे संकट येणार आहे. गेल्या दोन दशकांत टोळधाडीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे झालेले नुकसान व आर्थिक हानी लक्षात घेता उत्पादन, निर्यात, रोजगार आणि अन्न सुरक्षिततेवर त्याचा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. जोधपूर (राजस्थान) येथील ‘लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन’ ही टोळ सर्वेक्षण, टोळसमूहाची सद्यःस्थिती, हालचाल, प्रजोत्पादन आणि धोक्‍यासंबंधी आपल्या देशातील राज्यांना माहिती व इशारा देण्याचे काम करते.

वाळवंटीय टोळसमूह एका दिवसात साधारणपणे १५० किलोमीटर अंतर कापतात आणि बराच वेळ ते हवेत राहू शकतात. वाळवंटीय टोळ पश्‍चिम आफ्रिका आणि भारत यांच्यामधील साधारणपणे ३० देशांतील सुमारे १.६ कोटी चौरस किलोमीटर क्षेत्रावर त्यांचा वावर आढळतो. एवढ्या मोठ्या भौगोलिक व दुर्गम क्षेत्रातील टोळांचे नियंत्रण अशक्‍यप्राय होते. काही देशांत टोळधाड देखरेख व नियंत्रणासाठी मर्यादित संसाधने आहेत. तसेच काही देशांत रस्ते, संपर्क माध्यमे, पाणी आणि अन्न इत्यादी पायाभूत सुविधांची कमतरता आढळते. थेट टोळसमूहावर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून नियंत्रण करणे काही प्रमाणात शक्‍य आहे. तसेच टोळ ज्या प्रदेशात आढळतात तेथे पावसाची अनिश्‍चितता यामुळे त्यांचा उद्रेक केव्हा होईल याविषयी अंदाज बांधणे अवघड जाते.

नियंत्रणाच्या पद्धती
टोळधाडीचे नियंत्रण करण्यासाठी विविध पद्धती आहेत. त्यामध्ये ज्या ठिकाणी अंडी घातली असतील अशी ठिकाणे उकरणे, कीटकांना मारणे व जाळणे या पद्धतीचा वापर करता येतो. कीटकनाशक मिसळलेल्या भुकटीची धुरळणी आणि संहत व कमी प्रमाणात रासायनिक फवारणी या पद्धतीद्वारे काही प्रमाणात नियंत्रण करता येते.

मुख्यत्वे करून ऑरगॅनोफॉस्फेट प्रकारातील मॅलॅथिऑन कीटकनाशकाचा वापर नियंत्रणात्मक फवारणीसाठी केला जातो. परंतु पिकामध्ये ते नुकसान करत असताना रासायनिक फवारणीद्वारे नियंत्रण मिळविणे अशक्‍य होते. तसेच रासायनिक फवारणी केलेली पिके जनावरांच्या खाण्यात आल्यास ते धोकादायक ठरू शकते. अशा प्रकारे हवेतून फवारणीद्वारे नियंत्रण केल्याने पाणीसाठे आणि सेंद्रिय शेती क्षेत्रास धोका पोचू शकतो. टोळधाडीच्या घटनांचा इतिहास पाहता त्या ठराविक काळाने जगातील काही भागांत सातत्याने नुकसान करत असतात. त्यामुळे या किडीचा उद्रेक व होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी जैवकीडनाशकांवर संशोधन होणे गरजेचे आहे.
(लेखक गुजरातमधील पारुल विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr nitin ubale on The question of food safety due to locust