esakal | संवेदना जागविणारे ९/११ चे स्मारक
sakal

बोलून बातमी शोधा

९/११ हल्ल्यात मरण पावलेल्यांची नावे स्मृतिसंग्रहालयात कोरण्यात आली आहेत.

न्यूयॉर्कला यापूर्वी गेले होते, तेव्हा नुकतंच ९/११ घडून गेलेलं होते. त्यानंतर अलीकडेच त्या शहराला भेट दिली, तेव्हा ९/११च्या घटनेचे स्मारक बघण्याचा योग आला. ‘९/११ चा हा इतिहास अमेरिका कधीच विसरू शकणार नाही,’ आम्हांला हे प्रदर्शन दाखवणारा जॉर्ज सांगत होता.

संवेदना जागविणारे ९/११ चे स्मारक

sakal_logo
By
डॉ. प्राची जावडेकर

अमेरिकेतील प्रसिद्ध ट्‌विन टॉवरच्या स्मृती जागवणारे संग्रहालय म्हणजे मानवी संवेदनशीलतेला घातलेली साद. क्रूरतेला मानवतेने उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. ते पाहणारा कुणीही हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही.

न्यूयॉर्कला यापूर्वी गेले होते, तेव्हा नुकतंच ९/११ घडून गेलेलं होते. त्यानंतर अलीकडेच त्या शहराला भेट दिली, तेव्हा ९/११च्या घटनेचे स्मारक बघण्याचा योग आला. ‘९/११ चा हा इतिहास अमेरिका कधीच विसरू शकणार नाही,’ आम्हांला हे प्रदर्शन दाखवणारा जॉर्ज सांगत होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विस्तीर्ण परिसर, पाषाणाचे एकावर एक रचलेले दोन-तीन थर असणारी लांबट रचना मधोमध होती. पडलेल्या महाकाय टॉवरची झलक दाखवणारे. परिसराशी नातं राखणारे लांब-रुंद रस्ते, झाडं, त्यांचे सुबक चौथरे, समोर भव्य चौकोनी दोन हौद होते. त्याच्या चहूबाजूंनी हौदाच्या आत पाणी पडत होतं. हे स्मारक आहे, त्या अभागी जीवलगांचे, जे त्या दिवशी वाचू शकले नाहीत. ‘ते गेले. ते आमचे होते, आमच्या देशाचे होते आणि दहशतवादी हल्ल्यात आम्ही त्यांचं संरक्षण करु शकलो नाही.’ ही तेथील वाक्‍ये वाचून डोळे पाणावतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काठावर सुमारे तीन हजार जणांची नावे कोरली आहेत. जॉर्ज म्हणाला, ‘‘तिथे ते पांढरं फूल दिसतंय ना आज त्याचा वाढदिवस असतो. प्रत्येकाची माहिती आमच्याकडे आहे.’’ दूर कोणीतरी आप्ताचे नाव शोधून त्या काठावर हात फिरवून, ओठ टेकवून भिजल्या डोळ्यांनी आठवण काढत होते. हौदाजवळ बहुभाषिक, बहुदेशीय, वेगळ्या रंग, धर्म, पंथाचे पथिक उभे होते.  

कहाणी सांगणारा खांब
त्या संहारातले भग्नावशेष पाहताना, शेजारी नवा टॉवर उभा केला असूनही विध्वंसाची मनावर कोरलेली आठवण पुसली जात नाही. स्मृती संग्रहालयाचे तीन भाग केले आहेत. १) ९/११ चा दिवस. २) ९/११ पूर्वीचा आणि ३) ९/११ नंतरचा. आत एका बाजूला संग्रहालयाच्या ठिकाणी जाण्यासाठीचा जिना. ज्या देशातले लोक त्या ‘टॉवर’मध्ये मारले गेले, त्या सर्व ९० देशांचे झेंडे आणि बाजूला खालपासून वर आलेला महाकाय स्टिलचा खांब - ब्लॉक कॉलम त्या टॉवरचा; तुटलेला, वळलेला, गंजलेला; तरीही ताठपणे आपली कहाणी सांगणारा तो खांब. २०११मध्ये हे संग्रहालय लोकांसाठी खुलं झालं. आजपर्यंत लाखोंनी पाहिले. याचे आर्किटेक्‍ट मायकेल अराड आणि लॅंडस्केप आर्किटेक्‍ट पीटर वॉकर आहेत.

भावनांचा कल्लोळ
पंधरा हजार चौरस फूट जागेत ४० ते ६० फूट ऊंचीचे दालन म्हणजे ग्राऊंड झिरोची कहाणी. हे न्यूयॉर्कचे सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळ. जे संवेदना जागं करतं, विचार करायला लावतं. जे पाहून संतांच्या विश्वकल्याणाच्या विचारांचं स्मरण होतं. पहिलाच खांब कहाणीसहीत सोबत करत आत आला. आत समोर येत होती चित्र व त्यायोगे ९/११ची चित्तथरारक कथा. काही ब्लॅक अँड व्हाईट तर काही रंगीत छायाचित्रे. जिवाच्या आकांताने पळणारी माणसे त्यात दिसत होती. प्रत्येक छायाचित्रांतील डोळे म्हणजे मूर्तिमंत वेदना. त्या डोळ्यांत भीती, राग,चीड, हतबलता, विस्मय, अविश्वसनीय अतर्क्‍य, अचंबित करणारे, मुळापासून हादरवणारे असे भाव.

त्या क्षणी मला डोळ्यांसमोर येत होतं २६/११ रोजी जळणारे ताज हॉटेल. कसाब आणि त्याच्या साथीदारांचे क्रूरकर्मा, हुतात्मा झालेले आमचे करकरे, कामठे, साळसकर, ओंबाळे आणि इतर जवान आणि नागरिक. जॉर्ज म्हणाला, ‘हा त्या टॉवरच्या वास्तूचा शेवटचा खांब. ही समोर दिसणारी भिंत, तिने पुढचा अनर्थ टळला! ही हडसन नदी आणि ट्‌वीन टॉवरमधील भिंत. ती जर फुटली असती तर संहाराची भीषणता वाढली असती.’ पूल उतरून खाली आल्यावर समोर निळीशार टाइल्सची भिंत दिसली. तो म्हणाला, ‘त्या दिवशी न्यूयॉर्कर खूष होते, ऊन होते, नितळ आभाळ होतं, बर्फ यायचा होता, सकाळची लगबग होती, ऑफिसमध्ये आलेल्यांचं पहिला कॉफीचा कप, एकमेकांशी बोलणं सुरु होतं, तोच अचानक धक्का जाणवला’. प्रत्येकाची आठवण म्हणून एक टाइल. प्रत्येक टाइलची निळाई वेगळी, जशी माणसं वेगळी. एकूण २७९९ टाईल्स. ‘‘ या भिंतीपलीकडे आजही ज्यांची ओळख पटली नाही, असे ४० टक्के मृतदेह आहेत. परवाच त्यातील दोघांची ओळख पटली. आम्ही या साऱ्याचा शास्त्रोक्त अभ्यास करत आहोत.’’हे जॉर्जचे शब्द ऐकून सर्रकन काटाच आला अंगावर हे ऐकून.

एकोप्याचा, धैर्याचा संदेश
दुसरे दालन याचाच पुढचा भाग होता. बंद काचपेटीत किती काय काय जपून ठेवले होते. या अग्नीलोळातून वाचलेला हातरुमाल, तुटकी पर्स, डायरी, पेजर, पेनड्राईव्ह, चष्मा, पेन, मोबाईल कव्हर, लिपस्टिक, हेल्मेट, डायरीतली पाने, पुस्तक, ऑफिस स्टेशनरी, फोन, फाईल, वाहनांचे तुकडे, स्टिअरींग, कोणाचे ओळखपत्र, कोणाचे पास, कोणाचे पाकिट, जर्किनचे तुकडे, कारच्या चाव्या, कीबोर्ड, धातूच्या तुकड्यात अडकलेलं बायबल, अग्निशामक ट्रकचा भाग, सायकल स्टॅंड आणि त्यावर पार्क केलेल्या सायकली इत्यादी. हे सारं पाहतांना डोळे पाणावले, डोकं - पावलं जड झाली. ना कुठे कोणाविरुद्ध भाष्य, ना कुठल्या धर्माचा उच्चार, ना कोणत्या देशाची निंदा. भरुन राहिला होता तो केवळ संदेश - दहशतवादाचा सामना करण्याचा, विश्वशांततेचा, एकोप्याचा, धैर्याचा. 

Edited By - Prashant Patil