संशोधकीय वाटचालीचे द्विशतक

Deccan-College
Deccan-College

प्राचीन इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व आणि भाषाविज्ञान या क्षेत्रातील मूलभूत संशोधनात देशाचा गौरव वाढवणारे डेक्कन कॉलेज आज (ता. ६) दोनशेव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त संस्थेच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रिटिश गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी पेशवेकाळातील वेदशास्त्रांच्या पाठशाळांना मिळणाऱ्या वार्षिक दक्षिणेच्या प्रथेला पूर्णपणे नवे वळण दिले. दक्षिणेसाठीचा पैसा वापरून सहा ऑक्‍टोबर १८२१ रोजी, विजयादशमीच्या दिवशी पुण्याच्या विश्रामबागवाड्यात ‘िंहदू कॉलेज’ त्यांच्या प्रयत्नातून सुरू झाले. प्राचीन शास्त्रांबरोबर हिंदू लॉ व गणित या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला. पहिल्या वर्षी १४३ विद्यार्थ्यांना आकर्षित करून कॉलेजने भक्कम मुहूर्तमेढ रोवली खरी; पण त्याचे महत्त्व सरकारला पटवण्यासाठी एलफिन्स्टन यांना मोठा संघर्ष करावा लागला. पुढे इंग्रजी शिक्षणाचा समावेश करून १८५१मध्ये कॉलेजला नवीन रूप देण्यात आले.

‘पूना संस्कृत कॉलेज’ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पहिले प्रिन्सिपल सर थॉमस कॅन्डी, त्याच्यानंतर सर डब्ल्यू. ए. अर्नोल्ड, विल्यम वर्डसवर्थ (प्रसिद्ध कवीचे नातू) अशा थोर व्यक्तींनी या पदाची धुरा समर्थपणे सांभाळत दक्षिण इलाख्यात कॉलेजला नावलौकिक मिळवून दिला. पुढे शहराबाहेर गॉथिक रचनेत बांधलेल्या दिमाखदार वास्तूत १८६८ मध्ये कॉलेजचे स्थलांतर झाले आणि ‘डेक्कन कॉलेज’ असे नावही प्राप्त झाले.  

संघर्षानंतर कॉलेजला नवे रूप
सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, किलहोर्न या नामवंतांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द येथे घडली, तर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गुरुदेव रानडे, डॉ. द्वारकानाथ कोटणीस अशा अनेकांनी अध्ययनाचे धडे डेक्कन कॉलेजमध्ये घेतले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी पुणे परिसरात अनेक शिक्षण संस्था उदयाला आल्या. १९व्या शतकात अग्रणी ठरलेले डेक्कन कॉलेज विद्यार्थीसंख्या रोडावल्याने बंद करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला.

माजी विद्यार्थ्यांनी याविरुद्ध मोठा लढा दिला. उच्च न्यायालयानेही त्यांच्या बाजूने निर्णय देत सरकारला हे कॉलेज पुन्हा सुरू करून कायमस्वरूपी त्याची जबाबदारी उचलण्याचा आदेश दिला. परिणामी, १७ ऑगस्ट १९३९ रोजी डेक्कन कॉलेजची पुनःस्थापना झाली. ‘पदव्युत्तर व संशोधन संस्था’ या नव्या रूपात ते पुुन्हा सुरू झाले. ही घटना केवळ कॉलेजसाठी महत्त्वाची नव्हती, तर देशातील शिक्षण व संशोधन क्षेत्राच्या भाग्योदयाशी ती निगडित होती. भारतात पुरातत्त्व व भाषाशास्त्र या दोन महत्त्वपूर्ण विद्याशाखांचा प्रारंभ आणि विकासाचा भाग्यलेख या घटनेत लिहिलेला होता.

संस्कृत शब्दकोश प्रकल्प
पहिले संचालक व भाषाशास्त्रज्ञ डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा सर्वांगीण विकास होऊ लागला. भारतातली पहिली ध्वनिशास्त्र प्रयोगशाळा डेक्कन कॉलेजमध्ये सुरू झाली. रॉकफेलर फाऊंडेशनच्या अनुदानातून मोठे संशोधन प्रकल्पही सुरू झाले. प्राचीन भाषांच्या तौलनिक अभ्यासासाठी प्रमाण शब्दकोशांची गरज होती. त्यासाठी डॉ. कत्रे यांनी संस्थेमध्ये ऐतिहासिक तत्त्वांवर आधारित संस्कृत शब्दकोश प्रकल्प सुरू केला. ऋग्वेदापासून अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत निर्माण झालेल्या सुमारे दोन हजार ग्रंथांचे वाचन संस्थेमध्ये झाले. त्यातून तेवीस लाख शब्दांच्या एक कोटी संदर्भांनी युक्त असे स्क्रिप्टोरियम सुसज्ज झाले. पुरातत्त्वीय अवशेषांच्या अभ्यासाबरोबरच वाङ्मयीन पुराव्यांच्या अभ्यासासाठी प्रमाणभूत साधन याद्वारे उपलब्ध झाले. या कोशाचे ३४ खंड प्रकाशित झाले आहेत. 

बहुविद्याशाखीय अभ्यास 
डॉ. कत्रे यांनी भाषाविज्ञानासाठी जे अग्रगण्य कार्य केले, तेच  डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया यांनी पुरातत्त्वशास्त्रासाठी केले. त्यांच्या पुढाकाराने देशातील पहिला पुरातत्त्वशास्त्राचा विभाग कॉलेजमध्ये सुरू झाला. या विभागाने प्रागैतिहासिक, इतिहासपूर्व व ऐतिहासिक काळाशी संबंधित ठिकाणी व्यापक उत्खनने हाती घेतली. नेवासा, इनामगाव, नायकुंड, भीमबेटका, बालाथल, लोथल, जुन्नर, फर्माना, राखीगडी अशी विशेष उल्लेखनीय स्थळे आहेत. या विभागातील संशोधकांनी उत्खनन न केलेला प्रदेश भारताच्या नकाशावर अपवादानेच आढळेल. इनामगाव येथील उत्खननाने आद्य शेतकरी समूहाची जीवनशैली उजेडात आणली, त्याचबरोबर अवशेषांच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धत व संशोधन मानकेसुद्धा जगासमोर ठेवली. प्राचीन अवशेषांचे शास्त्रीय विश्‍लेषण करण्यासाठी नऊ सुसज्ज प्रयोगशाळा, विविध कालखंडातील संस्कृतींचे दर्शन घडवणाऱ्या नऊ दालनांनी परिपूर्ण असे पुरावस्तुसंग्रहालय ही या विभागाची संपदा आहे.

प्राचीन इतिहास, मानव्यशास्त्र, मूर्ती व स्थापत्यशास्त्र, चित्रकला, नाणकशास्त्र, पुराभिलेख, प्राचीन साहित्य अशा अनेक विद्याशाखा येथे अभ्यासल्या जातात. डॉ. इरावती कर्वे, डॉ. सी. आर. शंकरन, डॉ. शां. भा. देव, डॉ. अ. मा. घाटगे, डॉ. अशोक केळकर, डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. वी. ना. मिश्रा, डॉ. शोभना गोखले, डॉ. गो. बं. देगलूरकर अशा मान्यवरांनी अध्ययन-अध्यापन आणि ग्रंथलेखन करून संस्थेला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला. संस्थेच्या अद्वितीय कार्याची नोंद घेऊन १९९४ मध्ये ‘यूजीसी’ने संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. तेव्हापासून संस्थेत पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र व संस्कृत कोशशास्त्र या तीन विभागांत स्वतंत्र पदव्युत्तर अभ्यासक्रम व त्यांच्या जोडीला संशोधन पद्धती, सागरीय पुरातत्त्व, सांस्कृतिक वारसा जतन- संवर्धन, बौद्ध परंपरा, पर्शियन, इटालियन, जपानी, व संस्कृत भाषांचे प्रमाणपत्र असे अभ्यासक्रम चालू आहेत. ऑक्‍सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांसह ३५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांसमवेत डेक्कन कॉलेजचे शैक्षणिक करार आहेत. सुमारे दोन लाख ग्रंथ, ४१४ शोधपत्रकांची आवक, लोकमान्य टिळकांसह १२ अभ्यासकांचा पुस्तकसंच हा येथील ग्रंथालयाचा मौल्यवान ठेवा आहे. संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, वस्तुसंग्रहालय, व संस्कृत स्क्रिप्टोरियम ही पायाभूत संशोधनाची संसाधने अभ्यासकांना वरदान ठरली आहेत. 

अभ्यास योजनांचा संकल्प 
प्राचीन इतिहास, संस्कृत आदी विविध विषयांतील संशोधनाचे नवनवे प्रकल्प संस्थेतर्फे हाती घेतले जातात. पुढच्या काळात मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण व प्रतिमांकन, तसेच गोरेवाडा, जुन्नर, बोरी येथील उत्खनन व अवशेषांचे संरक्षण-संवर्धन या विद्यमान प्रकल्पांचे काम पुढे नेण्यात येईल.  इतरही उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत. आगामी वर्षात नवीन छोटे अभ्यासक्रम, शैक्षणिक व्याख्याने, ग्रंथांचे लेखन व संपादन करण्याची योजना आहे. 
(लेखक डेक्कन कॉलेजचे प्रभारी कुलगुरू आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com