‘कोरोना’शी लढा - वैद्यकीय, वैयक्तिक, की सामाजिक?

डॉ. क्षमा देवशटवार उपलेंचवार
शुक्रवार, 22 मे 2020

आपण सर्वांनी स्वतःशी अशी प्रतिज्ञा करायला हवी

  • नितांत गरज असल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही. 
  • प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारेन... ‘हे नाही केले तर चालणार आहे का..?’ 
  • ज्येष्ठ नागरिक , गरोदर स्त्रिया व लहान मुले यांना विनाकारण घराबाहेर पडू देणार नाही. 
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार, फळे यांचे सेवन करेन.
  • मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, ध्यान, स्तोत्रपठण (ऐच्छिक) किंवा संगीत आदी. 
  • आप्तेष्टांना प्रत्यक्ष भेटणे टाळेन. (सोशल मीडिया व ऑनलाईन पर्याय आहेतच.) 
  • बाहेर पडणे अनिवार्य असेल तर सॅनिटायजर, हात धुणे, मास्क वापरणे, योग्य अंतर पाळणे यांचे कटाक्षाने पालन करेन. 
  • योग्य त्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरणार नाही.
  • लक्षणे असतील तर घाबरून जाऊन ती डॉक्‍टर व संपर्कातील व्यक्ती यांच्यापासून लपवणार नाही.
  • स्वावलंबी बनेन. स्वतः ची शक्‍य तितकी कामे स्वतः करेन.

‘कोरोना’च्या विरोधातील लढ्यात यशस्वी व्हायचे असेल, तर ते फक्त प्रशासन, डॉक्‍टर व वैद्यकीय यंत्रणा यांच्या हातात नसून, एक सूज्ञ समाज म्हणून आपण सगळे या परिस्थितीत कसे वागतो, यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तेव्हा प्रत्येकाने ‘स्वयंशिस्तीच्या दशसूत्री’चा अवलंब केल्यास आपण यशस्वीपणे ‘कोरोना’चा प्रतिकार करू शकू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या जगभर चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे ‘कोरोना’ (कोविड-१९). सोशल मीडिया असो किंवा टीव्ही, सर्वत्र एकच चर्चा... आजचा आकडा किती? या देशाचा?...त्या देशाचा? ...आपल्या राज्याचा आणि आपल्या शहराचा? पण खरेच, जास्त महत्त्वाचे काय आहे? हे आकडे, की दुसरेच काही? जे कदाचित आपल्याला उमगलं नसेल! एक डॉक्‍टर म्हणून, मी हा आजार, त्याचे सामाजिक आणि वैद्यकीय परिणाम आणि समाजातील विविध स्तरांतून येणाऱ्या सामाजिक प्रतिक्रिया (Social Behaviour) यांचे अवलोकन केले, तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एकीकडे हृदयविकाराचा झटका आलेला असताना, केवळ ‘कोरोना’च्या भीतीने हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे जीव गमावलेला रुग्ण आम्हाला दिसतो, (ज्याला वाचवणे कदाचित शक्‍य होते.) दुसरीकडे घरी जाताना दारूच्या दुकानासमोर किंवा भाजीच्या दुकानासमोर परस्परांमध्ये योग्य अंतर न ठेवता, गर्दी करणारे ग्राहक दिसतात. समाजामधील ‘कोविड’विषयीच्या प्रतिक्रियेतील हा विरोधाभास मला जनजागृतीच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देऊन गेला, म्हणून हा लेखनप्रपंच...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या लढ्यात यशस्वी व्हायचे असेल, तर ते फक्त प्रशासन, डॉक्‍टर व वैद्यकीय यंत्रणा यांच्या हातात नसून, एक सूज्ञ समाज म्हणून आपण या परिस्थितीत कसे वागतो, ती कशी हाताळतो यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कुठेतरी, एका परिपक्व व संतुलित सामाजिक वर्तणुकीची नितांत गरज आहे. आतापर्यंत जे वैयक्तिक जीवनशैलीशी निगडित आजार होते, जसे की हृदयविकार, मधुमेह, स्थूलपणा, रक्तदाब यात आपण भारतीय जगभरात आघाडीवर होतो.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती व डॉक्‍टर यांच्यामुळे अद्ययावत पद्धतीने आपण यावर यशस्वी उपचार करू शकत होतो. मात्र ‘कोरोना’चे चित्र यापेक्षा फारच वेगळे आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. इथे आपल्या वैयक्तिक स्वच्छतेमुळे व सामाजिक वागणुकीमुळे केवळ आपलेच नाही, तर समाजाचे, देशाचे, पर्यायाने कदाचित जगाचे भवितव्य बदलणार आहे. म्हणूनच, एक व्यक्ती म्हणूनच नाही, तर एक समाज म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून आपल्याला आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. तुम्ही आम्ही विनाकारण घराबाहेर पडू नये, एकमेकांत अंतर ठेवावे, हे सांगण्यासाठी पोलिसांना आपले प्राण धोक्‍यात घालून उभे राहायला आपण भाग पाडणार आहोत काय? की परिस्थितीचे गांभीर्य समजून घेऊन पोलिस असो अथवा नसो, लॉकडाउन असो वा नसो, आपण स्वतःच शिस्त पाळणार आहोत ?

‘कोरोना’च्या बाबतीत सामाजिक वर्तणुकीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘कोरोना’ हा नवीन विषाणू असल्यामुळे, आपल्याकडे असलेले वैज्ञानिक ज्ञानही काहीसे अपुरे आहे. रोज नवनवीन तथ्ये समोर येत आहेत.

जगभरातील डॉक्‍टर एकमेकांच्या संपर्कात असून अनुभवांची देवाणघेवाण करत आहेत. योग्य उपचार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. अगदी स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्‍यात घालून... प्रतिबंधक लस निर्माण करण्यासाठी संशोधन चालू आहे. थोडक्‍यात, उपचार व त्यांच्या यशाबद्दल मर्यादा आहेत. मग आपल्या हातात एकच परिणामी अस्त्र आहे. ते म्हणजे आपले वागणे.

आता ‘कोरोना’बद्दलची एक जमेची (?) बाजू. सद्यःस्थितीत आपल्याला हा आजार कसा होतो, त्याचा प्रसार कसा होतो व प्रसार रोखता कसा येतो याबद्दलची पुरेशी माहिती आहे. म्हणजे, आपण एक जबाबदार नागरिक व समाज म्हणून जे योगदान द्यायचे आहे, ते फार कठीण आहे काय? कदाचित ते फारच सोपे आहे, पण आपल्याला मनापासून पटलं तर!

प्रत्येक नागरिकाने या ‘स्वयंशिस्तीच्या दशसूत्री’चा अवलंब केल्यास पोलिस, प्रशासन व वैद्यकीय यंत्रणेवर बोजा पडू न देता आपण यशस्वीपणे ‘कोरोना’चा प्रतिकार करू शकू व टप्प्याटप्याने सर्व व्यवहार व पर्यायाने अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करू शकू. सगळ्यात महत्त्वाचे, हे सारे कधीपर्यंत? लॉकडाउन संपेपर्यंत? नाही... पुढील सूचना येईपर्यंत. कदाचित तोपर्यंत सुधारित जीवनशैली व ‘कोरोना’ यांच्यासह मार्गक्रमण करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. तेव्हा या ‘दशसूत्री’चा अवलंब करूया व 
‘कोरोना’ला हरवूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shama devshatwar uaplenchwar on corona