esakal | माणुसकीचा सेतू
sakal

बोलून बातमी शोधा

माणुसकीचा सेतू

स्त्रीमुक्ती चळवळ, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अन्य पुरोगामी चळवळी यांच्याशी नाळेचं नातं असणाऱ्या इतिहासाच्या प्राध्यापक कुलसूम पारेख यांची यंदा जन्मशताब्दी. त्या निमित्तानं त्यांच्या वाटचालीविषयी.

माणुसकीचा सेतू

sakal_logo
By
डॉ. गीताली वि. मं.

स्त्रीमुक्ती चळवळ, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अन्य पुरोगामी चळवळी यांच्याशी नाळेचं नातं असणाऱ्या इतिहासाच्या प्राध्यापक कुलसूम पारेख यांची यंदा जन्मशताब्दी. त्या निमित्तानं त्यांच्या वाटचालीविषयी.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘मी नेहमीच अनेक लढाया हरत राहते, शेवटी युद्ध मात्र जिंकते,’ असं म्हणणाऱ्या प्रा. कुलसूम पारेख या विदुषीचं ८५ वर्षांचं आयुष्य म्हणजे एक मिथक कथा वाटावी असं होतं. राजकीय - सामाजिक भान असणाऱ्या पारेखांचं घर म्हणजे चळवळीचं घर. तात्त्विक भूमिकेचा फार बडेजाव न करता आपल्याला पटलेल्या, स्वीकारलेल्या मूल्यांनुसार त्या आपलं आयुष्य बिनधास्तपणे जगल्या. संपूर्ण जीवन त्या मनस्वीपणे, प्रस्थापित धार्मिक, कौटुंबिक आणि सामाजिक चौकटीला छेद देत जगल्या. त्यांचा आणि माझा परिचय १९८७ मध्ये आमच्या ‘पुरुष उवाच’ गटाचा मित्र अभय कांता याच्यामुळे झाला. अभय त्यांना ‘मम्मी’ म्हणायचा, त्यामुळे आम्ही सर्वच त्यांना मम्मी म्हणायला लागलो आणि त्या पुणे-साताऱ्यातल्या लोकांसाठी ‘जगन्मम्मी’ झाल्या. हिंदू-मुस्लिमांशी त्यांचा जवळचा नातेसंबंध आणि घरोबा. त्यामुळे दोन्ही धर्मांतल्या मानवी नातेसंबंधांच्या त्या साक्षीदार. दोन्ही धर्मांतल्या पुरुषांकडून त्यांना एक स्त्री म्हणून घृणास्पद अनुभवही आले, मात्र तरीही स्त्री-पुरुष नात्यातला व्यामिश्र गोडवा त्यांनी मनापासून जपला. कारण नवे विचार, नवा दृष्टिकोन सहजी स्वीकारणारं त्यांचं मोकळं मन! त्यांचं वाचन दांडगं होतं, त्यांनी देश-विदेशी प्रवास केला होता. खूप श्रीमंती, तशीच कर्जबाजारी अवस्थाही अनुभवली होती. त्यामुळे त्यांचं अनुभवविश्‍व खूप समृद्ध होतं. त्यांच्याबरोबर राजकीय-सामाजिक विषयांवर गप्पा मारायला सर्वांनाच आवडायचं. शिवाय त्या स्वतः खाण्याच्या आणि खिलवण्याच्या बाबतीत रसिक होत्या.

मुंबईतल्या इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये त्यांनी ३५ वर्षे इतिहास हा विषय शिकवला. फाळणीनंतर कॉलेज बंद पडायची वेळ आली, तेव्हा ते वाचवून भरभराटीला आणण्यात कुलसूम पारेख यांचा मोठा वाटा होता. कॉलेजमध्ये जमातवादी वातावरण न होण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या. विद्यार्थ्यांमध्ये त्या प्रिय होत्या. वाद-विवाद, चर्चा विद्यार्थ्यांबरोबर सतत चालू असत. त्याचा एक आवडता विद्यार्थी म्हणजे हमीद दलवाई.

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सात मुस्लिम स्त्रियांचा हमीद यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला आणि समान नागरी कायद्याची मागणी केली. सरकारी नोकरीच्या बंधनामुळं मम्मी मोर्चात सहभागी झाल्या नाहीत. पण त्यांच्या विद्यार्थिनी त्यात होत्या. मुस्लिम वृत्तपत्रांनी यावर काहूर माजवलं. पडद्यामागे असूनही त्यांच्या घरावर दगड पडायला लागले. धमकीची निनावी पत्रं, फोन यायला लागले. पण मम्मी डगमगल्या नाहीत.

हमीदची आक्रमक शैली त्यांना पटायची नाही. सौम्यपणे मुस्लिम समाजाशी संवाद साधावा, असं त्यांचं मत होतं. अर्थात असे काही मतभेद असले तरी हमीद यांच्याविषयी त्यांना नितांत आदर होता.

मम्मींची जीवनकहाणी सांगणारं ‘उम्मे कुलसूम’ हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. या पुस्तकातल्या मम्मीचं दर्शन म्हणजे ‘विश्‍वरूप दर्शन’ आहे. ते वाचूनच मला गरगरायला लागलं. मम्मीना आपण ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ असं वागवलं याचा सल मनाला टोचतो आहे. जवळजवळ एक शतकाचा सामाजिक - कौटुंबिक वास्तवाचा पट, हिंदू-मुस्लिम नातेसंबंधांचा हा मौल्यवान ऐवज आहे. ‘‘हिंदू पुरुषाबरोबर राहते म्हणून मुस्लिमांनी मला धर्मांतरित ठरवलं, तर हिंदू मला ‘राष्ट्रीय मुसलमानाचा बुरखा घेतलेली पाकिस्तानची हेर म्हणत,’’ असं मम्मी सांगत, तेव्हा मनात त्यांच्याविषयी करुणा दाटून यायची आणि त्याचवेळी धर्मांध मानसिकतेविषयी चीड! मम्मी म्हणत, ‘‘मी हिंदूंमधील खोल रुजलेल्या सांस्कृतिक वर्चस्ववादाचा तिरस्कार करते. पण तेवढाच मुसलमानांच्या अंधश्रद्धा आणि अविवेकी धारणांचा तिरस्कार करते. मला मुस्लिम संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टी आवडतात, तसंच हिंदू संस्कृतीतील व्यक्तिवादी आणि उदारमतवादी दृष्टिकोनही फार महत्त्वाचा वाटतो.’’

अशा या आमच्या मम्मी म्हणजे प्रा. कुलसूम पारेख म्हणजे हिंदू-मुस्लिमांमधला माणुसकीचा सेतू होता.

loading image
go to top