पडद्यावरचा मुसाफिर

Irfan-Khan
Irfan-Khan

किरकोळ शरीरयष्टी, कुरळे केस आणि मोठाले डोळे....हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता होण्यासाठीची कोणतीही वैशिष्ट्यं या वर्णनात नाहीत...मात्र, आपल्या थेट भिडणाऱ्या उत्तुंग अभिनयानं, जबरदस्त आवाजानं चंदेरी दुनियेत गेली अनेक वर्षे व्यापून टाकलेल्या इरफान खानचं जाणं सिनेचाहत्यांना अगदी आतून चटका लावून गेलं. कर्करोगासारखा गंभीर आजार, त्यावर काही प्रमाणात मात केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच आईचं झालेलं निधन व लॉकडाउनमुळं तिचं न घेता आलेलं अंत्यदर्शन या गोष्टी या हळव्या कलाकाराला नक्कीच आतून जखमी करून गेल्या असतील. 

हिंदी चित्रपटसृष्टी देखण्या व चॉकलेट हिरोंच्याच प्रेमात असल्याचा काळ खरंतर समांतर सिनेमा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात कमी झाला होता. तरीही, त्याला ‘लार्जर दॅन लाइफ’ दाखविण्याची अहमहमिका चित्रपटसृष्टीत सुरू होतीच. मीरा नायर यांचा ‘सलाम बाँबे’ हा ऐंशीच्या दशकाच्या शेवटी आलेला चित्रपट; त्यात पुन्हा एकदा अगदी सामान्य माणसाचं, थेट झोपडपट्टीतील जगणं चितारलं गेलं. या चित्रपटात छोट्या भूमिकेत इरफान सर्वप्रथम चमकला. त्यानंतरही दूरचित्रवाणीवरील मालिका व चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांतून त्याचं दर्शन होत राहिलं. या संघर्षाबद्दल पुण्यात एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला होता, ‘‘यश सहज मिळणार नाही, हे माहीत होतं. मात्र, कष्ट व संस्कार कमी पडू द्यायचे नाहीत, हे ठरवून संघर्ष करीत राहिलो. आपलं अभिनयाचं नाणं खणखणीत असल्यानं ते वाजणारच, याची खात्री होती. यथावकाश यश चालून आलं, मात्र आता ते डोक्‍यात जाऊ नये म्हणून संघर्ष करतोय...’’  

सुरुवातीच्या काळात संघर्ष करणाऱ्या अनेक कलाकारांप्रमाणं इरफान छोट्या पडद्यावर झळकत होता, ऐतिहासिक मालिकांमध्ये पल्लेदार संवाद फेकत, आपल्या डोळ्यांनी जरब बसवत प्रेक्षकांचं लक्ष वेधत होता. अनेक चित्रपटांतील त्याच्या छोट्याशा भूमिकेतील अभिनयाचीही प्रेक्षक चर्चा करीत होते, मात्र पारंपरिक नायकाच्या भूमिका त्याच्यापासून दूरच होत्या. बासू चटर्जींचा ‘कमला की मौत’ व आसिफ कापडियाचा ‘द वॉरिअर’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांचं कौतुक झालं. ‘द वॉरिअर’ अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजल्यावर इरफानचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला. पुढं २००५ मधील ‘हासिल’ या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकासाठीचा ‘ फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला व परीक्षकही त्याच्या हादरवून टाकणाऱ्या आवाजाचं आणि डोळ्यांतील अंगाराचं तोंडभरून कौतुक करू लागले. इरफानच्या अभिनयाच्या कक्षा रुंदावत गेल्या. ‘मेट्रो’ आणि ‘द नेमसेक’सारख्या हिंदी व ‘अ मायटी हार्ट’, ‘द दार्जिलिंग लिमिटेड’, ‘स्लमडॉग मिलेनिअर’सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांतील त्याच्या भूमिकांचं मोठं कौतुक झालं. तो हॉलिवूडही गाजवत राहिला. ‘पानसिंग तोमर’ या सत्यघटनेवर आधारित चित्रपटानं त्याला घराघरांत पोचवलं. त्याचा पुढचा चित्रपट कोणता, याची वाट प्रेक्षक पाहू लागले. विशाल भारद्वाजच्या ‘मकबुल’, ‘हैदर’ आणि रितेश बत्राच्या ‘लंचबॉक्‍स‘सारख्या चित्रपटांतील हळव्या भूमिका, ‘तलवार’ आणि ‘जज्बा’सारख्या डॅशिंग भूमिका किंवा ‘पिकू’, ‘करीब करीब सिंगल’, ‘कारवां’, ‘हिंदी मीडिअम’सारख्या हलक्‍या फुलक्‍या भूमिका... प्रेक्षक त्याला प्रत्येक भूमिकेत मनापासून स्वीकारू लागले होते. त्याच्या दूरचित्रवाणीवरील जाहिरातीही लक्षवेधक ठरत होत्या.

‘अंग्रेजी मीडिअम’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला कर्करोगानं गाठलं. मोठ्या कष्टानं त्यानं या चित्रपटातील भूमिका साकारली. हा चित्रपट पाहताना आजारानं त्याच्या शरीरावर पडत असलेला ताण लक्षात येत होता. मात्र, लढवय्या इरफान यातून सहज बाहेर पडेल आणि आपल्या नेहमीच्या शैलीत अभिनय करीत जगभरातील प्रेक्षकांना पुन्हा मंत्रमुग्ध करेल, याबद्दल प्रेक्षकांना खात्री होती. मात्र, तसं व्हायचं नव्हतं. त्याच्या एका जाहिरातीतील दिव्याचं वर्णन तो ‘लाइट्‌सइअर अहेड...’ असं करतो. इरफानचा अभिनयही असाच काळाच्या पुढचा होता! रूपेरी पडद्यावरच्या या मुसाफिराने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आणि त्याच वेगाने  तो आपल्यातून निघुन गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com