कालिदासाचा काळ कोणता?

डॉ. स. मो. अयाचित
बुधवार, 3 जुलै 2019

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने कालिदासाचा नेमका काळ कोणता, याबाबत समोर आलेली माहिती.

मॅक्‌मिलन कंपनीने १९२० मध्ये कालिदासाच्या ‘शाकुंतल’ नाटकाचे इंग्रजीत रूपांतर करून संस्कृताशी अनभिज्ञ असलेल्या आंग्ल समाजासाठी प्रसिद्ध केले. नंतर त्याची पुनर्मुद्रणे १९३७, १९४४ आणि १९४५ मध्ये आली. कोलकत्याच्या नॅशनल कॉलेजमधील पेंढरकर (की पेंढारकर) नावाच्या मराठी मुलीचे हस्ताक्षर असलेली या रूपांतराची एक प्रत मला मिळाली, अर्थात ती जुनी दिसते. हे रूपांतर केदारनाथ दासगुप्ता यांनी केले, असा उल्लेख त्यातील १९४५च्या वर्तमान आवृत्तीच्या प्रस्तावनेत आहे. त्याखाली प्रस्तावना लेखकाची एल.बी.अशी सही आहे. या आवृत्तीत आरंभी रवींद्रनाथ ठाकूरांचा कालिदासावरील (मूळ बंगालीतील, पण नंतर जदुनाथ सरकारांनी इंग्रजी अनुवादिलेला) एक लेख आहे. ठाकूरांच्या विवेचनाकडे वळण्यापूर्वी कालिदासाच्या काळाबद्दल विचार करू.

स्वतंत्रपणे एकच निष्कर्ष 
केदारनाथ दासगुप्ता यांनी (१९४५ ची आवृत्ती) आंग्ल वाचकांसाठी माहिती दिली आहे.  ते म्हणतात, ‘आता कालिदासाचा काळ निर्णायकपणे सिद्ध झाला आहे.’ याचे श्रेय ते डॉ. टी. ब्लॉक व पंडित रामावतार शर्मा यांना देतात. यातील एक युरोपात व दुसरा भारतात असला, तरी त्यांनी स्वतंत्रपणे एकच निष्कर्ष काढला. कालिदास हा दुसरा चंद्रगुप्त व त्यानंतरचा कुमारगुप्त यांच्या काळात चौथ्या शतकात होता.

कालिदासाचा काळ डॉ. वा. वि. मिराशी यांनी चौथ्या-पाचव्या शतकात असल्याचे मत मांडले आणि ते सर्वमान्य झाल्यासारखे दिसते; परंतु अद्याप कालिदासाचा काळ ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील विक्रमादित्याचा होता व कालिदास त्याच्या दरबारी होता, असे काही अभ्यासक मानतात. विसाव्या शतकापर्यंत विक्रमादित्य नावाचा कोणी सम्राट ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात होता, हेच मान्य झाले नव्हते; परंतु उज्जैनच्या ‘सिंदिया ओरिएण्टल्‌ इन्स्टिट्यूट’चे क्‍यूरेटर डॉ. स. ल. कात्रे यांनी कवींद्राचार्य सरस्वती यांच्याकडील ‘शतपथ ब्राह्मणा’वरील हरिस्वामींच्या हस्तलिखित भाष्यातील उल्लेखावरून हरिस्वामी व विक्रमादित्य हे समकालीन असल्याचे सिद्ध केले. त्यांनी अनेक विषयांवर मूलगामी संशोधन केले व ते डॉ. मिराशींच्या नजरेस येताच त्यांनी आपण होऊन त्यांना डॉक्‍टरेट मिळवून दिली. यात दोघांच्याही मनाचा मोठेपणा दिसतो. मला आरंभापासूनच मिराशींचा कालिदासविषयक कालनिर्णय अंतर्गत व भाषिक सामाजिक कारणांवरून मान्य नव्हता. त्याला हे एक प्रमाण मिळाले.

‘कालिदास’ हा मिराशींचा पहिला संशोधनग्रंथ प्रथम १९३४ मध्ये आला. त्याची चौथी आवृत्ती १९९९ची. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी चिकित्सिलेल्या अनेक संदर्भग्रंथांतून कोठेच रामावतार शर्मा व डॉ. ब्लॉक यांच्या कार्याचा उल्लेख नाही. वर उल्लेख केलेल्या आंग्ल ‘शाकुंतला’ची आवृत्ती १९४५ ची आहे. मग शर्मा-ब्लॉकचे संशोधन दासगुप्तांना कोठे उपलब्ध झाले असावे? मिराशी फक्त सेनगुप्तांचा उल्लेख करतात. शर्मांचे संशोधन आढळले असते, तर मिराशींनी त्यांचा उल्लेख अवश्‍य केला असता, हे नक्की.

 शर्मा-ब्लॉक हे कालिदासाला फक्त चौथ्या शतकातील मानतात, म्हणजे द्वितीय चंद्रगुप्त व कुमारगुप्त यांचा काळ येतो. कदाचित कुमारगुप्त पाचव्या शतकारंभी असला तर अल्पायुषी असावा, असे ते मानत असतील. मिराशी मात्र कुमारगुप्ताला पाचव्या शतकाच्या मध्यापर्यंत आणतात. डॉ. राजबली पांडेय हे कुमारगुप्त ४५५ पर्यंत होता, असे म्हणतात. कुमारगुप्ताची कारकीर्द चाळीस वर्षांची असल्याचे पणिक्कर सांगतात व कारकिर्दीचा आरंभीचा भाग चंद्रगुप्ताच्या वैभवाचा होता. मग मधला समुद्रगुप्त कोठे गेला? संक्षेपतः मिराशींच्या मताप्रमाणे कालिदासाचा काळ अंदाजे ३५०-६० ते ४५०-४५५ असा येतो. मग शर्मा-ब्लॉक इतक्‍या आग्रहाने ‘फक्त चौथे शतक’ असे का म्हणतात? मिराशी तर त्यांचा निर्देशही करीत नाहीत?

रवींद्रनाथ ठाकूर आणि ‘शाकुंतल’
आता रवींद्रनाथांच्या शाकुंतलविषयक मतांकडे वळू. आरंभीच ते म्हणतात, की युरोपचा गटे म्हणतो तो एका कवीचा काव्योल्लास नव्हे. गटेची चतुष्पदी एका लहान मेणबत्तीप्रमाणे आहे, ती ‘शाकुंतला’च्या संदेशाची द्योतक आहे. तारुण्याची मोहर आणि परिपक्वतेचा अनुभव, म्हणजे पार्थिव व स्वर्गीय यांचा मेळ आहे. या नाटकांत कोणीही नायक नाही, कोणी नायिका नाही. ‘शाकुंतल’ म्हणजे फुलाचे फलीकरण आणि जडाचा आत्मानुभव. ‘शाकुंतला’त दोन मिलने आहेत. पहिल्या अंकात अस्थिर रोमान्स आणि शेवटच्या अंकात शाश्‍वत आनंद. पार्थिवाकडून नैतिक सौंदर्याकडे जाणारा विकास म्हणजे ‘शाकुंतल’. दुष्यंताचा आरंभीचा प्रभाव जितक्‍या स्वाभाविक रीतीने कालिदासाने दाखविला आहे, तितक्‍याच सहजतेने त्याने भ्रष्टतेतील (fall मधील) शकुंतलेचा निरागसपणा सुचविला आहे. अप्रतिम प्रतिभेने कालिदासाने, शकुंतलेचे कोणतेही स्वातंत्र्य हिरावून न घेता तिला कर्म आणि शांतता, निसर्ग आणि धर्माची शिस्त यांच्या एकत्रित बिंदूवर आणले आहे. बाह्य जगाचा तिला काहीही अनुभव नसतो; पण अंतरात विश्‍वास असतो. अंतिम सत्यावरील विश्‍वास. तरीही दुष्यंताचा नकार हा वज्राघात होऊन तिला क्षणभरात एकाकी, निराश्रित करतो. तपश्‍चर्येच्या आगीत दुष्यंताचे दुष्कृत्य जळून जाते आणि मूक गांभीर्याच्या तपस्येत शकुंतलाही पहिली राहात नाही. गृहजीवनाची बंधने आणि आत्म्याचे स्वातंत्र्य यात सुसंगती असेल तरच सुखाचा स्वर्ग लाभतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Mahakavi Kalidas

टॅग्स