नाममुद्रा : सुधारणेची पायवाट

सुवर्णा येनपुरे-कामठे
Monday, 30 September 2019

जेमतेम वयाची अकरा वर्षे पूर्ण झाली असतील, तोच  पालकांनी तिचे लग्न लावण्याचे प्रयत्न सुरू केले. खेळण्या-बागडण्याचे ते वय. म्हणावी तशी पुरेशी अक्कलही आलेली नसते. परंतु, हे काहीतरी अघटित घडते आहे, एवढे तिच्या लक्षात आले.

जेमतेम वयाची अकरा वर्षे पूर्ण झाली असतील, तोच  पालकांनी तिचे लग्न लावण्याचे प्रयत्न सुरू केले. खेळण्या-बागडण्याचे ते वय. म्हणावी तशी पुरेशी अक्कलही आलेली नसते. परंतु, हे काहीतरी अघटित घडते आहे, एवढे तिच्या लक्षात आले.  तिने या लग्नाला ठाम नकार दिला. अखेर तिच्या पालकांना तिच्या या निर्णयासमोर माघार घ्यावी लागली. पायल जांगिड असे त्या मुलीचे नाव. ‘एवढ्या लहान वयात कसले लग्न करता,’ असा सवाल केवळ आपल्या पालकांनाच  विचारून ती थांबली नाही, तर तो साऱ्या समाजालाच विचारण्यासाठी ती धाडसाने पुढे आली. बालविवाह प्रथेच्या विरोधातील चळवळीचे एक प्रेरणास्थान म्हणून आज तिच्याकडे पाहिले जात आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील हिंसला या छोट्याशा खेडेगावात ती राहते. तेथे काम करणाऱ्या पायलची दखल थेट बिल आणि मिलिंडा गेट्‌स यांच्या फाउंडेशनने घेतली. त्यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल गोलकीपर्स ॲवॉर्ड्‌स’ या चेंजमेकर पुरस्काराने पायलला सन्मानित करण्यात आले. एक ध्येय समोर ठेवून समाजामध्ये बदल घडविणाऱ्यांचा या पुरस्काराने गौरव केला जातो. ज्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात आले, त्याच व्यासपीठावर पायललाही गौरविण्यात आले आहे. 

पायलने बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्‍चय केला आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन ती ‘मुलींना शिकवा’ असे सांगते. घरोघरी जाऊन महिलांना बालविवाह प्रथेच्या दुष्परिणामांची जाणीव करून देते. तिच्या या प्रयत्नांतून गावातील वातावरण हळूहळू बदलू लागले. सध्या पायल राहत असलेल्या हिंसला या गावात मागील काही वर्षांत एकही बालविवाह झालेला नाही, हे लक्षणीय असे यश आहे. तिच्या या कामगिरीमुळे गावातल्या अन्य मुलींनादेखील प्रेरणा मिळाली आहे आणि त्याही तिच्या बरोबरीने काम करीत आहेत. पोस्टर्स, रॅली, घरोघरी जाऊन केलेली जनजागृती याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. ती गावपातळीवर राबवत असलेले हे अभियान सर्वदूर पसरावे, यासाठी तिची आता धडपड सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on payal jangid