कॉलेज कॅम्पसमध्ये धोक्‍याची घंटा...

राहुल रनाळकर 
शुक्रवार, 5 जुलै 2019

जळगावमध्ये महाविद्यालयाच्या आवारात भरदिवसा झालेल्या खुनामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. गुन्हेगारीचे लोण शाळा- महाविद्यालयात पोचण्याचा धोका लक्षात घेऊन वेळीच ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

जळगाव शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयात गेल्या आठवड्यात भरदिवसा पार्किंगमध्ये एका तरुणाचा खून झाला. ही घटना एवढी भीषण आणि सुन्न करणारी होती, की नेमके काय घडलेय हे कुणालाही कळले नाही. हा खून पार्किंगच्या किरकोळ वादातून झाल्याचे सुरवातीला समोर आले. तथापि, अन्य कारणेही असू शकतील, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ही घटना समाजाच्या सर्व स्तरांना हादरवून सोडणारी आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये खुनाच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशा घटनांना केवळ एक पैलू नसतो किंवा अशी घटना अचानक घडत नसते.

वरकरणी त्यामागे तत्कालीन कारण असले, तरीदेखील अशी वृत्ती एका दिवसात नक्कीच तयार होत नाही. ज्या मुकेश सपकाळे या तरुणाचा खून झाला, त्याला आधी घेरून बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याच्या छातीत चॉपरने वार करण्यात आले. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महाविद्यालयाच्या आवारात हत्यारे घेऊन मुले कशी येतात, मुकेशला मारहाण होत होती, तेव्हा सुरक्षारक्षक गप्प का होते, पोलिसांचे "निर्भया पथक' महाविद्यालयाच्या परिसरात नेहमी गस्त घालत असते, ते तेव्हा कुठे होते, जी गर्दी हा प्रकार पाहत होती, त्यातील कोणीही पुढे का आले नाही, या सर्व प्रश्नांना सध्यातरी कोणतेही उत्तर नाही. 

विद्यार्थ्यांशी संवाद वाढण्याची गरज 

ज्या माथेफिरू मुलांच्या टोळक्‍याने हा खून केला, त्यातील काही जण नशेच्या अमलाखाली असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. व्यसन हा प्रकार महाविद्यालयीन तरुणांसाठी नवा राहिलेला नाही. एकदा नशेची चटक लागली त्याचे व्यसन कधी होते त्याचा पत्ता लागत नाही. पालकांनाही आपली मुले दिवसभर काय करतात, याची माहिती नसते. मित्र कसे निवडावेत, हेही तरुणांना माहीत नाही. या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद वाढविण्याची गरज आहे. महाविद्यालयीन जीवनातील प्राधान्यक्रम नेमके काय असायला हवेत, याचेही भान विद्यार्थ्यांना आणून द्यायला हवे.

कॉलेज कॅम्पसमधला खून ही धोक्‍याची घंटा यासाठी, की कॉलेजमधील निवडणुका या सत्रापासून पुन्हा सुरू होणार आहेत. एकूण महाविद्यालय प्रशासनापुढे, शिक्षकांपुढे या निवडणुका सुरळीत पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे. आजची तरुणाई संवेदनशीलदेखील आहे, पण या संवेदनशीलतेला योग्य वळण देण्याचे आव्हान कोणी पेलायचे हा प्रश्न आहे. नंदुरबार जिल्ह्यातही गेल्याच आठवड्यात लग्नात कोणते गाणे नाचण्यासाठी लावायचे या किरकोळ कारणावरून खून झाला. आधीच्या घटनेत म्हटल्याप्रमाणे कारण तत्कालीन असले, तरी ज्या मानसिकतेतून अशा घटना घडतात, त्यासाठी समाज म्हणून काय करायला हवे, याचा विचार होण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Rahul Ranalkar college campus Youth Murder Danger