सर्वसामान्यांना दूरदृष्टी देणारी पत्रकारिता

सम्राट फडणीस, samrat.phadnis@esakal.com 
Sunday, 20 September 2020

विषय ‘जीडीपी’ चा असो, आंतरराष्ट्रीय संबंधांचा असो; वा महापालिकेतील-गावगाड्यातील कारभाराचा. ‘सकाळ’ मधून देण्यात येणारा आशय सर्वसामान्य माणसासाठी असतो आणि सर्वसामान्य माणसाचे कल्याण हीच ‘सकाळ’ची भूमिका असते... ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांची आज (ता. २०) १२३ वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेचे स्मरण.

विषय ‘जीडीपी’ चा असो, आंतरराष्ट्रीय संबंधांचा असो; वा महापालिकेतील-गावगाड्यातील कारभाराचा. ‘सकाळ’ मधून देण्यात येणारा आशय सर्वसामान्य माणसासाठी असतो आणि सर्वसामान्य माणसाचे कल्याण हीच ‘सकाळ’ची भूमिका असते... ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांची आज (ता. २०) १२३ वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेचे स्मरण.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा लढा खोल, भावनांनी भरलेला आणि दीर्घ काळापर्यंत चालावयाचा आहे, हे लक्षात घेऊन त्याला तोंड देण्याची लांब पल्ल्याची तयारी आपण केली पाहिजे. एखाद्या देशावर परचक्र आले म्हणजे त्याचे सैन्य व तेथील जनता यांत फरक राहत नाही, त्या दोघांची मिळून एक प्रतिकार आघाडी तयार करावयाची असते. ती आमच्या सरकारने केली नाही किंवा तशी भावना आमच्या संरक्षणमंत्र्यांत नाही. उलट, लोकांना ते सांगत असतात की, ‘तुम्ही तिकडे बघण्याचे कारण नाही. आम्ही म्हणजे सरकार आपले पाहून घेऊ, तुम्ही स्वस्थ राहा.’ अशी ज्यांची वृत्ती त्यांना हिमालयातदेखील आपल्या सैन्याबरोबर मजूर आणि रस्ते करणारे कामगार यापलीकडे नागरी जनतेचे सहाय्य लागेल, याची कल्पना कोठून असणार? ते अजून समजत असावेत की हे युद्ध म्हणजे सरहद्दीवरील दोन सैन्यातील चकमकी. परंतु अशा चकमकी पाकिस्तानच्या सरहद्दीवर संपल्या नाहीत, त्या आता तिबेटच्या बाजूने बंद पडतील, असे मानणे चुकीचे आहे. इतकेच काय, पाक व चीन दोन आघाड्यांवर एकाच वेळी आपल्याला तोंड द्यावे लागणार असून, ती मुदत लांब पल्ल्याची आहे...''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. परुळेकर यांनी सहा दशकांपूर्वी लिहिलेल्या लेखातील हा उतारा. भारतीय वृत्तपत्रसृष्टीत ‘सकाळ’ दूरदृष्टीचे वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते, त्याचे मूळ डॉ. परुळेकर यांनी केलेल्या पायाभरणीत आहे. वर्तमानाची अचूक जाणीव, समाजाच्या सर्वांगीण भल्यासाठी घेतलेल्या भूमिका आणि भविष्यावर नजर अशी त्यांची अलिखित माध्यम संहिता होती. एकूण विश्वासार्हता पणाला लागण्याच्या काळातून आजचे माध्यम जगत प्रवास करीत असताना ‘सकाळ’वर लाखो वाचकांचा अभेद्य विश्वास आहे, तो अशा पायाभरणीमुळे आणि त्या संहितेमुळे. आज डॉ. परुळेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या लेखनातील दूरदृष्टीवर अधिक भाष्य केले पाहिजे. कारण, विद्यमान माध्यम जगत संख्येने अफाट विस्तारत असताना विचाराने संकुचित होत असल्याचा आरोप समाजातूनच केला जात आहे.

भारत-चीन युद्ध झाले १९६२ मध्ये. त्या आधी तीन वर्षे पुण्यातील रोटरी क्लबमधील भाषणात डॉ. परुळेकर हिमालयातील चीनच्या कुरापतींचा संदर्भ देतात. तेवढ्यावर न थांबता ‘सकाळ’ मध्ये तत्कालिन संरक्षणमंत्र्यांच्या ऱ्हस्व दृष्टीचे वाभाडे काढतात. ते लिहितात : संरक्षणमंत्री श्री. कृष्णा मेनन एका भाषणात म्हणाले, ‘हिमालयाचा प्रश्न महत्त्वाचा नाही, देशातील उद्योगधंदे कसे वाढतील हे खरे महत्त्वाचे आहे.’  गावात दरोडेखोर आले असताना दरवाजाची सुस्थिती महत्त्वाची नाही, घरात स्वयंपाकपाणी नीट ठेवले पाहिजे, असे म्हणण्यासारखे हे आहे.

सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी
देशावर येऊ घातलेल्या संकटाची सूचना देण्यासाठी कुणाचाही मुलाहिजा न बाळगणारी पत्रकारिता डॉ. परुळेकर यांनी ‘सकाळ’'मध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रात, भारतात रुजविली. जे समाजाच्या भल्याचे ते सांगताना भीडभाड बाळगता कामा नये, याची रुजवात त्यांनी स्वतः घालून दिली. ‘कॉर्पोरेशनच्या पुढच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवार तुमच्याकडे आले म्हणजे त्यांना सांगा, की स्वस्त शिक्षणाची सोय करणार असाल, तर मते देऊ. अशी लोकांनी चळवळ केल्याशिवाय आता चालावयाचे नाही,’ असे लोकप्रबोधन वर्तमानपत्रातून करण्याची डॉ. परुळेकर यांची तयारी होती. वृत्तपत्रे मतपत्रे असतानाच्या काळात त्यांनी १९३२ मध्ये सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून ‘सकाळ’ काढला; चालवला. क्लिष्ट विषय सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्याचा आग्रह धरला. तो आग्रह हीच ‘सकाळ’ची भूमिका आहे. विषय ‘जीडीपी’चा असो, आंतरराष्ट्रीय संबंधांचा असो; वा महापालिकेतील-गावगाड्यातील कारभाराचा. ‘सकाळ’मधून देण्यात येणारा आशय सर्वसामान्य माणसासाठी असतो; त्याला दूरदृष्टी देणारा असतो आणि सर्वसामान्य माणसाचे कल्याण हीच ‘सकाळ’ची भूमिका असते.

घटनात्मक मूल्यांशी बांधिलकी 
वृत्तपत्रांवर सरकारने लादलेल्या निर्बंधांविरोधात डॉ. परुळेकर यांचा लढा भारतीय माध्यम स्वातंत्र्यातील महत्त्वाचे पान आहे. वर्तमानपत्रांनी किती पाने छापावीत आणि त्याची किंमत काय असावी, याबद्दल केंद्र सरकारने पन्नासच्या दशकात कायदा केला आणि वर्तमानपत्रांवर निर्बंध लादले. डॉ. परुळेकर यांनी ‘सकाळ’च्यावतीने सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. वर्तमानपत्र कायद्यांतर्गत केंद्र सरकारने काढलेल्या दैनिक वर्तमानपत्रे (किंमत आणि पृष्ठे) आदेश १९५६, १९६० (वर्तमानपत्र आदेश) या दोन आदेशांना आव्हान दिले. हे आदेश घटनेने भारतीयांना दिलेल्या भाषण स्वातंत्र्याचा संकोच करत असल्याचा मुद्दा ‘सकाळ’ने लावून धरला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला. कोणत्याही यंत्रणेविरुद्ध भूमिका घेताना डॉ. परुळेकर यांची भूमिका स्वच्छपणाने सर्वसामान्य माणसांच्या भविष्याचा विचार करणारी होती.

कोणतेही सरकार घटनात्मक मूल्यांची पायमल्ली करू शकत नाही, याबद्दल ते आग्रही होते. आज सरकारचे ऐकले तर उद्या घटना धाब्यावर बसवून अन्य कायदेही लादले जातील, याबद्दलची जाणीव त्यांना असावी. त्यामुळे,  ते सर्वोच्च न्यायालयातही लढले. त्यांच्या भूमिकांचा विजय झाला, तरी त्यांनी त्याचा उदोउदो केला नाही आणि या भूमिकांबद्दल टीका सहन करतानाही ते कचरले नाहीत.

खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्था बदलली आहे. माध्यम क्षेत्राला अविश्वनसीय गती आली आहे. तीव्र स्पर्धा आहे आणि त्याचवेळी दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत डॉ. परुळेकर यांच्यासारख्या थोर माध्यमकर्मीचे स्मरण अत्यंत आवश्यक आहे. आपण पत्रकारिता करतो ती कोणासाठी, तिचा लाभ सर्वसामान्यांना, रंजल्या-गांजलेल्यांना किती होतो, आपल्या पत्रकारितेमुळे त्यांचे प्रश्न सुटून ते विकासाच्या वाटेवर चालण्यासाठी सक्षम बनताहेत का, आपली पत्रकारिता समाजाला एका भल्या पावलाची दिशा दाखवत आहे का, हे प्रश्न आजच्या माध्यमकर्मीने स्वतःला विचारले पाहिजेत. या प्रश्नांच्या उत्तरात डॉ. परुळेकर यांची भूमिका डोकावत असेल, तर आपल्या पत्रकारितेचा रस्ता योग्य आहे, हे समजण्यास हरकत नसावी. गेली नऊ दशके या एकाच रस्त्यावर ‘सकाळ’ वाटचाल करतो आहे. वर्तमानपत्रातून विस्तार होऊन ‘सकाळ’ माध्यमसंस्था बनला असला, तरी हीच मूल्ये ‘सकाळ’चे आधारस्तंभ आहेत.

निःस्पृह नि निर्भय
समाजवादी विचारवंत दिवंगत भाई वैद्य लिहितात, ‘‘वृत्तपत्राने नवीन नवीन तंत्रज्ञान त्वरेने आत्मसात करावे, याकडे त्यांचे (डॉ. परुळेकर यांचे) लक्ष होते. मात्र मूठभर बुद्धिजीवी माणसांच्या मान्यतेवर वृत्तपत्राने अवलंबून न राहता ते सर्वदूर, सर्व थरांपर्यंत आणि शक्य तितक्या तळागाळापर्यंत पसरावे, असे त्यांना वाटत होते.’’ नरूभाऊ लिमये लिहितात, ‘‘नानासाहेबांचा ‘सकाळ’ सर्वार्थाने वृत्तपत्र आहे. संजयासारखे वृत्त द्यावे आणि विदुरासारखे निःस्पृह निर्भय मार्गदर्शन करावे, ही नानासाहेबांची शिकवण होती.’’ ज्यांच्या आयुष्याबद्दल सात-आठ दशकांपूर्वी आणि आजच्या काळातही तथाकथित मुख्य प्रवाहातील माध्यमांना काडीचाही रस वाटत नाही, त्यांच्याबद्दल ‘सकाळ’ला मुख्य प्रवाहात आघाडीवर राहूनही आस्था का वाटते हे भाईंच्या आणि नरूभाऊंच्या मोजक्या शब्दांतून समजून येईल. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article samrat phadnis on nanasaheb parulekar