राष्ट्रहिताच्या नजरेतून : मोदी आणि संवाद कला

शेखर गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार
रविवार, 5 एप्रिल 2020

शिकण्यासारखे तीन धडे
पंतप्रधान मोदींच्या भाषणातून तीन धडे घेता येतात. पहिला म्हणजे मोदी तुम्हाला कशाचेही आश्वासन देत नाहीत. दुसरे, देशाच्या नावाखाली ते काहीतरी करण्यास सांगतात. तिसरे म्हणजे, ते कोणत्याही गोष्टीबद्दल पश्चात्ताप करत नाहीत. आणखी चौथा धडा घ्यावयाचा झाल्यास त्यांना कशाप्रकारे बोलायचे, कोणाशी बोलायचे आणि कोणाला टाळायचे हे अतिशय व्यवस्थित माहिती असते. याचाच अर्थ ते काय संदेश देताना तथाकथित बुद्धिवादी वर्गाला गृहीत धरत नाहीत. हा वर्ग त्यांची सोशल मीडियावर निंदा करतो. परंतु, मोदी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. आणखी एक वर्ग आहे याकडे मोदी पूर्णपणे दुर्लक्ष करतात. तो म्हणजे गरीब वर्ग. या वर्गामुळेच मोदींना बहुमत मिळाले. परंतु, तो लोकभावना ठरवणारा वर्ग नसल्यामुळे ; तसेच ते प्रश्न विचारू शकत नसल्याने मोदी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मोदींचा पूर्णपणे भर मध्यमवर्गावर असतो.

मोदींना माहिती असते की कोणाशी बोलायचे, कोणाला टाळायचे आणि कोणाशी प्रेमाने संवाद साधायचा. त्यामुळे तुम्ही टाळी, थाळी, दिवा आणि मेणबत्ती याबद्दल कितीही उपहास केला तरी त्यांना काहीही फरक पडत नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या बातम्यांमध्ये सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. हा प्रादुर्भाव लवकर संपेल अशीही शक्यता नाही. परंतु, मला आता याचा कंटाळा आला आहे. किमान एक आठवडा तरी मला जुने राजकारण हवे आहे. सध्या एकमेकांवर टीका करणारे राजकारण रद्द झालेले दिसतेय. या परिस्थितीतही आपण कोरोना विषाणूशी निगडित राजकारणात रस घेत आहोत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे आव्हान कशा पद्धतीने हाताळले, यावर सध्या चर्चा होत आहे. त्यांच्या संदेश देण्याच्या पद्धतीचा आपण विचार करू. मतदार वाचण्याची मोदींची क्षमता ही इंदिरा गांधी यांच्याशी तुलना करण्यासारखी आहे. ते काही विधाने करतात, काही आवाहन करतात आणि त्यांचे समर्थक तो धागा पुढे नेतात. त्यांनी रविवारी नऊ वाजता नऊ मिनिटे दिवे लावावेत, असा संदेश दिला. हा संदेश दिल्यानंतर तासाभरातच त्यांचे कॅबिनेट, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, सोशल मीडिया वॉरियर्स, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपशी निगडित संघटना यांनी ट्विटरवर मोहीम उघडली.

कोरोना विषाणू संसर्गाचा काळात त्यांनी चार वेळा संदेश दिला. ते बोलल्यानंतर लगेच त्यांचे निष्ठावंत पाईक पक्ष आणि सरकारच्या पातळीवरून हा संदेश देण्यास सुरुवात करतात. यातून त्यांच्या संदेशांची पवित्रता सिद्ध केली जाते. प्रत्येक जण त्यांच्या सुरात सूर मिसळून बोलू लागतो.

मोदींचा संदेश मग काही असो, कसाही असो, त्यांचे निष्ठावंत पाईक तो पुढे नेतातच. तसेच, त्यांचा या संदेशावर पूर्ण विश्वास असतो. त्यांचा संदेश चुकीचा ठरल्याचे उदाहरण म्हणजे  नोटाबंदी. तरीही समर्थक मोदींना माफ करतात. मागील रविवारी ‘मन की बात’मध्ये त्यांनी देशातील गरिबांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या त्यांच्या पावलामुळे कोट्यावधी लोकांची मने विरघळली असल्यास नवल नाही. त्यांची देशाला उद्देशून केलेली दोन भाषणे, ‘मन की बात’ आणि शुक्रवारी दिलेला ‘दिवे लावा’ संदेश या सर्वांमध्ये एक समान धागा दिसतो. यात ते प्रत्येकाला त्याने स्वतः साठी काय करावे हे आपल्याला अपेक्षित आहे, असे सांगतात. ‘स्वच्छ भारत’ आणि एलपीजी अंशदान सोडून देणे ते नोटाबंदी आणि आता कोरोना संसर्ग या सर्व वेळी ते लोकांना काहीतरी करण्यासाठी सांगत असल्याचे दिसते. यातून लोकांमध्ये आपण या प्रक्रियेत सहभागी असल्याची भावना निर्माण होते. ते या गोष्टींची जबाबदारी आपल्यावर आहे, अशा पद्धतीने विचार करतात. लोकांना सुखावणारे निर्णय घेण्यापेक्षा त्यांच्याकडून त्यागाचे दान मागणे मोदींना अधिक आवडते.

त्यांनी एक दिवसाच्या जनता कर्फ्यूवेळी लॉकडाउनची रंगीत तालीम घेतली. याचवेळी त्यांनी आरोग्य सेवकांसाठी टाळ्या वाजवण्याचा सगळीकडे सुरू असलेला प्रकार करण्याचा संदेश दिला. यात त्यांनी घंटा आणि थाळी वाजवण्याची स्वतःची भर घातली. तुम्हाला यावर कितीही हसला तरीही त्यांचा हा संदेश देशभरातील कोट्यवधी नागरिकांनी पाळला. नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अनपेक्षित होता. मोदींनी दिलगिरी व्यक्त केल्याची उदाहरणे पाहिल्यास यात एक पॅटर्न दिसतो.  

नोटाबंदीनंतर मला केवळ पन्नास दिवस द्या, असे ते सद्गदीत होऊन म्हणाले होते. माझी काही काही चूक आढळल्यास तुम्ही द्याल, ती शिक्षा मला मान्य असेल, असेही ते म्हणाले होती. नोटाबंदी ही नंतर फार मोठी चूक ठरली. एक शक्तिशाली पंतप्रधान धोकादायक निर्णय घेतो आणि देशातील नागरिकांना त्रास सहन करण्याचे आवाहन करतो. यातून कोरोना संसर्गाच्याबाबत त्यांनी मागितलेली माफीही वेगळी आहे. त्यांनी इतरांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. यात त्यांनी मोठ्या प्रमाणात त्रास होत असलेल्या स्थलांतरित मजूर आणि गरीबांचा प्रश्न उपस्थित केला नाही.

कोणी म्हणत असेल, मला मोदींचे मन वाचता येते तर, तो खोटारडा असेल अथवा आईन्स्टाइनचा अवतार तरी असेल. मला याबद्दल बोलायचे झाल्यास मी म्हणेन, हे सर्व देशातील नागरिक हे लहान मुलांसारखे आहेत अन् ही लहान मुले आज्ञाधारक आहेत. आज्ञा पाळण्यासाठी ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. याचमुळे मोदींनाही याबद्दल कधीच तक्रार नसते.
(अनुवाद : संजय जाधव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shekhar gupta