‘टीआरपी’चे दुष्टचक्र

TRP
TRP

दर्जाहिनतेकडे वाटचाल करणारी प्रसारमाध्यमे सध्या अंतर्गत यादवीमध्ये अडकली आहेत. आमच्या या व्यवसायातील आघाडीवीरांनी स्वयंनाशाची कळ दाबली आहे. 

विविध वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या नळावरच्या भांडणामुळे हा लेख लिहावा लागत आहे. ''रिपब्लिक''चे अर्णव गोस्वामी विरुद्ध बहुतेक इतर सर्व वृत्तवाहिन्या असा वाद सर्वांनी पाहिला. अनेक वाहिन्यांचे महारथी निवेदक आपल्या पोसलेल्या अहंकारासह एकाच उद्देशासाठी एकत्र आले होते, हाच काय तो या वादातील सुखद धक्का होता. अर्णव गोस्वामी फोडाफोडी करू शकतात, हे माहिती होते; पण स्वतःविरोधात ते सर्वांना एकत्र आणू शकतात, हे नव्यानेच समजले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झालेल्या वादात कोण चूक, कोण बरोबर याची शहानिशा करण्याची आवश्यकता नाही. ध्रुवीकरणाच्या या जगात, तुमचा एखाद्यावर विश्वास असेल तर त्याचे सर्व काही बरोबर आणि दुसरी बाजू पूर्णपणे चूक, असेच मानले जाते. डोनाल्ड ट्रम्प ते नरेंद्र मोदी आणि अर्णव गोस्वामी ते रविश कुमार, हा नियम सर्वांच्या समर्थकांना लागू होतो. त्यामुळे, या स्वयंघोषित जगनियंत्यांना भांडू दे, ‘माझ्या बापाचं काय जातं?’ असं खांदे उडवून म्हणता येईल. दुर्दैवाने, आपण स्वतःला यापासून वेगळे काढू शकत नाही. हे तुम्हाला पटवून देण्यासाठी एक गोष्ट सांगतो. हॉलिवूडमध्ये एक मोठा ऐतिहासिक युद्धपट निर्माण केला जात होता. वास्तववादी चित्रण व्हावे यासाठी दिग्दर्शकाने युद्धप्रसंगासाठी प्रचंड संख्येने एक्स्ट्रॉ कलाकार गोळा केले होते. या सर्वांना मी मानधन देणार नाही, तू पैसे कोठून आणणार, असे निर्मात्याने विचारल्यावर तो दिग्दर्शक म्हणाला,''हरकत नाही, अखेरच्या युद्धप्रसंगी मी त्यांच्या हातात खरी शस्त्रे देईन. म्हणजे युद्ध खरे वाटेलच, पण पैसे स्वीकारायला कोणी जिवंत राहणारही नाही.''

ही घटना आणि सध्याचे वृत्त निवेदकांमधील वाद यामध्ये काही साम्य जाणवते का? लोकप्रिय, प्रभावी, सर्वांत चांगले किंवा वाईट असणारे आम्ही खरी शस्त्रे घेऊन या गलिच्छ वादात उतरलो आहोत. एकमेकांना नावे ठेवत, शिव्याशाप देत, अवमान करत आकांडतांडव करत आहोत. स्पर्धक वाहिनीने एखादी बातमी सर्वप्रथम उघड केली की, ती बातमी कशी खोटी, अतिरंजित आणि पुरस्कृत आहे यावर चर्चा घडवून आणण्याची कला शिकलो आहोत. किंवा दुसऱ्यांनी मिळवलेली बातमी चोरुन व त्यावर ‘एक्सक्लुझिव’ चा शिक्का मारून तुमच्याकडे आधी दाखवा, हे पण सुरू आहे. हा प्रकार फक्त वृत्तवाहिन्यांपुरता मर्यादित नाही. हा विषाणू कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे आणि तरीही  कोणीही मास्क घातलेला नाही. वृत्तवाहिन्यांचे भांडण ही ठळकपणे दिसणारी बाब आहे, इतकेच. या भांडणात रेटिंगबाबतचे बनावट आणि अतिरंजित दावे, एक्सक्लुझिव- सुपर एक्सक्लुझिव आणि आता तर ''एक्सप्लोझिव एक्सक्लुझिव'' यांचा पाऊस पडणे अटळ आहे. 

स्पर्धक वाहिन्यांचे पत्रकार आणि कॅमेरामन यांच्यातील चढाओढ, निवेदकांनी दुसऱ्या वाहिनीच्या पत्रकारांविरोधात मोहीम राबवणे, असे प्रकार सर्व देशाने पाहिले.  सर्वोच्च न्यायालय ते केंद्र सरकार, सगळेच माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याची भाषा करत आहेत. सर्वसामान्य लोक आमच्यावर वैतागली आहे. स्वयंनियंत्रण नसल्याने माध्यमांवरील नियंत्रणासाठी बाहेरच्या तज्ज्ञ लोकांची समिती नेमण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, माध्यमांमध्येच अंतर्गत वाद सुरू असताना हे कसे करणार? सत्ताधाऱ्यांना हस्तक्षेप करण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. गेल्या चार दशकांतील देशातील सर्वांत शक्तिमान असलेले सरकार अशी संधी का सोडेल?  समेट घडवून आणण्यासाठी ते पुढाकार घेतील.

तुमच्यातच फूट पडलेली असताना आम्ही तरी काय करणार, असे ते तुम्हाला ऐकवतील. आमच्या व्यवसायाने स्वयंनाशाची कळ दाबली आहे. ऐकून घ्यावे, असे आवाजच शिल्लक नाहीत. प्रणव मुखर्जी, भीष्म पितामह, न्यायाधीश किंवा पंच नाहीत, आवाज उठवण्यासाठी कोणीही नाही. ‘आमच्या बापाचं गेलं’ ते हेच.

...तर स्वयंनाशाकडे वेगाने वाटचाल
बनावट रेटिंग जाहीर केल्याबद्दल एखाद्या वाहिनीला पोलिस किंवा स्पर्धक संस्थेच्या दबावाला सामोरे जावे लागत असताना अचानक त्या वाहिनीच्या समर्थनार्थ प्रभावी पक्षाच्या अध्यक्षांचे किंवा केंद्रीय मंत्र्यांचे विधान येते, यातच सर्व काही दडले आहे. प्रस्थापितांना जाब विचारण्याचे व्रत सोडून स्वतःच प्रस्थापित होण्याची ओढ माध्यमांना लागली आहे. अर्थात, आमची इतकी कडक उलटतपासणी करण्याचीही गरज नाही. प्रस्थापितांना सवाल विचारल्यानंतर नाराज मंत्र्यांचा येणारा फोन, टोमणे किंवा मुलाखतीत विधान नाकारणे अशा प्रतिक्रियांची आम्हाला सवय होती.

आता मात्र पत्रकारांना प्रवेश नाकारणे ते तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांची ''सदिच्छा'' भेट, असे प्रकार घडत आहेत. एकाला वठणीवर आणले की बाकी सरळ होतात, हे बळवंतांना माहीतच असते. आर्थिक डबघाईच्या या काळात वृत्त वाहिन्या जितक्या कमजोर होतील, तितक्याच प्रमाणात मालक आणि पत्रकार आपण कोणाच्या सर्वांत जवळ आहोत, कोण आपल्याला जामीन मिळवून देऊ शकेल, स्पर्धकांना अडचणीत आणू शकेल, हे जोखतील आणि स्वयंनाशाकडे वेगाने वाटचाल करतील.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com