‘माहितीमारी’तून सुटकेसाठी ‘सप्तपदी’

Social-Media
Social-Media

विषाणूमुळे आलेल्या साथीचे जे वेगवेगळे परिणाम सध्या भेडसावत आहेत, त्यात अफवांचे माजलेले तण हाही गंभीर प्रश्न आहे. त्यावर उतारा म्हणून सुचवलेली ही सातकलमी संहिता.

कोविद-१९ मुळे जगातली किमान २५० ते ३०० कोटी जनता सध्या लॉकडाऊनमुळे घरांत किंवा विलगीकरण कक्षात आहे. त्यातल्या बहुसंख्य व्यक्तींना इंटरनेट, मोबाईलव्दारे माहिती मिळते आहे. ती एकमेकांना दिली जात आहे. यात सत्य-असत्याची बरीच सरमिसळ आहे. अफवांचं पीक निघतंय. काहीजण आपापल्या विचारधारेनुसार खोटे, अर्धसत्य, संदर्भ सोडून असणारे असे संदेश समाज माध्यमातून पसरवताहेत. सध्या याची व्याप्ती वाढते आहे. म्हणून या सगळ्याला infodemic म्हणजे ‘माहितीची महामारी’ असंही म्हणलं जातंय. तिची बाधा होऊ नये, आपले शहाणपण टिकून राहावे यासाठी सुचवलेली ही सप्तपदी.

१) तुम्हाला आलेला एखादा संदेश किंवा व्हिडिओ बघितल्यावर कोणत्याही तीव्र भावना तुमच्या मनात तयार झाल्या का, हे स्वतःला विचारा. एखाद्या व्यक्तीविरोधात, सरकारविरोधात, समुदायाविरोधात तिरस्कार वाटणे  किंवा पराकोटीचा अभिमान वाटणे अशा कोणत्याही प्रकारच्या भावना मनात तयार तर झाल्या नाहीत ना, हे तपासा.

२) जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर हीच धोक्याची घंटा आहे. कदाचित तो संदेश, तो व्हिडिओ त्याच हेतूने बनवलेला असू शकतो. ज्याअर्थी तुमच्या तीव्र भावना उफाळून आल्या, त्या अर्थी इतरही अनेकांच्या उफाळून येऊ शकतात. म्हणजेच तुमच्या हातात एक ‘भावनिक बॉम्ब’च आहे.

३) तो संदेश इतर अनेकांना ‘आत्ता’ पाठवणं आवश्यक आहे का, हे स्वतःला विचारा. त्याचं ठोस कारण काय, हाही पुढचा प्रश्न यायला हवा. एवढी ‘तातडीची’ ही बाब आहे का? याचे उत्तर ‘हो’ असेल तर पुढची पायरी बघा. तुमचं उत्तर नकारार्थी असेल तर संदेश पुढे पाठवू नका. मोबाईलमध्ये नि तुमच्या मनातही त्या संदेशाला थंड होऊ द्या.

४)  आता त्या थंड झालेल्या मजकुराविषयी. या संदेशातून कोणाला ‘व्हिलन’ किंवा ‘हिरो’ ठरवलं गेलं आहे का, हे तपासा. समजा  एखाद्या संदेशातून सरकार, व्यक्ती, धार्मिक समुदाय हे खलनायक आहेत, असा सूर निघत असेल किंवा यापैकी कोणीही महानायक आहेत असा सूर निघत असेल तर ही धोक्याची दुसरी घंटा.

अशावेळी अन्य माध्यमे या विषयाकडे कसे पहात आहेत, याचा धांडोळा घ्या. उदा. वृत्तपत्र, टीव्ही इ. एखादा संदेश सरकारवर झोड उठवीत असेल तर सरकारची भूमिका मांडणारे लोक काय म्हणतायत ते बघा. एखाद्या संदेशात एखाद्या समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असेल तर अनेकदा त्यांची बाजू घेऊन बोलणारे लोक काय म्हणत आहेत ते बघा. मित्रांशीही बोलू शकता. मत विचारताना दुसऱ्याला खिजवण्याचा हेतू मनात नसेल तर, समोरच्यालाही ते जाणवतं आणि मोकळा संवाद होऊ शकतो.

५) बऱ्याचदा असेही संदेश मोबाईलवर येतात ज्याबद्दल न्यूज चॅनेल, वृत्तपत्र यात काहीच नसतं. अशावेळी संदेशातील महत्त्वाचा भाग ‘गुगल’वर तपासा. अनेक न्यूज चॅनेल, ऑनलाइन वेबसाइट शहानिशा करून खरे खोटे काय, हे स्पष्ट करीत असतात. उदा. alt news सारख्या वेबसाइट. आपल्याला आलेला संदेश त्यावर तपासा. तो निराधार आहे हे लक्षात आले, की तो हातातला भावनांचा बॉम्ब निकामी करून टाका. संदेश/व्हिडिओ कायमचा डिलीट करा.

६) क्वचितच असं होतं की आपल्या हातात आलेला संदेश या वरच्या सगळ्या पायऱ्यांपलीकडे जाऊनही उरतो. अजूनही तो संदेश उरला आहे आणि तीव्र भावना निर्माण करतो आहे अशा स्थितीत आपण सहाव्या पायरीवर येऊन पोचतो. अशावेळी स्वतःला विचार की या संदेशावर ‘नेमकी काय कृती व्हायला हवी’ आणि ‘ती कोणी करावी अशी आपली अपेक्षा आहे?’ उदाहरणार्थ, शहराच्या एखाद्या भागात काही अनुचित प्रकार घडत आहे, असा संदेश आपल्याला आला. क्र.४ आणि ५ च्या पायऱ्या पाळूनही खरे-खोटे काहीच समजले नाही. आता, हा प्रश्न विचारावा की तो अनुचित प्रकार घडत असताना नेमकी काय कृती घडायला आपल्याला हवी आहे. आणि ती कृती कोणी करायला हवी आहे. असं मानू की याचं उत्तर ‘तो अनुचित प्रकार थांबायला हवा आहे’ आणि ‘हे काम पोलिसांनी करायला हवं आहे’ अशी उत्तरं स्वतःला स्वतःकडून मिळाली. कृती करायचे ‘अधिकृत आणि कायदेशीर’ अधिकार कोणाकडे आहेत, हेही बघणं गरजेचं आहे. कारण झुंडींना पाठिंबा देणारे आपण नाही.

७) एकदा का कृती कोणी करायला हवी हे लक्षात आलं की त्या संबंधित व्यक्तीला/यंत्रणांना याबाबत माहिती देणं ही शेवटची पायरी. ‘तुमच्याकडे संदेश आला, त्या संदेशाची (पायरी ४ आणि ५ नुसार) शहानिशा करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात पण शहानिशा करता आलेली नाही, तरी एक योग्य यंत्रणा म्हणून मी तुमच्यापर्यंत हा संदेश पोचवत आहे.’ अशा सविस्तर पद्धतीने ही माहिती यंत्रणांना देणं गरजेचं आहे.

तुमच्याकडे आलेला भावनिक बॉम्ब तुम्ही योग्य त्या यंत्रणांना निकामी करण्यासाठी सुपूर्त केलात तर नागरिक म्हणून तुमचं चोख कर्तव्य बजावलं असं समजावं. आपल्याकडे आलेला संदेश/व्हिडिओ दुसऱ्याकडे ढकलण्याच्या (फॉरवर्ड करण्याच्या) बहुतेकांना लागलेल्या सवयीला ही सप्तपदी आळा घालेल! शहानिशा न करता संदेश पुढे ढकलण्याच्या आपल्या कृतीमागे एक कारण असतं. आपण असं मानतो की, हे करून आपण समाजाचं भलं करतोय. अशावेळी तीव्र भावना उद्दीपीत करणाऱ्या, कोणाला तरी ‘व्हिलन’ किंवा ‘हिरो’ ठरवणाऱ्या संदेशांना पुढे पाठवून आपण लोकजागृतीचं काम करतो आहोत, अशी आपल्याही नकळत आपण स्वतःची समजूत करून घेतो. संदेश पुढे पाठवून समाजसेवेचे कृतक समाधान मिळवण्याची प्रवृत्ती असते. पण त्यातून परिणाम नेमका उलटा होतो. आपण नकळत अफवांना बढावा देतो, अंधश्रद्धांना खतपाणी घालतो, समाजाचा भयगंड वाढवतो. म्हणूनच सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठी ही सप्तपदी गरजेची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com