जयपाल रेड्डी : तत्त्वनिष्ठ अन्‌ कणखर 

संजय जाधव 
सोमवार, 29 जुलै 2019

खंबीर अन्‌ कणखर नेता पक्ष नेतृत्वाच्या सूरात सूर मिसळून "सारे काही आलबेल आहे,' असे म्हणणाऱ्या नेत्यांचे उदंड पीक सध्या देशात आहे. यातच पक्ष नेतृत्वाच्या चुकांना विरोध करण्याऐवजी त्यांचे समर्थन करणारे कणाहीन नेतेही देशातील राजकीय पटलावर दिसत आहेत. याच वेळी एस.जयपाल रेड्डी यांच्या जाण्याने एक खंबीर आणि कणा असलेल्या राजकारण्याचे जाणे अधिक प्रकर्षाने जाणवते. 

खंबीर अन्‌ कणखर नेता पक्ष नेतृत्वाच्या सूरात सूर मिसळून "सारे काही आलबेल आहे,' असे म्हणणाऱ्या नेत्यांचे उदंड पीक सध्या देशात आहे. यातच पक्ष नेतृत्वाच्या चुकांना विरोध करण्याऐवजी त्यांचे समर्थन करणारे कणाहीन नेतेही देशातील राजकीय पटलावर दिसत आहेत. याच वेळी एस.जयपाल रेड्डी यांच्या जाण्याने एक खंबीर आणि कणा असलेल्या राजकारण्याचे जाणे अधिक प्रकर्षाने जाणवते. 

पक्ष नेतृत्व काही चुकीचे करीत असेल तर त्याला आव्हान देणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते. इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादण्याचा निर्णय घेतला आणि रेड्डी पक्षातून बाहेर पडले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधातच मेडक मतदारसंघातून लढत दिली. यात ते पराभूत झाले तरी त्यांनी दाखविलेले मनोधैर्य आणि धाडस कालातीत होते.

पाच वेळा लोकसभा खासदार, दोन वेळा राज्यसभा सदस्य आणि चार वेळा आमदार असलेला हा नेता एक वेगळ्या मुशीतला होता. सध्या अतिशय दुर्मीळ होत चाललेल्या प्रामाणिक आणि तत्वनिष्ट राजकारण्यांच्या जातकुळीतील ते होते. रेड्डी यांनी माहिती व प्रसारण, नागरी विकास, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि विज्ञान तंत्रज्ञान खाती केंद्रात सांभाळली. कॉंग्रेस प्रणित "यूपीए-1' आणि "यूपीए-2'मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. "यूपीए-2'च्या काळात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला सात हजार कोटी रुपयांचा दंड त्यांनी ठोठावला. त्यामुळे त्यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयावर पाणी सोडावे लागले. त्यांना काहीसे दुय्यम विज्ञान तंत्रज्ञान खाते सोपवून अडगळीत टाकण्यात आले.

विद्यार्थी दशेपासून रेड्डी हे राजकारणात सक्रिय होते. उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. कॉंग्रेसकडून सलग चार वेळा ते आमदार बनले. उत्तम वक्ते आणि अतिशय गांभीर्याने संसदीय कामकाजाकडे पाहणारे, अशी प्रतिमा रेड्डी यांच्या त्यावेळी आंध्र प्रदेश विधानसभेत होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादल्यानंतर त्यांनी जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जनता पार्टीतून फुटून बाहेर पडलेल्या जनता दलात ते सहभागी झाले. ते जनता पार्टीचे 1985 ते 1988 या काळात सरचिटणीस होते. जनता पार्टीकडून ते महबूबनगरमधून लोकसभेवर निवडून गेले. राज्यसभेचे सदस्य आणि नंतर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्दही गाजली. रेड्डी यांनी 1999 मध्ये पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते मिरालगुडा आणि चेवेल्ला मतदारसंघातून ते लोकसभेवर जिंकून गेले. उत्कृष्ठ संसदपटूचा पुरस्कार मिळविणारे ते दक्षिणेतील पहिले आणि सर्वांत तरुण नेते होते. अशा या समाजाशी आणि विचारांशी बांधिलकी असणाऱ्या नेत्याचे जाणे देशातील राजकारणात पोकळी निर्माण करणारे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Wriitten by sanjay jadhav on jaipal Reddy