गीताजयंती विशेष : श्रीमद्भगवद्गीतेला जयंतीनिमित्त भेट

Gitajayanti
Gitajayanti

आपण आज श्रीमद्भगवद्गीताजयंती साजरी करतो आहोत. श्रीमद्भगवद्गीतेचा थोडा तरी भाग आज वाचावा, त्याच्या अर्थावर चिंतन करून भगवंत काय सांगत आहेत, हे बघण्याचा प्रयत्न करावा. तरच, जसे वाढदिवसाला आपण भेट देतो तसे श्रीकृष्णांना व श्रीमद्भगवद्गीतेला जयंतीनिमित्ताने भेट दिल्यासारखे होईल.

पुस्तकाची, ज्ञानाची आज जयंती. ज्ञान हे संपूर्ण विश्वाच्या आधी आहे. त्यामुळे ज्ञानाचा जन्म अमुक दिवशी झाला, असे आपण म्हणू शकत नाही. म्हणून ज्ञान ज्यांनी दिले, त्या श्रीकृष्णांनाच डोळ्यांसमोर ठेवून श्रीगीताजयंतीचा कार्यक्रम आपण साजरा करतो. श्रीकृष्ण म्हटल्यावर एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. श्रीकृष्ण ७००० वर्षांपूर्वी या ठिकाणी होते. त्यांच्यापूर्वीच जे जाणण्यासारखे आहे, ज्यामुळे निरंतर शांती मिळेल असे ज्ञान प्रकट झालेले होते. हा अनुभव लक्षात घेऊन श्रीकृष्ण आपल्याला श्रीमद्भगवद्गीतेत मार्गदर्शन करतात. काळ बदलतो तशा समस्याही बदलतात, शिवाय काळाच्या ओघात पृथ्वीवर अशा अनेक घटना घडतात; ज्यांचा जीवनाला अडथळा उत्पन्न होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करून श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीता सांगितली. त्यामुळे उठावे कसे, झोपावे कसे, येथपासून ते जेवण्याखाण्याविषयी, एकमेकांशी कसे वागावे याविषयी वगैरे सर्वतऱ्हेची माहिती श्रीमद्भगवद्गीतेत आढळते. या माहितीचा उपयोग कसा करावा व या माहितीच्या आधारावर आपण आपले जीवन कशा तऱ्हेने आनंदमय करावे, याचे मार्गदर्शनही श्रीमद्भगवद्गीतेत केलेले दिसते. म्हणून, श्रीमद्भगवद्गीता हा जीवनाला मार्गदर्शन देणारा आणि त्रिकालाबाधित उपयोगी पडणारा एकमेव ग्रंथ आहे.

वर्तमानाचा, भविष्याचा विचार
श्रीमद्भगवद्गीतेत पूर्वीच्या अनुभवांचा विचार तर केलेला आहेच; बरोबरीने वर्तमानाचा तसेच भविष्याचा विचार करून मार्गदर्शन केलेले आढळते आणि हेच श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि वैशिष्ट्य होय. श्रीकृष्णांनी केलेल्या मार्गदर्शनानुरूप प्रत्येकाने जगण्याचे ठरविले असते तर आज जी परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे, आज संपूर्ण जगात जो मोठा महामारीसारखा रोग आलेला आहे, रोग आला असता अनेक प्रकारची साधने व सुविधा उपलब्ध असताना हा रोग काय आहे व त्याला कसा घालवायचा, हे कळू शकत नाही, अशी वेळ आली नसती.

आयुर्वेदसुद्धा हजारो वर्षांपासून विकसित झालेला आहे. म्हणून आयुर्वेदिक तत्त्वांचे मार्गदर्शन श्रीमद्भगवद्गीतेत सापडतेच. संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या या महामारीसाठी आयुर्वेदाचा कदाचित उपयोग होऊ शकला असता; कारण आयुर्वेदात अशा प्रकारचे रोग व महामारी होऊन मनुष्यमात्राचा व सृष्टीचा नाश कसा होऊ शकेल व त्यावरच्या इलाजांचे मार्गदर्शन केलेले आहे. मनुष्याला हवा आहे आनंद. आपण केलेल्या कोणत्याही कृतीतून आपण आनंद मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. उदा. जेवणानंतरही ‘आनंद आला’ असे आपण म्हणतो. अंघोळ करणे, नाटक-सिनेमा पाहणे, शिक्षण घेणे, नोकरी करणे वगैरे सर्वांमध्ये आपल्याला आनंद हवा आहे, तोही थोड्या वेळासाठी नाही, तर निरंतर टिकणारा हवा. एखादी वस्तू खात असताना आपल्याला आनंद तर होतो; परंतु त्यानंतर त्रास झाल्यास अगोदर झालेल्या आनंदावर विरजण पडू शकते.

आनंद कुठे मिळतो, याची अजूनपर्यंत तरी कोणी जाहिरात केलेली दिसत नाही. कितीही पैसे दिले, तरी आनंद विकत मिळत नाही. आनंद विकत घेऊ शकता येत नसेल तर मिळविलेल्या संपत्तीचा, कमावलेल्या नावाचा काय उपयोग? असेच काहीसे झाल्यामुळे अर्जुनालाही विषाद प्राप्त झाला. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी आपण बरेच काही केले अशी आपली स्वतःची माणसे, आपलेच घरचे लोक आपल्या विरुद्ध जातात, आपले शत्रू बनतात. त्या वेळी माणसाला आनंदाच्या विरुद्ध टोकाला असलेला भाव म्हणजे विषाद उत्पन्न होतो, त्याला काही करावेसे वाटत नाही, जगावे की नाही, असा संभ्रम पडतो. आणि लक्षात येते, की सत्ता आली, संपत्ती मिळाली, सर्व व्यवस्थित आहे, असे वाटत असले तरी त्याचा काही उपयोग नाही.

आनंद बाहेर मिळत नाही, आनंद आत असतो. नित्यानंद-परमानंद हे परमेश्वराचे दुसरे रूप आहे. आपल्या आत असलेल्या परमेश्वराच्या अंशाचा अनुभव आपल्याला हवा असतो. पण, त्यासाठी आपण काहीच करायला तयार झालो नाही, तर आपण आनंदापासून वंचित राहतो. आपण कशासाठी जगलो, असा प्रश्न माणसाला भेडसावू लागतो. अर्जुनाला विषाद प्राप्त झाल्यावर भगवंतांनी घरगुती म्हणावा असा एक सोपा उपाय सांगितला. भगवंतांनी अर्जुनाला खडसावून सांगितले,   

हे अर्जुना, नपुंसकता सोड, हृदयाचा विचार कर, हृदयात ताकद म्हणजे आत्मविश्वास धर, स्वतःवर विश्वास ठेव आणि उभा राहा. घरगुती उपचार संपूर्णतया व प्रत्येक वेळी काम करतीलच असे नसते. म्हणून घरगुती उपचारांबरोबर वेगवेगळे उपचार सांगावे लागतात. यासाठी भगवंतांनी सांगितले,
 
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगोऽस्त्वकर्मणि ।।२-४७ ।। 

हे अर्जुना, तू कर्म कर, कर्म करण्याचा आनंद मान, कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे. फल कशा प्रकारे यावे, किती यावे, कर्माचे फळ फक्त मलाच मिळावे, असे अपेक्षित केले तर ते योग्य नाही. झाड लावल्यावर त्याला फळे येतातच, आलेल्या फळांवर इतरांचाही हक्क आहे. कर्माला आलेली फळे एकूण सृष्टिचक्राला चालवण्यासाठी आलेली आहेत, असा विचार केल्यास कर्म करणाऱ्याला कर्माची बाधा न होता कर्माचे रूपांतर कर्मयोगात होते, असे भगवंतांनी सांगितले.
सरतेशेवटी भगवंतांनी काय सांगितले असावे, हे संजय श्रीमद्भगवद्गीतेच्या शेवटी म्हणत आहे ते असे,

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।१८-७८।।

जेथे योगेश्वर श्रीकृष्ण (म्हणजे आतला परमात्मा, शांती, परमानंद) आहे व त्याच्याबरोबरीने जेथे धनुर्धर पार्थ (म्हणजे कर्म करणारा) आहे तेथे श्री, विजय, धृति, नीती असते. हे सर्व मिळाल्यास आपण नित्यानंदात, परमानंदात ओतप्रोत न्हाऊन निघतो. या सर्वांचा विचार केला तर असे दिसते की आपण केवळ पैसा, समृद्धी व भौतिकाच्या मागे लागलो आहोत. यामुळे आपण अडचणीत आलेलो आहेत. रेल्वे नेहमी दोन रुळांवर चालते. रुळाच्या दोन्ही बाजूंना प्लॅटफॉर्म करता येतात. दोन्ही बाजूच्या प्लॅटफॉर्मवर चढण्या-उतरणाऱ्यांची पद्धत वेगळी असू शकते. रूळ दोन दिसत असले तरी ते शेवटी पोहोचतात मात्र एकाच ठिकाणी. आगगाडीचे इंजिन व्यवस्थित असले व ती योग्य स्थळी पोहोचते. याचप्रमाणे आपण पैसा मिळविणे व आनंदाचा शोध घेणे ही दोन्ही कर्मे एकाच वेळी केली, आपल्याकडे आलेला पैसा समाजाबरोबर वाटून घेतला, समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या तर आपण आनंदप्राप्तीच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकू. आपल्याला या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करायच्या आहेत.

नुसत्या पैशामुळे आनंदप्राप्ती दूरच, आरोग्यही विकत घेता येत नाही. ध्यान-धारणा करत, संन्यास घेऊन कुठेतरी बसून राहिले तरी आनंद मिळत नाही. कर्माची साथ आवश्‍यक असतेच. हे सर्व लक्षात घेऊन आपण जीवनात आनंदापर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. हे होण्यासाठी प्रथम आपली तशी पक्की धारणा असायला हवी. त्यानंतर काय करावे, याचा विचार करावा लागेल. सरतेशेवटी ठरविलेले आचरणात आणावे लागेल. म्हणून ‘लाइफ इन्‌ बॅलन्स’ मूव्हमेंट ही योजना तयार केली. आपल्याला जीवनाला संतुलित करायचे आहे. जीवनात परिवर्तन करून पुन्हा नवीन पद्धतीने जीवन उभे करायचे आहे, सृष्टीत परिवर्तन करायचे आहे. यासाठी ‘लाईफ इन्‌ बॅलन्स’ महत्त्वाचे आहे. संपत्तीचा, वृक्षसंपदेचा, शेताचा अपरिमित नाश झाल्याचे आज आपण पाहतो आहोत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनुष्याला फक्त संपत्तीसाठी करत असलेल्या कर्मापासून दूर ठेवण्यात आले. त्याची काम करण्याची शक्ती हिरावण्यात आली. मनुष्याला घरी बसवून ठेवल्यास तो कर्म करणार कसा? अशा दृष्टीने आज आपल्या क्रयशक्तीचा नाश झाल्याचे दिसत आहे. एकूणच धन-धान्य-संपत्ती नष्ट झाली. ती संपत्ती आपल्याला पुन्हा मिळवली लागेल. त्यासाठी आत्मविश्वास, आत्मनिर्भरता यांबरोबरच आपल्याला वेगवेगळे विचार आतून स्फुरावे लागतील. आत जाऊन आनंदापर्यत पोचल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या स्फुल्लिंगापासून निघणाऱ्या कल्पना आपल्यासाठी जीवनोपयोगी ठरतील.

परिवर्तन घडविण्यासाठी...
‘लाइफ इन्‌ बॅलन्स’ध्ये वेगवेगळ्या सोप्या सोप्या गोष्टींचे आचरण करण्यास सुचविलेले आहे. कृतीला पूर्वीच्या जीवनाचा आधार हवा. बरोबरीने सद्यजीवन व भविष्याचा विचार करून कृती (मोड्यूल्स) करायला हव्या. हे सर्व लक्षात घेऊन आपल्या शरीरातील पेशींना सवय लावणे आवश्‍यक आहे. केवळ मनाला सांगून मन ऐकेलच, याची खात्री नसते म्हणून पेशींना सवय लावण्याची, त्यासाठी ‘लाइफ इन्‌ बॅलन्स’ मूव्हमेंटची ही आजच्या काळाची गरज आहे. हे शंभर, दोनशे, हजार माणसांनी करून होण्याचे काम नव्हे. नदीवर पूल बांधत असताना अमुक पॅनेल उचलताना आठ माणसे लागतील, अमुक पॅनेल उचलताना सहा माणसे लागतील असे ठरलेले असते. तसे जगात परिवर्तन घडून आणण्यासाठी ‘क्रिटिकल मास’ म्हणजे काही विशिष्ट लोकसंख्येची आवश्‍यकता आहे, शंभर वा हजारांकडून हे साध्य होणार नाही.

त्यामुळे मोठ्या लोकसंख्येने ‘लाइफ इन्‌ बॅलन्स’ व्हमेंटमध्ये भाग घेऊन त्यानुसार आचरण करण्यास सुरुवात करावी, ज्यामुळे पुन्हा एकदा मनुष्यमात्राला नवीन दिशा सापडेल, मानवता वाढेल, उत्क्रांतीचा एक वेगळा टप्पा आपण गाठू, आपले जीवन पुन्हा एकदा आनंदमय होईल. असे सर्व ज्ञान ज्यात आहे ती आहे श्रीमद्भगवद्गीता. आज आपण श्रीमद्भगवद्गीताजयंती साजरी करतो आहोत. श्रीमद्भगवद्गीतेचा थोडा तरी भाग आज वाचावा, त्याच्या अर्थावर चिंतन करून भगवंत काय सांगत आहेत हे बघण्याचा प्रयत्न करावा. तरच जसे वाढदिवसाला आपण भेट देतो तसे श्रीकृष्णांना व श्रीमद्भगवद्गीतेला जयंतीनिमित्ताने भेट देण्यासारखे होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com