मन मंदिरा... : मन:शांतीचे सुकाणू आपल्याच हाती

डॉ. विद्याधर बापट
Saturday, 2 January 2021

‘सकारात्मक विचारसरणी’ हा एक आयुष्याकडे, त्यातील विविध घटना, व्यक्ती, विचार ह्यांच्याकडे पाहण्याचा आशादायक दृष्टिकोन आहे. तो तयार करणं म्हणजे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधण्याची मनाची धाटणी बनवणं. आयुष्यातला प्रत्येक क्षण रसरसून जगण्याची ती कला आहे.

‘सकारात्मक विचारसरणी’ हा एक आयुष्याकडे, त्यातील विविध घटना, व्यक्ती, विचार ह्यांच्याकडे पाहण्याचा आशादायक दृष्टिकोन आहे. तो तयार करणं म्हणजे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधण्याची मनाची धाटणी बनवणं. आयुष्यातला प्रत्येक क्षण रसरसून जगण्याची ती कला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीचा, आपल्याला आयुष्यात सुख, समृद्धी, यश मिळेलच ह्यावर ठाम विश्वास असतो. तसंच आयुष्यातल्या विपरीत घटना, संकटं ह्यावर आपण सहजी मात करू, ज्या गोष्टी अटळ आहेत त्या आनंदाने विनाअट स्वीकारू, अशी तिची मनोभूमिका असते. त्यामुळे अशा व्यक्ती दुःख, अपयश अशा गोष्टी सहजी पचवतात. किंबहुना अशा गोष्टी ह्या आयुष्याच्या खेळाचा एक भाग आहेत, असा त्यांचा दृष्टिकोन असतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनाला तसं वळण लावण्यासाठी आपल्याकडे असलेल्या क्षमता ओळखूया, लक्षात घेऊया. स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवूया. आपल्या मन:शांतीचे सुकाणू आपल्याकडे ठेवूया. म्हणजेच इतर माझ्याविषयी काय म्हणतात. मला वाखाणतात की माझ्यावर टीका करतात, ह्यावर माझी मन:शांती अवलंबून असता कामा नये. माझा आतला गाभा नेहमीच स्वस्थ, शांत असला पाहिजे. स्वत:विषयी व इतरांविषययीही सतत चांगला विचार करूया. चांगलं बोलूया. इतरांच्या चांगल्या कृतीबद्दल, त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करूया. ज्या लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवलं त्यांचा आदर्श समोर ठेऊया. त्यानं सकारात्मक दृष्टिकोन रुजायला मदत होईल. नकारात्मक संवाद आणि नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांपेक्षा सकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांबरोबर राहूया.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्व-संवाद सतत सुरू असतो. तो सकारात्मक होतोय, याकडे जाणीवपूर्वक पाहूया. नकारात्मक विचार मनात आले, तर त्वरित जाणीवपूर्वक सकारात्मक विचार मनात आणूया. ह्याचा अर्थ स्वत:शी भांडायचं नाही आहे तर शांतपणे सकारात्मक पर्याय मनात आणून त्याप्रमाणे कृती करायची आहे.  असहाय्य वाटलंच तरी त्याचा अर्थ सगळं संपलं असं नव्हे. आयुष्यात कुठलीच परिस्थिती कायम रहात नाही. रात्री नंतर दिवस असतोच. There is always light at the end of tunnel. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाशाची तिरीप असतेच. म्हणूनच विपरित परिस्थिती आलीच, तर ती बदलेलच ह्यावर ठाम विश्वास ठेवूया.  जर आपण नकारात्मक विचारसरणीचे असू तर स्वत:त बदल घडवणं अत्यावश्‍यक आहे हे मान्य करूया. असा बदल घडवता येतो हे मान्य करुया. भूतकाळातल्या कडवट आठवणी व अनुभव विसरूया आणि पुढे जाऊया. स्वत:वर टीका करणं थांबवूया आणि आव्हानांना सामोरं जायचं ठरवूया. कळत किंवा नकळत होणारं नकारात्मक बोलणं थांबवूया. उदा. मला जमणार नाही, मला ह्याआधी कधीच जमलं नाही वगैरे. प्रत्येक गोष्ट व्यक्तिश: घ्यायला नको. साक्षीभावाने माणसं, प्रसंग, घटना अनुभवायचा प्रयत्न करुया. साक्षीभाव म्हणजे औदासीन्य किंवा निष्ठुरपणा नव्हे, तर शांतपणे परिस्थिती न्याहाळण्याची ती एक कला आहे. ती आत्मसात करूया.

विचार व विश्‍लेषणक्षमता
सकारात्मक विचारसरणीचा मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो. मेंदूमध्ये prefrontal cortexमध्ये न्यूरॉन्सची वाढ होते. नवीन synapses तयार होतात. ह्याच भागामधे मन, विचार ह्यासंबंधीचे महत्वाचे कार्य चालते. विश्‍लेषण करण्याची व विचार करण्याची क्षमता वाढते. मनाची सतर्क रहाण्याची क्षमता वाढते. सकारात्मक विचारसरणी एकदा रुजली की नवनवीन, सृजनात्मक विचार निर्माण होण्याची क्षमता वाढते. संशोधनाअंती सकारात्मक विचारसरणीचे खूप फायदे लक्षात आले आहेत आयुर्मान वाढणं, ताणतणावाचं निराकरण, अस्वस्थतेचे आजार व नैराश्‍याचा आजार टाळणं किंवा झाल्यास लवकर बरं होण्यात मदत होणं. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढणं. मनाचं ‘पॉझिटिव्ह रिप्रोग्रामिंग’ शक्‍य आहे. फक्त स्वत:त बदल घडवण्याची तीव्र इच्छा हवी.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr Vidyadhar Bapat on Peace of mind

Tags
टॉपिकस
Topic Tags: