भाष्य : कण आले दुरुनि...

‘हायाबुसा-२’ या जपानच्या यानाने अवकाशपाषाणावरून काही नमुने घेतले.
‘हायाबुसा-२’ या जपानच्या यानाने अवकाशपाषाणावरून काही नमुने घेतले.

अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात जपान व चीनही आता जोमाने उतरले आहेत. चंद्रावरून अभ्यासासाठी काही नमुने आणण्यासाठी चीनने यान पाठविले होते आणि ते नुकतेच म्हणजे १७ डिसेंबरला परतले. जपानच्या मोहिमेमुळे सूर्यमालेच्या निर्मितीप्रक्रियेशी संबंधित काही गोष्टींवर प्रकाश पडू शकेल, अशी संशोधकांना आशा वाटते.

अवकाश संशोधन कार्यक्रम म्हटले, की अमेरिका आणि रशिया ही नावेच चटकन समोर येतात. पण, आता चित्र काहीसे बदलत आहे. अलीकडच्या दोन मोहिमांनी या क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष वेधले गेले. या मोहिमा आहेत चीन आणि जपानच्या. हे दोन्ही देश दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणुकार्यक्रमात व नंतरच्या अवकाश कार्यक्रमात नव्हते. दोघांनी साधारणतः १९८०च्या दशकानंतर आर्थिक प्रगती साधली. एकूण अंतराळ कार्यक्रमात जपानने इतर देशांच्या सहाय्याने झपाट्याने प्रगती केलेली आहे; तर चीन आपल्या स्वभावानुसार बहुतांशी स्वतःच्या बळावर अवकाश कार्यक्रम पुढे नेत आहे. चंद्रावरून अभ्यासासाठी काही नमुने आणण्यासाठी चीनने यान पाठवले होते आणि ते नुकतेच म्हणजे १७ डिसेंबरला परतले. अवकाशातील पाषाण गोळा करून आणण्याची मोहीम जपानने आखली. या नमुन्यांचा अभ्यास करण्यातही ब्रिटनसारख्या देशांना बरोबर घेतले आहे. सूर्यमालेच्या निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात हा पाषाण अलग झाला होता. त्याच्या अभ्यासामुळे सूर्यमालेची निर्मिती झालेल्या प्रक्रिया समजून घेता येतील.

साडेचार अब्ज वर्षांपूर्वी...
पाच डिसेंबरच्या संध्याकाळी ‘हायाबुसा-२’ या जपानच्या आणि ‘चांग- ५’ या चीनच्या अवकाशयानाने पृथ्वीवर अवकाशातून नमुने आणण्याच्या बातम्या आल्या. जपानच्या यानाने ‘क्‍युगू’ या अवकाशपाषाणावरून नमुने आणले. तर चीनने चंद्रावरून नमुने गोळा केले होते. द. ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागात, जपानी अंतराळवाहन ‘हायाबुसा-२‘ (अर्थ- बहिरी ससाणा) या वाहनाने ‘क्‍यूगू’ या अवकाशपाषाणावरून पार्सल पाठवले. ‘क्‍युगू’ हा पृथ्वीपासून सुमारे २९ कोटी कि.मी. अंतरावर असणारा, सुमारे ८०० मीटर रुंदीचा पाषाण आहे. हा पाषाण साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेतील ग्रह, लघुग्रहांपासून सुटा झाला असावा. या पाषाणाचा त्या वाहनाने सुमारे वर्षभर अभ्यास केला. तेथील मातीचे नमुने गोळा केले. हे वाहन जसे पृथ्वीजवळ आले, तसे या वाहनातून ते पार्सल पृथ्वीच्या कक्षात सोडले आणि ‘हायाबुसा-२’ त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले. जसे ते पृथ्वीच्या वातावरणात आले, तसे सुमारे ११ किमी प्रतिसेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने रोरावत येऊ लागले, तेव्हा ते पृथ्वीच्या वातावरणात २००किमी उंचीवर होते. घर्षणामुळे असेल कदाचित; पण एखादा अग्नीगोल पृथ्वीकडे झेपावा, तसे अंतराळातील काही वाहनांनी दृश्‍य टिपले. नंतर त्या पार्सलचे पॅराशूट उघडले, त्याचा वेग काहीसा कमी झाला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वातावरणात सुमारे १० किमी अंतरावर आल्यावर पॅराशूटचे दिवे झगमगून आपला ठावठिकाणा सांगू लागले. त्याच्या आगमनाची वर्दी लागताच ऑस्ट्रेलियन हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने ते ताब्यात घेतले. तोपर्यंत जपानचे हेलिकॉप्टरही येऊन घिरट्या घालू लागले होते. अंधारात त्यांना नेमके ठिकाण सापडेना. अखेर उजाडल्यावर त्यांना ते ठिकाण सापडले. सुमारे १६ किलो वजनाचे हे पार्सल योग्य अवस्थेत जपानच्या ताब्यात आले आहे. असे पाषाण म्हणजे सूर्यमालिका तयार होताना विखुरलेले काही तुकडे असतात. ते काही कारणाने बाजूच्या ग्रहात किवा लघुग्रहात सामावून न गेल्यामुळे तसेच अंतराळात फिरत राहातात. नंतरही उल्केसारखे ते एखाद्या ग्रहाच्या कक्षेत खेचले जात नाहीत. काहींच्या मते सुरुवातीच्या काळात पृथ्वीवर आलेले पाणी अशा पाषाणांवरून आलेले होते. तरीही या पाण्यांचे पृथःकरण केले, तर ते पृथ्वीवरील पाण्यापेक्षा वेगळे असू शकेल. आजपर्यंत आपण धुमकेतूंच्या अभ्यासातून पाण्याचा शोध घेत आलो. त्यापेक्षा अशा पाषाणांकडे लक्ष द्यायला हवे, असे संशोधकांना वाटते आहे.

वेळ, वेगाचा ताळमेळ 
या पार्सलबरोबरच काही वायूचे नमुने विश्‍लेषणासाठी आणलेले आहेत. या व्यतिरिक्त सुमारे १०० मिलिग्रॅम वजनाचे कण आहेत. आता या नमुन्यातील काही भाग ब्रिटनमधील मॅंचेस्टर, ग्लासगो अशा विद्यापीठांना आणि ‘नॅचरल हिस्टरी मुझियम’ला संशोधनासाठी पुढल्या वर्षी मिळेल. ‘हायाबुसा-२’ची सुरुवात २०११मध्ये झाली. २०१४मध्ये ते वाहन प्रत्यक्षात अंतराळात सोडले. साडेतीन वर्षानी ते तेथे पोहोचले. फेब्रुवारी २०१८मध्ये बंदुकीच्या गोळीसारखा आघात करून धुळीचे नमुने घेतले, तर जून २०१८मध्ये छोटा स्फोट केला. ते परत पृथ्वीच्या दिशेने झेपावले. हे पार्सल पृथ्वीवर पोहोचवून ‘हायाबुशा- २’ हे अंतराळवाहन पुढच्या लांबच्या प्रवासाला निघून गेले आहे. त्याच्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे, तो एका खूप छोट्या, ३०मीटरहून कमी रुंदीच्या अंतराळ पाषाणाकडे जाण्याचा. तो टप्पा गाठला जाईल २०३१मध्ये.    

दुसरे पार्सल चंद्रावरून पृथ्वीवर आले आहे. चीनच्या चांगे (चीनची चंद्रदेवता) ५ या अवकाशयानाने सुमारे २ किलो नमुने गोळा केलेले आहेत. अमेरिकेच्या अपोलो मोहिमेनंतर सुमारे ४५वर्षांनी चंद्रावरून हे नमुने आणलेले आहेत. अपोलो मोहिमेच्या वेळी अंतराळवीरांनी स्वतःच हे नमुने आणले होते. मानवरहित यानाने दूरनियंत्रणाद्वारे आणलेले हे पहिलेच नमुने. चीनने या मोहिमेची सुरुवात २३ नोव्हेंबर २०२०ला केली. हे यान एक डिसेंबरला चंद्रावर उतरले. उतरणाऱ्या वाहनाने लगेच नमुने गोळा करायला सुरुवात केली. नमुने गोळा करून झाल्यावर वर जाणाऱ्या वाहनाने ते चंद्रावरून तीन डिसेंबरला उचलले व लगेच सहा मिनिटात ते कक्षेत भ्रमण करू लागले. ते भ्रमण करीत असतानाच, हे नमुने पृथ्वीवर नेण्यासाठीच्या वाहनाकडे सोपवायचे होते.

त्याकरीता ते त्या वाहनाच्या समोर दोन इंचाच्या अचुकतेने आणायचे होते. मग पहिले वाहन दुसऱ्याची पकड मिळवणार होते. त्यानंतर अर्ध्या तासात पार्सल पोहोचवण्याचे काम पार पाडायचे होते. या घडामोडींची सर्व नियंत्रणे पृथ्वीवर होती. तीन लाख ८० हजार कि.मी.वरून हे काम होत होते. संदेशवहनात वेळेचा फरक असणार होता. प्रतिमा मिळवतानाचा वेळ आणि संदेश पाठवण्याचा, तसेच प्रत्यक्ष कृतीचा वेग व वेळ यात अंतर पडणार होते. हे काम कठीण होते. आठवडाभर चंद्राच्या कक्षेत भ्रमण झाल्यावर परतीच्या प्रवासाचे इंजिन चालू झाले. ११३ तासांचा प्रवास करून ते चीनमध्ये त्याच्या तळावर परत आले. मात्र चांद्रयानाचा वेग, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतरच्या वाहनाच्या आवश्‍यक वेगाहून जास्त असल्याने वातावरणात शिरण्यापूर्वी या यानाचा वेग कमी करावा लागला.

चीनने मिळवलेले नमुने प्रयोगशाळांत रासायनिक पृथःकरणासाठी नेले जातील. किरणोत्सार असेल, तर तो किती आणि कोणत्या मूलद्रव्यांमुळे होतो, याचा तपास होईल. मूलद्रव्यांची वेगवेगळी कोणती समस्थानिके आहेत, हे अभ्यासले जाईल. या यशामुळे चीनला चंद्रावर माणूस पाठवणे शक्‍य होणार आहे. चांग ६ (२०२३-२४), चांग- ७ (२०२३), चांग ८- २०२७) हे पुढचे टप्पे गाठल्यावर २०३० नंतर मानवासहित चांद्रप्रवासाची आखणी होणार आहे.  या चांद्रमोहिमेमुळे चंद्र-पृथ्वीच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. जपानच्या मोहिमेमुळे  सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल नवी माहिती मिळेल.
( लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com