
सर्वप्रथम आमच्या वाचकांना सप्रेम नअस्कार! नव्या वर्शाच्या अनेकानेक शुभेच्छा. ज्याप्रमाणे चकोर पक्षी चांदण्या रात्रीची प्रतीक्षा करत असतो, त्याप्रमाणेच मीदिखील या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होत्ये. खरे सांगायचे तर असे सुंदरसे सदर लिहिण्याची संधी नवे वर्ष माझ्यासाठी घेऊन येईल, असे स्वप्नातदिखील वाटले नव्हत्ये हं!
सर्वप्रथम आमच्या वाचकांना सप्रेम नअस्कार! नव्या वर्शाच्या अनेकानेक शुभेच्छा. ज्याप्रमाणे चकोर पक्षी चांदण्या रात्रीची प्रतीक्षा करत असतो, त्याप्रमाणेच मीदिखील या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होत्ये. खरे सांगायचे तर असे सुंदरसे सदर लिहिण्याची संधी नवे वर्ष माझ्यासाठी घेऊन येईल, असे स्वप्नातदिखील वाटले नव्हत्ये हं! हल्ली अशी छॉन स्वप्ने पडतात तरी कुठे? दरवेळी स्वप्नात मेले ते जिन्यावरुन गडगडणे आणि परीक्षेत नापास होणे!!...हल्ली हल्ली एक पीपीइ किट घातलेला काळाकभिन्न माणूस स्वप्नात येई आणि मी घाबरुन किंचाळत उठे. जाऊ दे. हे विशयांतर झाले.
‘नव्या वर्शात नवे सदर सुरु कराल्का?’ असा माननीय संपादकांचा (मधाळ आवाजात) विचारणा करणारा फोन आला, तेव्हा मी नेमकी आयुष काढ्याचे पातेले ग्यासवरुन (सांडशीने) उचलत होत्ये. थोडी सर्दी झाल्यासारखे झाले होते. मा. संपादकांचा गैरसमज झाला. त्यांना वाटले, कुणी पुरुशच बोलताहेत! त्यांनी विचारले, ‘‘थोर विदुशी (की विदुषी?) डॉ. कु. सरोजम्याडम आहेत्का?’’ माझा आवाज थोडा नाना पाटेकरांसारखा आहे, हे खरे. पण इतकाही काही वाईट नाही. पडसेच झाले होत्ये. त्यांनी सदराबद्दल विचारले. माझ्या हातून आयुष काढा सांडलाच!! पुन्हा आधण ठेवावे लागले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मा. संपादक (मधाळ आवाजात) म्हणाले, ‘‘मराठी साहित्याला सध्या प्रचंड मरगळ आली आहे. चांगली समीक्षा होत नसल्याने चांगले साहित्य निर्माणच होत नाही. तुम्ही समीक्षेच्या प्रांतातील शुक्रतारा आहा! तुम्ही लिहाल्का?’’
‘‘इश्श! शुक्रतारा काय? शुक्राची चांदणी म्हणा! ते ठीक राहील!,’’ तिथल्या तिथे माझ्या समीक्षक वृत्तीने त्यांची चूक दाखवली. शेवटी आशयाच्या चौकटीतच विचूकपणे संवेदनांचे अनुयोजन होणे उचित नव्हे का? असो. (हे वाक़्य वानोळ्यापुरते वापरले आहे हं! समीक्षेच्या आभाळात मी शुक्राची चांदणी नव्हे, चंद्रिका आहे चंद्रिका!!)
अखेर दर शनिवारी साहित्यिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा (वेगवेगळ्या पद्धतीने) परामर्श घेणारे सदर लिहिण्याचे ठरले. म्हंजे मी ‘हो’ म्हटले! मा. संपादकांनी धन्यवाद देत सांगितले, की ‘‘ शनिवार-रविवारी संपादकीय विभागाच्या सुट्या असतात. त्यामुळे पानात मजकूर भरायची वानवा होते. काहीतरी भरताड भरून साजरे करून न्यावे लागते. म्हणून तुम्हाला विनंती केली. थॅंक्यू!’’
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नव्या सदराला नाव काय ठेवावे? हा विचार मनात शिंकेसारखा उमटला. मराठी भाषेत अनेक पुस्तके निर्माण होतात. काव्यसंग्रहांचे तर काही विचारुच नका! एवढी हजारो पुस्तके छापण्यासाठी कागद तयार करावा लागतो. कागद हा बांबूपासून बनतो (हो ना?) शेकडो बांबूची बने तुटतात, तेव्हा कुठे एक कादंबरी किंवा काव्यसंग्रह निर्माण होतो. तसाही आपल्या आयुष्यात बांबूचे महत्त्व आहेच. ते का वेगळे सांगायला हवे? (हरे राम!) म्हणून सदराचे नाव ‘हौस ऑफ बांबू’ असे आगळेवेगळे ठेवले आहे. आवडले ना?
सदर लिहिण्यासाठी ‘ठणठणपाळिका’ असे टोपणनाव कुणीतरी सुचवले. मी स्पष्ट नकार दिला. मला असला थिल्लरपणा बिलकुल आवडत नाही. मी गंभीर स्वभावाची मुलगी आहे. मी म्हटले माझ्या नावानेच मी सदरलेखन कर्णार!! कु. सरोज चंदनवाले हे किती सुंदरसे नाव आहे! काहीजण नावाआधी ‘प्रा.’ किंवा ‘डॉ.’ आवर्जून लिहितात. मी ‘कु.’ असे लिहिते. काही लोक ‘कु’चा फुलफॉर्म ‘कुप्रसिध्द’ असा करतात! त्यांना सर्दी होवो आणि वेळेवर आंब्युलन्स न मिळो! चहाटळ मेले!!
तेव्हा, आता दर शनिवारी आपण इथे भेटू. साहित्य आणि कला-सांस्कृतिक क्षेत्रातल्या घडामोडींचा परामर्श घेऊ. पुढल्या शनिवारची वाट पाहात्ये. तुम्हीही पहा!!
Edited By - Prashant Patil