समाजवास्तवाला भिडणारी ‘सनातन’

अलीकडेच केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री दोनशे वर्षांपूर्वीच्या जातविरोधी आंदोलनाच्या स्मरणासंदर्भात एकत्र आले होते.
Sanatan Book
Sanatan BookSakal
Summary

अलीकडेच केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री दोनशे वर्षांपूर्वीच्या जातविरोधी आंदोलनाच्या स्मरणासंदर्भात एकत्र आले होते.

‘मराठी कादंबरी आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या कादंबऱ्या’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय यांच्यातर्फे दिवसभराचे चर्चासत्र नुकतेच झाले. त्याचा गोषवारा.

अलीकडेच केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री दोनशे वर्षांपूर्वीच्या जातविरोधी आंदोलनाच्या स्मरणासंदर्भात एकत्र आले होते. यासंबंधीचा कार्यक्रम तमिळनाडूमधील नागरकोईल शहरात झाला. हे शहर पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानचा भाग होते. एकोणिसाव्या शतकात दक्षिणेतील त्रावणकोर संस्थानात मागास वर्गातील स्त्रियांना छातीच्या वरच्या भागात वस्त्र लेण्याची मुभा नव्हती, तशी प्रथा होती. त्याच्या विरोधात जर एखादी स्त्री उभी राहिली तर दंड होत असे. काही स्त्रिया या संदर्भात उभ्या राहिल्या. महिलांच्या आत्मसन्मानाच्या लढ्याचा हा धागा पकडून हे मुख्यमंत्री एकत्र आले होते. हा सामाजिक संदर्भ येथे देण्याचे निमित्त म्हणजे मराठीतील सरस्वती सन्मान पुरस्कार विजेते लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीत हे तत्कालीन संदर्भ आले आहेत. लिंबाळे यांची ही कादंबरी एकूणच देशातील अशा सामाजिक वास्तवाला भिडणारी आणि समकालीन वास्तवाशी त्याची नाळ जोडणारी आहे.

नवी दिल्लीतील के.के.बिर्ला फाउंडेशनने सरस्वती सन्मान या कादंबरीसाठी डॉ. लिंबाळेंना दिला. मात्र मराठी समीक्षेच्या जगात आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आजही डॉ. लिंबाळे यांच्या या पुस्तकाची उपेक्षा संपलेली नाही. त्याची सल सुजाण वाचकांनाही जर वाटली नाही, तर मग अशा लेखकांनी काय करायचे? सर्वाधिक प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित होऊन वाचकांपर्यंत पोहोचलेला हा मराठीतला आघाडीचा लेखक आहे. अशा या लेखकावर दिवसभराचे चर्चासत्र घेण्याची ही कल्पना आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव आणि इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी मलपे यांनी अंमलात आणली. या चर्चासत्रात लक्षवेधी भाषण ठरले ते डॉ. दामोदर खडसे यांचे.

आज देशभर समांतर साहित्य चळवळ जी कमलेश्वर यांच्या प्रेरणेने सुरू झाली, त्यात डॉ. खडसेंचा सहभाग फार मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानात हे सगळे मुद्दे डोकावत होते. चर्चासत्रात ज्येष्ठ लेखक ना.मा. शिंदे, लक्ष्मण गायकवाड, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्रा.डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ.विश्वनाथ शिंदे, राकेश वानखेडे, शिवदत्ता वावळकर, प्रा. निशा भंडारे, सोमनाथ दडस, दुर्गा भिसे, प्रा. राजेंद्र खंदारे, डॉ. विजयकुमार खंदारे, प्रा.सत्यजित खांडगे आदींनी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले.

कोणतीच जात नसलेला लेखक!

‘सनातन’ ही कादंबरी २०१८मध्ये भीमा-कोरेगाव युद्धाला द्विशतक पूर्ण झाल्याच्या दिवशी प्रकाशित झाली होती. याखेरीज अन्य सात महत्त्वाच्या कादंबऱ्या लिंबाळे यांनी लिहिल्या आहेत. भिन्नलिंगी, उपल्या, हिंदू, बहुजन, झुंड, ओ, रामराज्य या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. चर्चासत्रानिमित्त दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे यांनी ‘सनातन’ची चौथी आवृत्ती कार्यक्रमात प्रकाशित केली. डॉ. लिंबाळेंच्या सर्व कादंबऱ्या आणि कवितांसह सर्व लेखन गेली ३२वर्षे ‘दिलीपराज’च्या वतीने प्रसिद्ध होत आहे. चर्चासत्राचा केंद्रबिंदू ‘सनातन’च होती. उद्घाटनाच्या भाषणात डॉ. पंडित विद्यासागर यांनी लेखकाच्या मूल्यविचारांकडे निर्देश केला.

‘जातीला जात वैरी’ या पुस्तकाने मराठी साहित्यात एकेकाळी गाजलेले लेखक ना.मा. शिंदे यांचे भाषण महत्त्वाचे होते. जातीबाहेरचा आणि कोणतीच जात नसलेला असा हा लेखक आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितले. डॉ. धोंगडे यांनी, यात ज्या यातना पददलित वर्गातील स्त्री-पुरुषांना आपला समाज देत आला आहे, त्याची लाज वाटत नाही का? असा केलेला प्रश्न सर्वांनाच अंतर्मुख करून गेला.

डॉ. लिंबाळे यांची मुलाखत फार हृदयस्पर्शी झाली. त्यांच्या जीवनप्रवासात त्यांच्या कुटुंबीयांसंबंधी विचारल्यानंतर शरणकुमारांचे डोळे भरून आले आणि आपण पत्नीकडे फार दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अलीकडेच कुसुम लिंबाळे एका आजारातून बाहेर आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘राजकारणात प्रवेश करणार नाही. आंबेडकर हा माझा हिरो आणि प्रेरणा’, असे खणखणीत सांगत, आपण आपल्या साहित्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांची चळवळ पुढे नेणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. मुलाखतीतून त्यांचा एक मोठा जीवनप्रवास समोर आला. मराठी साहित्य आणि समीक्षेच्या अनेक भिंती आहेत. त्या उल्लंघून देशभर जाणे, हे सोपे नसते. पण डॉ. लिंबाळे धाडसाने त्यातून बाहेर पडले आणि डॉ. खडसे यांच्यासारख्या अनुवादकामुळे त्यांना हिंदी प्रदेशातील मोठी वाट सापडली.

डॉ. खडसे यांनी सांगितले, ‘‘हिंदी साहित्यात एखादे पुस्तक आल्यानंतर मग अन्य प्रादेशिक भाषांमध्ये त्याची चर्चा सुरू होते. त्याच्या अनुवादाकडे संबंधित जाणकारांचे लक्ष वेधले जाते. लिंबाळे यांच्याबाबतीत असेच घडले. दोन महिन्यांपूर्वी त्यांना केरळच्या विधिमंडळाने राज्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. त्यांचा मोठा सत्कार समारंभ केला. त्यांच्या साहित्यावर चर्चाही ठेवली. हा सगळाच भाग एका व्यक्तीपुरता नसून, राष्ट्रीय पातळीवर मराठी लेखकाचा जो गौरव होतो, त्याच्याशी संबंधित आहे. अशीच काहीशी उपेक्षा नामदेव ढसाळ या प्रतिभावंत कवीची झाली होती; पण दिलीप चित्रे यांच्यासारखा प्रतिभावंत अनुवादक कवी त्यांच्याबरोबर आला आणि खूप उशिरा नामदेवच्या कवितांचे इंग्रजीतून अनुवाद होऊन मग त्याची पुस्तके प्रकाशित झाली. आज डॉ. लिंबाळे या नव्या जागतिक आयामाच्या आवर्तनासाठी सिद्ध झाले आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com