ज्योतीने तेजाची आरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shicharitra English Book
ज्योतीने तेजाची आरती

ज्योतीने तेजाची आरती

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकार अशीदेखील स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांची ओळख सांगता येईल. त्यांचा जन्मदिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या या काहीशा अज्ञात पैलूची माहिती.

काही वेळा एखादी गोष्ट अगदी अनपेक्षितपणे समोर येते. आपल्याला सुखद आश्चर्याचा धक्काच बसतो. काही दिवसांपूर्वी तसेच झाले. जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील जयसिंगपूर कॉलेजच्या ग्रंथालयात पुस्तके बघत असताना (काही काळ तेथे प्रा. असलेले) माझे बंधू श्री. मोहन केतकर यांना एक शिवचरित्र दिसले. लेखकाचे नाव पाहताच त्यांनी ते घेतले, नोंद करून घरी आणले. त्या पुस्तकाचे नाव ः शिवाजी द ग्रेट पॅट्रियट. लेखकाचे नावः लाला लजपत राय. एका महान क्रांतिकारकाचे नाव दिसताच ते पुस्तक लगेच वाचायला घेतले. सुरुवातीलाच कळले की हा लालाजींच्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आहे. मूळ उर्दू पुस्तक १८९६ मध्ये प्रकाशित झाले होते. त्याची सुधारित आवृत्ती १९२३ मध्ये प्रकाशित झाली होती. (ती मोजक्या लोकांकडेच असेल). मूळ पुस्तक हे उर्दू भाषेत लिहिलेले आहे. भाषांतरकार-संपादक आर. सी. पुरी यांना ते त्यांच्या सासर्‍याच्या संग्रहात सापडले. ते लिहितात ‘सासऱ्यांच्या संग्रहात अचानक ते पुस्तक पाहताच माझे कुतूहल जागे झाल. ते पुस्तक उर्दूमध्ये होते. सुदैवाने मला उर्दू चांगले येत असल्याने मी ते लगेच वाचून काढले. ते वाचत असतानाच हे विलक्षण आहे, हे माझ्या ध्यानात आले आणि ते सर्वांसमोर यायला हवे असे मला वाटले. लेखनाचा अनुभव असल्यामुळे, आपणच त्याचे भाषांतर करायचे असे ठरवून, मी ते काम हाती घेऊन लगेचच पूर्ण केले. आता ते या पुस्तकरूपात वाचकांपुढे ठेवत आहे’.

प्रेरणादायी चरित्र

हे भाषांतर १९८० मध्ये प्रकाशित झाले आहे हे पाहून आश्चर्य वाटले. कारण विविध लेखकांनी लिहिलेल्या बऱ्याच शिवचरित्रांचा परिचय झालेला असतानाही त्यांत कोठेही मूळ उर्दू वा या भाषांतरित पुस्तकाचा उल्लेख वा संदर्भ आढळला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रांच्या यादीमध्ये या पुस्तकाचा समावेश झालेला आढळला नव्हता. एवढ्या मोठ्या व्यक्तीची ही साहित्यकृती अशी दुर्लक्षित का राहिली असावी, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी लाला लजपतराय यांच्या पूस्तकांचा विकिपीडियावर शोध घेतला तेव्हा तेथील पुस्तकांमध्येही या पुस्तकाचा, (बहुधा ते उर्दूमध्ये असल्यामुळे) उल्लेख नाही. म्हणून आणखी शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंदी भाषेमध्ये त्याचा त्याचा संपादित अनुवाद प्रसिद्ध झाल्याचे कळले. छत्रपती शिवाजी या नावाने तो २०१२ मध्ये प्रकाशित झाला. संपादक आणि परिष्कारक म्हणून डॉ. भवानीलाल गोविंदपुरम हासानन्द असे नाव आहे. प्रकाशकाचे नाव विजयकुमार गोविंदपुरम हासानन्द असे असून हे पुस्तक नवी दिल्ली येथे प्रकाशित झालेले आहे. मात्र मूळ पुस्तकाच्या साधारण अर्ध्यापेक्षाही कमी मजकूर देण्यात आला आहे.

मूळ पुस्तक १८९३ मधील असल्याने त्यावेळी उपलब्ध असलेेल्या साधनांचा आधार घेऊन सिद्ध करण्यात आले होते. त्यानंतरच्या आवृत्तीच्या वेळी अधिकाधिक माहिती उपलब्ध होती. नव्या आवृत्तीत तिचा समावेश करण्यात आला. त्यानंतरच्या शतकभरात संशोधकांना आणखीही बरीच माहिती मिळाली आहे. तरीही बऱ्याच अंशी हे पुस्तक आपण प्रमाण मानतो त्या शिवचरित्राशी मिळतेजुळते आहे. त्यावेळच्या साधनांआधारेच ते लिहिलेले असल्याने काही त्रुटी असल्या तरी महाराष्ट्राबाहेरील एका महान देशभक्ताने लिहिलेले हे चरित्र प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराजांची खरीखुरी ओळख आणि कर्तबगारी सर्व देशाला करून देण्याचा लालाजींचा उद्देश आहे. त्यादृष्टीने या पुस्तकाचे मोल किती आहे, हे जाणवते. ज्यांच्याविना भारताचा इतिहास अपूर्ण राहील, असे शिवाजी महाराज आणि ज्यांच्याविना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहिताच येणार नाही, अशा महान व्यक्तीने लिहिलेले त्याचे चरित्र म्हणजे ज्योतीने तेजाची आरती असा हा सुरेख योग आहे.

लक्षणीय बाब म्हणजे लालाजींनी देशभक्ती, स्वातंत्र्यलढा याबाबतची आपली मते जागोजागी नोंदवली आहेत. त्यात या पुस्तकाद्वारे वाचकाचे देशप्रेम जागे व्हावे, असा त्यांचा हेतू जाणवतो. लालाजींनी या चरित्रासाठी झालेली न्या. महादेव गोविंद रानडे यांची मदत कृतज्ञतापूर्वक उल्लेखलेली आहे. रानडे त्यावेळी भारताचा इतिहास लिहित होते आणि त्यांनी त्यातील शिवाजी महाराजांच्या संदर्भातला भाग लालाजींना पाठवला होता. दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी बरीच साधने उपलब्ध झाली. त्याबाबत ते म्हणतात पहिल्या आवृत्तीसाठी ग्रँट डफ, वेल्स, एलफिन्स्टन, हंटर इ. परदेशी लेखकांचाच मोठ्या प्रमाणात आधार घेतला होता. त्यांचे लेखन मुघल इतिहासकारांच्या नोंदींवर होते. त्यामुळे त्यात शिवाजी महाराजांच्या लहानपणाचा भाग फार नव्हता. पण नंतरच्या काळात, रॉलिंन्सन, यदुनाथ सरकार, ताकाखाव, एस. एन. सेन यांची शिवचरित्रे, किंकेड-पारसनीस यांचा मराठ्यांचा इतिहास ही पुस्तके उपलब्ध होती. त्यांचाही ऋणनिर्देश लालाजींनी केला आहे. केळूसकर यांचे मराठीतील शिवचरित्र सर्वात विश्वसनीय आहे, असे ते म्हणतात. आपल्याला मधील काळात वेळ नव्हता आणि आताही संपूर्ण चरित्र नव्याने लिहायला हवे असे वाटले तरीही कार्यबाहुल्यामुळे ते शक्य नाही, अशी हळहळही त्यांनी व्यक्त केली आहे.

loading image
go to top