
श्री क्षेत्र पंढरपूर हे वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, सखूबाई, कान्होपात्रा, गोरा कुंभार, दामाजी, सावता माळी, भानुदास आदी संतांनी पंढरीच्या विठ्ठलाचा महिमा वाढविला. प्रत्येक वर्षी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भारतातील लक्षावधी भक्तजन यात्रेच्या काळात व इतर वेळेसही पंढरीस येतात आणि चंद्रभागेचे स्नान करतात. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन कृतकृत्य होतात. पंढरपूर ही दक्षिण काशी असून, तिला संतांचे माहेर म्हणतात. संतमंडळी, भक्तमंडळींच्याही भक्तीने भारावून जाऊन श्री विठ्ठलाने प्रत्यक्ष दर्शन दिल्याची उदाहरणे श्री विठ्ठल दैवताच्या भाविक अभ्यासात आढळतात.