महत्त्वाकांक्षेची भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Tamarakshan UK Civil Aviation Authority Pilots license

ब्रिटनमधील इसेक्स येथे २०१३ मध्ये घराचे बांधकाम सुरू असताना अशोक अलिसेरील तमारक्षण यांना एका लहान विमानाचा आवाज ऐकू आला.

महत्त्वाकांक्षेची भरारी

ब्रिटनमधील इसेक्स येथे २०१३ मध्ये घराचे बांधकाम सुरू असताना अशोक अलिसेरील तमारक्षण यांना एका लहान विमानाचा आवाज ऐकू आला. जवळपास विमानतळ कुठे आहे, हे पाहण्यासाठी ते बाहेर पडले. तेव्हा त्यांना एक विमान दिसले. ते चालविणारा वैमानिक म्हणजे तेथील सर्वसामान्य व्यक्ती होती. आपल्‍यालाही हाती असे विमान येईल का?, अशी इच्छा अशोक यांच्या मनात जागृत झाली. त्यासाठी आवश्‍यक वैमानिकाचा परवाना मिळविण्याचा विचार आयुष्यातील कर्तव्य पूर्ण करताना मागे पडला. नवे घर बांधून पूर्ण करणे, दोन चिमुकल्या मुलींची जबाबदारी निभावताना पाच वर्षे गेली.

केरळमधील अलाप्पुझा येथील अशोक तमारक्षण यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीचे पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ते २००६मध्ये ब्रिटनला गेले व तेथेच स्थायिक झाले. सध्या ते फोर्ड कंपनीत काम करीत आहेत. आयुष्य स्थिरस्थावर झाल्यावर २०१८मध्ये स्वतःच्या विमानाच्या इच्छेने पुन्हा उचल घेतली. अशोक यांनी विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. ‘यूके सिव्हिल एव्हिएशन ॲथोरिटी’कडून सप्टेंबर २०१९ मध्ये रीतसर परवाना मिळाला. तो संपूर्ण युरोपसाठी वैध होता. यामुळे अशोक यांच्या पंखात जणू हवा भरली आणि आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पूर्णत्वास आले. सुरुवातीला ते दोन आसनी विमान भाडेतत्वावर घेऊन सहलीला जात असत. पत्नी, दोन मुली व ते स्वतः अशा चौकोनी कुटुंबासाठी चार आसनी विमानाची गरज भासत असे. असे विमान फार क्वचित उपलब्ध होत असे. मिळाले तरी ते खूपच जुने असे. नवे विमान घेण्यासाठी पाच लाख पौंड खर्च करण्याची तयारी लागत असे.

‘लाइट एअरक्राफ्ट असोसिएशन’च सदस्य असल्याने स्वतः विमान तयार करण्याची कल्पना अशोक यांना सुचली. कुटुंबासह भ्रमंतीसाठी हाच एक मार्ग असल्याचे जाणवले. मग अशोक यांनी पाऊल उचलले आणि प्रथम जोहान्सबर्गमधील प्रसिद्ध कंपनी ‘स्लिंग एअरक्राफ्टला’ या कंपनीला भेट दिली. ही कंपनी ‘स्लिंग टीएसआय’ हे नवे विमान तयार करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. स्वतःचे विमान बनविण्यासाठी त्यांनी कंपनीकडे एका संचाची मागणीही नोंदविली.

जगात २०२०मध्ये कोरोनाची साथ आल्याने सर्व काही ठप्प झाले. त्यावेळी घरीच विमान कसे तयार करायचे याचा अभ्यास अशोक यांनी केला. लॉकडाउनमध्ये ऑफिसचे काम घरातूनच सुरू असल्याने वेळही हाती होता. स्वतःची बचत व बँकेचे कर्ज घेऊन अशोक यांनी घरातच विमान बनविण्यास सुरुवात केली. खर्च अवाढव्य असल्याने कुटुंबाने काटकसरीचा अवलंब केला होता. जवळजवळ दीड वर्षे घराचा कारखाना झाला होता. सात किटचा वापर व १.८ कोटी रुपये खर्चून, १५ हजार तासांच्या परिश्रमातून करून नोव्हेंबर २०२१ मध्ये चार आसनी ‘स्लिंग टीएसआय’ विमान साकार झाले. अशोक यांच्या आनंदही गगनात मावेनासा झाला होता. मुलगी दिया हिचे नाव विमानाला दिले. आवश्‍यक चाचण्या, परवानग्या अशा प्रक्रिया पूर्ण करीत स्वतःच्या हाताने तयार केलेल्या स्वमालकीच्या ‘जी-दिया’तून अशोक तमारक्षण हे कधी मित्रपरिवार तर कधी कुटुंबीयांसह फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया संपूर्ण युरोप फिरून आले आहेत. स्वनिर्मित विमान भारतात आणण्याची त्यांची मनीषा आहे.

Web Title: Ashok Tamarakshan Uk Civil Aviation Authority Pilots License

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
go to top