esakal | अलौकिक आनंदाची अनुभूती
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Prabha Atre

अलौकिक आनंदाची अनुभूती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे आज (ता. १३) ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी...

संवेदनशील कलाकार, रचनाकार, चिंतनशील विद्वान लेखिका, शोधकर्ता, कवयित्री आणि उत्तम गुरू या सर्व गुणांचा समुच्चय एकाच व्यक्तीत कोठे असेल असे विचारले तर एकच नाव डोळ्यासमोर उभे राहते -स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे. गुरुवर्य प्रभा अत्रे किराणा घराण्याच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ज्येष्ठ गायिका. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांनी अभिमानाचे स्थान निर्माण केले आहे. प्रभाताई विज्ञान आणि विधी शाखेच्या पदवीधर आहेत, तसेच संगीतातील ‘सरगम’ या विषयावर पीएचडी केली आहे.

प्रभाताईंनी शास्त्रीय संगीत व्यवसाय म्हणून करावयाचे ठरवले नव्हते, पण शास्त्रीय संगीत कालांतराने त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनत गेले आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य शास्त्रीय संगीताकरता वाहून घेतले. प्रभाताईंचे गायन अलौकिक अनुभूती देणारे आहे. ज्याप्रमाणे नदीचे स्वच्छ, निर्मळ, अखंड वाहणारे पाणी बघून मनाला निखळ आनंद, उत्साह, शांतता लाभते, तसेच प्रभाताईंचे गाणे रसिकांच्या ह्रदयात आपली वेगळीच छाप सोडून जाते. कोणत्याही विषयाचा अभ्यास सतर्कपणे आणि गांभीर्याने करणे, खोलवर समजून घेणे, त्याविषयाची योग्य पारख करणे हा शोधकर्त्याचा मूलभुत गुणधर्म मानला जातो, हा प्रभाताईंच्या स्वभावाचा मुख्य पैलू आहे.

सखोल चिंतन, अभ्यास

लहानश्या वाटणाऱ्या विषयाचाही सखोल विचार करणे, चिंतन, मनन करणे आणि तो विषय पूर्णत्वाकडे नेणे हा प्रभाताईंचा स्वभाव आहे. आपल्या शिष्यांना विद्या प्रदान करतांना चिकित्सक दृष्टी देणे, विषयाची उत्तम समज निर्माण करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे हे केवळ उत्तम गुरूच करू शकतो. हे सर्व गुण प्रभाताईंच्या सानिध्यात राहूनच जाणवत राहतात.

प्रभाताईंनी शास्त्रीय विषयांकडे नेहमी डोळसपणे बघितले, मग तो राग-समय, राग-रसाचा विचार असो किंवा संगीत-शास्त्राचा विचार असो, त्यांनी नेहमी स्वत:चे मत ठामपणे मांडले आहे.

‘सरगम’ या संगीत सामग्रीचा वापर प्रभाताई अतिशय सौंदर्य आणि लालित्यपूर्ण अशा तऱ्हेने करतात. सरगम गाताना त्यातील सूक्ष्म लयीचे काम आनंद देणारे असते.‍ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताविषयी उपलब्ध शास्त्रात अनेकदा काही मतभेद दिसून येतात, ज्यामुळे संगीत शिकणारे विद्यार्थी संभ्रमित होतात. शास्त्रात आणि प्रस्तुतीकरणातले हे मतभेद विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करतात. म्हणून शास्त्र हे सर्वसंमत असणे आवश्यक आहे, असे प्रभाताई पुन्हा पुन्हा सांगतात.

तेरा स्वनिर्मिती रागांची रचना

गुरुवर्य प्रभाताईंची मैफल अलौकीक आनंद देणारी असते. राग मांडणी करताना रागाच्या चौकटीत राहूनच त्यात एक वेगळेपणा दिसून येतो. प्रभाताईंनी संगीत विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. एकाच वेळेस, एकाच विषयावर ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा विक्रम प्रभाताईंनी केला आहे. त्यांचे पहिले पुस्तक ‘स्वरमयी’ याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. प्रभाताईंची बंदिशींची पुस्तके ‘स्वरांगिनी’, ‘स्वरंजनी’ आणि स्वररंगी - त्यात साडेपाचशेपेक्षा अधिक बंदिशी आहेत. ‘Enlightening the Listener’ आणि ‘Along The Path Of Music’ ही पुस्तके विद्यार्थी आणि श्रोत्यांसाठी इंग्रजी माध्यमात उपलब्ध आहेत. ‘अंत:स्वर’ हा प्रभाताईंचा कविता संग्रह - ज्यात त्यांचे सांगीतिक अनुभव कविता स्वरुपात समोर आले आहेत. त्यांची सर्व पुस्तके अन्य भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. प्रभाताईंनी तेरा अप्रतिम स्वनिर्मित रागांची रचना केली आहे. संगीत क्षेत्रातील प्रभाताईंच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, टागोर अकादमी रत्न, कालिदास सन्मान अशा पुरस्कारांनी गौरवांकित केले आहे. प्रभाताईंची संगीत क्षेत्रातील कार्ये ही शब्दातीत आहेत. त्यांच्या गायनाचा आनंद कायम मिळावा, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

- अश्विनी मोडक

(लेखिका गायिका असून प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत.)

loading image
go to top