
स्वातंत्र्यानंतर आपण विकासाची वाट धरली. गरिबी निर्मूलन, आरोग्य, कुटुंब कल्याण, अणुऊर्जा, अर्थकारण अशा अनेक गोष्टींच्या पायाभरणीने तो काळ भारावलेला होता.
स्वातंत्र्यानंतर आपण विकासाची वाट धरली. गरिबी निर्मूलन, आरोग्य, कुटुंब कल्याण, अणुऊर्जा, अर्थकारण अशा अनेक गोष्टींच्या पायाभरणीने तो काळ भारावलेला होता. फाळणीच्या जखमा भरून निघत असतानाच सत्ताप्राप्तीसाठी विरोधी पक्षांनी धर्माचा आधार घेत यात्रा सुरू करून बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक अशी विभागणी करत धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला मुस्लिम तुष्टीकरण असे स्वरूप दिले. इतिहासातील घटनांचा अर्थ आपल्या राजकारणानुसार लावून पुन्हा एकदा देशाच्या मानसिक विभाजनाला सुरुवात केली. अशातच जागतिकीकरणाची भर पडली. त्यात जगाच्या अनुषंगाने काही आर्थिक बदल भारतानेही स्वीकारले. त्याचे अपेक्षित फळ नक्कीच मिळाले. नवमध्यम वर्ग उदयास आला. जिकडे तिकडे प्रगतीचे वारे वाहत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर धार्मिक दहशतवादाने विक्राळ स्वरूप प्राप्त केले. त्याला आर्थिक किनार नक्कीच होती. अमेरिका आणि रशिया यांच्यामधील जागतिक महासत्ता बनण्याची चढाओढ आणि त्यातच मध्यपूर्व आशियातील मुस्लिम समुदायाला आपल्या नैसर्गिक संसाधनांचे दोहन करून नुकसान केल्याची भावना झाल्यामुळे या संघर्षाचे स्वरूप मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन अशा धार्मिक संघर्षात झाले.
शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर उद्धवस्त अफगाणिस्तानातील टोळ्यांना आणि त्यांच्याजवळ असलेल्या प्रचंड शस्त्रसाठ्याला भारतासोबत प्रत्यक्ष युद्धात जिंकता येत नाही म्हणून झिया-उल-हक यांनी काश्मीर मुद्द्यावरून छद्मयुद्धाचा पुरस्कार भारताविरुद्ध करण्याची योजना आखली आणि दोन राष्ट्रातील वादाची झळ पुढे दहशतवादाच्या स्वरूपात भारताला भोगावी लागली. त्याचा चाणाक्ष वापर करून घेत भाजपने मुस्लिम द्वेषामध्ये त्याचे रूपांतर केले आणि त्याचा पुरेपूर राजकीय फायदा घेतला. क्रियेला प्रतिक्रियेच्या स्वरूपात द्वेष निर्माण झाला.
लेहमन ब्रदर्समुळे २००८ मध्ये जागतिक मंदीचं सावट जगावर आलं. त्याची प्रत्यक्ष झळ डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या बुद्धिमान अर्थतज्ज्ञ नेतृत्वाने भारतापर्यंत पोहोचू दिली नव्हती तरी आंतरराष्ट्रीय कारणांमुळे वाढलेली महागाई, सातत्याने होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, मुस्लिम द्वेषाची किनार यामुळे २०१४ मध्ये सत्तांतर होऊन भाजप सरकार मोदींच्या नेतृत्वात सत्तेवर आलं. वरील घटनांतील साम्य आणि भारताच्या विभाजनपूर्व स्थितीचा धांडोळा घेतला तर असं लक्षात येतं की, इंग्रजांनी सुद्धा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष निर्माण करून आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही समाजांना कायमचं दोन ध्रुवांवर ठेऊन जागतिक राजकारणाच्या फायद्यासाठी ‘बफर स्टेट’ म्हणून पाकिस्तानची निर्मिती होऊ दिली. आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय मुखवटा असलेला भाजप याच पद्धतीचा वापर करून २०१४च्या निवडणुकीत दिलेली अभिवचने, माध्यमं, वृत्तपत्रं, समाज माध्यमांच्या सहाय्याने अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक भेदभावाच्या प्रकटीकरणाला प्रोत्साहन देत, कोणी काय खावं - खाऊ नये, काय घालावं-काय घालू नये असे समाजमन भरकटवणाऱ्या विषयांना तोंड फोडत, भाषा-प्रांत आणि इतिहास यांची सोयीस्कर मांडणी करून राजकीय फायद्यासाठी देशाचे पुन्हा एकदा घृणास्पद मानसिक विभाजन करत आहे.
शेवटी प्रश्न हा उरतो की, त्याही वेळेस समन्वयाची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसलाच दोष दिला गेला. आयुष्यभर राम राम म्हणणाऱ्या, राम राज्याची संकल्पना मांडणाऱ्या, देशाचे विभाजन झालं तर ते माझ्या मृत्यूशय्येवर होईल असं म्हणणाऱ्या महात्मा गांधीजींना गोळ्या घातल्या गेल्या; पण ज्या जीनांमुळे देशाचं विभाजन झालं त्यांना साधा खडासुद्धा फेकून मारला नाही, इथेच काय ते सत्य लक्षात येतं. या सर्व परिस्थितीत राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने ‘आम्ही भारताचे लोक’ ही जी राज्यघटनेतली अपेक्षा आहे (ती सर्वांनी समजून घ्यावी) ती पुनरुज्जीवित करू पाहत आहेत.
‘आम्ही भारताचे लोक’ म्हणजे सर्व जात-पात, धर्म, भाषा, रंग, प्रांत यासहित आम्ही सर्व असा होत नाही तर आम्ही सर्व भारतीय (we the people of India) आणि भारतीय संघराज्य म्हणजे या सर्व भावनांचा सन्मान ठेवून अस्तित्वात आलेले संघराज्य (Union of states) अशा अर्थाने समजून घेतलं तर विविधतेमधला एकतेचा व्यापक अर्थ लक्षात येईल. हे सर्व टिकवलं तर आपण या वैविध्यातून मिळवलेली आपली सत्तर वर्षातली सर्वात मोठी मिळकत पुन्हा मिळवू; ती म्हणजे आपण कमावलेली लोकशाही, जी कोणत्याही इतर उद्देशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. म्हणून राहुल गांधी हे जिथे आपल्या पित्याला हौतात्म्य आले, त्या तमिळनाडूतल्या कन्याकुमारीपासून ही भारताची संकल्पना (Idea of India) वाचवण्यासाठी, दृढ करण्यासाठी देशव्यापी प्रवास पायी करत आहेत. ही नुसती पायपीट नाही, तर तपश्चर्या आहे.
एखाद्या समुदायाला किंवा व्यक्तीला सातत्याने तो दुर्बल आहे, संख्येने कमी आहे म्हणून घाबरवत राहिलो तर त्याची परिणीती हिंसेमध्ये होत असते. तशी स्थिती येऊ नये म्हणून भारतीयांमध्ये एक विश्वास या भारत जोडो यात्रेने निर्माण केला आहे. जे उदात्त स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपात आपण पाहिले होते. ते टिकवण्याची इच्छाशक्ती असलेली एक विचारधारा आहे आणि ती सशक्त विचारधारा भारतीयांच्या एकात्मतेसाठी उभी ठाकली आहे. त्यामुळे लोक निर्भय होऊन आश्वस्त झाले आहेत, असे चित्र भारत जोडो यात्रेने निर्माण केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.