जीवसृष्टीचे ‘अंतर’भान आणि आपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Life
जीवसृष्टीचे ‘अंतर’भान आणि आपण

जीवसृष्टीचे ‘अंतर’भान आणि आपण

माणूस सोडून जीवसृष्टीतील इतरांकडे सामाजिक अंतरासाठी लागणारे मोजमापाचे कोणतेही साधन नसूनही, तिथे हे अंतर जन्मजात आणि हजारो वर्षांपासून व्यवस्थितपणे पाळले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत या वास्तवाला विशेष महत्त्व आहे.

कोरोना आणि त्या पाठोपाठ त्याचाच प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचा संसर्ग, एका बाधित व्यक्तीजवळ दुसरी व्यक्ती येऊन त्यांचा एकमेकांना स्पर्श झाला, अथवा बाधित व्यक्तीच्या शिंकेतील फवाऱ्याचे काही कण श्वासावाटे दुसऱ्याच्या शरीरात गेले, तर होणे अटळ असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे, याबरोबरच एकमेकांपासून कमीत कमी एक मीटर अंतर राखणे, हेही अत्यावश्यक झाले आहे. एकमेकांपासून कमीत कमी एक मीटर अंतर सातत्याने राखणे याला आपण, सामाजिक अंतराचे भान असे म्हणतो. मानव हा जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी असूनही विविध ठिकाणी या अंतराचा कसा फज्जा उडाला आहे, याच्या बातम्या, फोटो आणि व्हिडियो क्लिपही प्रसारमाध्यमांवरून रोज दाखवल्या जात आहेत. डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असूनही, ही गोष्ट माणसाला जमत नाही असे दिसतंय. खरंच का हे इतकं अवघड आहे? याचा मागोवा घेण्यासाठी आपण निसर्गाकडे वळूयात.

माणूस सोडून इतरांकडे सामाजिक अंतरासाठी लागणारे मोजमापाचे कोणतेही साधन नसूनही, तिथे हे अंतर जन्मजात आणि हजारो वर्षांपासून व्यवस्थितपणे पाळले जात आहे. डबकी, तळे, नद्या अथवा समुद्रात जेमतेम आपल्या बोटाच्या पेराच्या, अथवा त्याहून लहान आकारापासून, महाकाय देवमाश्यापर्यंत अनेक प्रकारचे मासे असतात. बऱ्याच वेळा ते एकटेदुकटे, गटागटाने, किंवा हजारोंच्या संख्येने इकडेतिकडे पोहताना दिसतात. पण असे पोहताना, त्यांचा कधीही एकमेकांना धक्का लागत नाही. त्यांच्यावर हल्ला करणारा दुसरा मासा आला, तर ते बचावासाठी सुसाट पोहत सुटतात. पण एकाच वेळेला हजारो मासे आपला जीव वाचवण्यासाठी, असे गटाने सुसाट पोहत असताना, त्यांचा एकमेकांना साधा स्पर्शही होत नाही, इतके त्यांचे अंतराचे भान स्वाभाविक असते.

वारुळातून अन्नाच्या शोधार्थ एकाच वेळी शेकडो मुंग्या बाहेर पडून तिकडे धावत सुटतात. परंतु धावताना एका मुंगीचा दुसऱ्या मुंगीला कधीही धक्का लागत नाही. त्यांच्यात ढकलाढकली, चेंगराचेंगरी अजिबात होत नाही. अन्नाचे कण अथवा साखरेचा दाणा वारुळात घेवून जातानाही त्या शिस्तबद्ध रीतीने परत जातात. जंगलात चित्ता अथवा वाघ पाठीमागे लागला, की अनेक डुकरे, झेब्रे, हरणे जिवाच्या आकांताने सुसाट पळतात. तिथेही एका हरणाचा दुसऱ्याला धक्का लागत नाही. शिकार करणारे वाघ अथवा सिंह भक्ष्यामागे धावत असताना त्यांचाही एकमेकांना स्पर्श होत नाही. एकंदरीत समूहाने रहाणाऱ्या कोणत्याही प्राण्यांचा, कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना धक्का लागत नाही. याचा अर्थ ते सर्व सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळतात.

स्वाभाविक भान

तिसरा प्रकार चाचर म्हणजे आकाशात उडणारे पक्षी अथवा कीटक. तिथे माशा, टोळ आणि चिमणीपासून गरुडापर्यंत अनेक प्रकारचे जीव मुक्तपणे विहरत असतात. पण कोणाचाही कोणाला धक्का लागत नाही. काही पक्ष्यांच्या प्रजाती सामूहिकपणे आकाशातून उडताना अथवा स्थलांतर करणारे पक्षी म्हणजे स्थलांतरित पक्षी शेकडोंच्या संख्येने शेकडो किलोमीटरचा प्रवास उडत करत असतानाही त्यांचा एकमेकांना धक्का लागत नाही, अथवा त्यांचे एकमेकातले अंतर कमीजास्त होत नाही. आपण हे दृश्य कित्येकदा बघितले असेल. याचा अर्थ त्यांनादेखील अंतराचे स्वाभाविक भान आहे. पाकोळया आणि वटवाघूळ, शेकडोंच्या संख्येने एखाद्या झाडावर किंवा गुहेमध्ये लटकत असतात. बाहेर पडताना शेकडोंच्या संख्येने उडत बाहेर पडतात. वटवाघळे तर फक्त ध्वनिलहरींच्या सहाय्याने ताशी १५० किलोमीटर वेगाने उडत असूनही त्यांचा एकमेकांना कधीही धक्का लागत नाही. याचा अर्थ तेही भान काटेकोरपणे पाळतात.

वनस्पती

आता आपण अचल म्हणजे म्हणजे वनस्पतींचा आढावा घेऊया. येथेही अंतर आवश्यक असते. त्यासाठी शेतकरी बिया पेरताना त्या ठराविक अंतराने पेरतो. जास्त पीक मिळवण्यासाठी अंतर कमी केले तर, वाढ व्यवस्थित होतच नाही, उलट पिकांवर कीड चटकन पडते आणि पसरते. एकंदरीत असं दिसतंय की, समूहाने फिरणारे जलचर, भूचर आणि चाचर असे सर्व प्राणी सामाजिक अंतर नैसर्गिकरीत्या पाळतात.

अचल वनस्पतींसाठी तर ते गरजेचे निसर्गातील सामाजिक अंतराचे भान असते. परंतु पृथ्वीवरील ८४ लाख जीवजंतूंमध्ये मानव हा एक आणि एकच प्राणी असा आहे, की ज्याला बुद्धी, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मोजमपाची साधने, साथीचे रोग कोणते, ते कसे पसरतात, याची संपूर्ण माहिती, प्रतिबंधक उपाय, वैद्यकीय उपकरणे, कायदेकानून, ते राबविणारी सक्षम शासन यंत्रणा हे सर्व उपलब्ध असूनही अंतर राखणे जमत नाही. पण आता वेळ आली आहे की त्याने स्वतःला शिस्त लावून घेण्यासाठी निसर्गातील अंतराचे भान निरखून आपल्याही जगण्यात त्यांचा अवलंब करावा. अंतर ठेवणे, नाक आणि तोंड व्यवस्थित झाकेल, असा मास्क वापरणे, आणि स्वत:सह सर्वांना सुरक्षित ठेवणे अत्त्यावश्यक आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :LifeEditorial Article
loading image
go to top