बाकीबाबांची ‘गीताय’

बा. भ. बोरकर अर्थात गोमंतकीयांचे लाडके बाकीबाबा. अनेक कोकणी-मराठी गीतांमुळे ते साहित्य आणि संगीतरसिकांच्या मनात घर करून आहेत.
Baki Borkar
Baki Borkarsakal

बा. भ. बोरकर अर्थात गोमंतकीयांचे लाडके बाकीबाबा. अनेक कोकणी-मराठी गीतांमुळे ते साहित्य आणि संगीतरसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या रचना ऐकल्यावर, ‘शब्दच त्यांच्याकडे चालत येत होते की काय?’, असा प्रश्‍न पडतो. आठ जुलै हा बाकीबाबांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या एका अप्रतिम रचनेविषयी...

गोव्यातील निसर्गसंपन्न अशा बोरी गावात ३० नोव्हेंबर १९१० रोजी बा. भ. बोरकर यांचा जन्म झाला. आजही त्यांच्या घरासमोरून जाताना डोळ्यासमोर बाकीबाब उभे राहतात आणि त्यांच्या काही रचना नकळत ओठांवर येतात. त्यांच्या कुठल्याही रचना आठवल्या तरी ‘गेयता’ हा शब्दच खास बाकीबाबांसाठी तयार झाला आहे की काय, असे मनात येते. ‘पद्मश्री’ सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले होते.

बाकीबाबांचा साहित्यप्रवास ८ जुलै १९८४ रोजी पुण्यात संपला. त्यामुळे आज त्यांची आठवण होणे साहजिक आहे. त्यांच्या साहित्यावर अनेकांनी अनेक वेळा लिहिलं आहे, बोललं आहे. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी घेतलेली त्यांची मुलाखत तर साहित्यरसिकांसाठी अनोखी मेजवानीच ठरली होती.

पण आज बाकीबाबांनी १९६० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘गीताय’ या भगवद्‍गीतेच्या कोकणी श्‍लोकांविषयी सांगावंसं वाटतं. पॉप्युलर प्रकाशन, मुंबई यांनी ते पुस्तक प्रकाशित केले होते व त्याची किंमत त्याकाळी फक्त दीड रुपया होती. एका पानावर मूळ संस्कृत श्‍लोक व समोरच्या पानावर कोकणी भाषेतील श्‍लोक अशी या ‘गीताय’ची रचना आहे.

बाकीबाबांचे वडील भगवंत बोरकर हे विनोबा भावे यांचे उपासक होते. म्हणून वडिलांच्या स्मृतीला ‘गीताय’ अर्पण करतो, असे बाकीबाबांनी अर्पणपत्रिकेत म्हटले आहे. विनोबांनी भगवद्‍गीतेचे श्‍लोक मराठीतून लिहिले आहेत. याचाच कोकणीतून अनुवाद बाकीबाबांनी केलेला. पण बाकीबाब त्याला अनुवाद न म्हणता ‘कोकणा समश्‍लोकी’ असं म्हणतात.

अनुवाद करताना कवी म्हणून स्वतःचे आणि भाषा म्हणून कोकणीचे सामर्थ्य त्यांनी दाखवून दिलेले आहे. कोकणी भाषेचे ज्ञान असलेल्या सामान्य माणसालाही ‘गीताय’ वाचल्यानंतर गीता समजू शकते, इतक्या साध्या-सोप्या भाषेत त्यांनी एकेका श्‍लोकाची रचना केलेली आहे. यामध्ये डाव्या पानावर मूळ संस्कृत श्लोक व उजव्या पानावर त्याचा कोकणीमध्ये अनुवाद अशा स्वरुपात ही ‘गीताय’ आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।

या सर्वांच्या तोंडी असलेल्या श्‍लोकाचा कोकणी अनुवाद करताना बाकीबाब लिहितात,

‘ज्या ज्या काळाक गादेवन खर्शेता धर्म अर्जुना, अधर्म धुमशणा काण्टा तेन्ना हाव विता म्हाका. पाळूक संतसृष्टाक, दाळूक दूष्ट दुर्जना. धर्म मांणेर घालूक जल्मता युग कणकणी...’

अर्जुन जेव्हा कृष्णाला म्हणतो, की समोर उभे सगळे भाऊबंद आहेत. त्यांच्याविरुद्ध मी कसे लढू? तेव्हा बाकीबाब लिहितात,

‘बरे न्ही गा कौरवा मारणे, तेय गा भाव आमगेले...कशे जातले सुखी आमी मारून आमकाच माधवा. पूजा ज्यांची आमी करची भीष्मा-द्रोणाकडेन अशा, कशे झुजचे, कशे मारचे बाण हांचेर माधवा...’

या दोन श्‍लोकांवरून बकीबाबांकडे असलेली ‘सहजता’ लक्षात येते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

हा गीतेतील आणखी एक श्‍लोक सर्वांच्या मुखी असतो. कोकणीत बाकीबाब म्हणतात, ‘कर्मातच तुजो वांटो फळीं केन्नांच आसचो न्हय, नासची कर्मफळीं वान्सा अकर्मी ओड आसनये...’. मराठी भाषकांनाही कोकणीतील हे श्‍लोक वाचले तरी भगवंताला व अर्जुनाला काय म्हणायचे आहे ते समजेल. संपूर्ण अनुवादात श्‍लोकांची गेयता कुठेच हरवणार नाही, याची पूर्ण खरबरदारी बाकीबाबांनी घेतलेली आहे.

जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा धर्मरक्षण करण्यासाठी मी अवतार घेईन, असे जेव्हा भगवंतांनी म्हटले आहे, याचा अर्थ भगवंत प्रकट होतो असे नाही तर त्यांची वाणी समाजाला तारते. ती वाणी कुणाच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळेल सांगता येत नाही. एखादा माणूस अशिक्षित, साधा असला तरी तो मोठे तत्त्वज्ञान सांगून जातो. याचा अर्थ भगवंतांचीच वाणी त्याच्या मुखातून बाहेर पडते, असे बाकीबाब म्हणतात.

‘गीताय’च्या निर्मितीबद्दल ते सांगतात, माझ्यासारख्या संस्कृत आणि अध्यात्मामध्ये अज्ञानी असलेल्या माणसाच्या हातून कोकणीतून गीतीची रचना झाली हे पाहून मला भगवंतांच्या वाणीचा भास होतो आणि कोकणी भाषेचे उत्थान समीप आले आहे, याचा विश्‍वास वाटतो. कोकणी भाषा व गीतेवरील प्रेमापोटीच माझ्या हातून ‘गीताय’ रचली गेली. आणि ते भगवंताच्या कृपेने व ज्ञानोबा, विनोबासारख्या विभूतींच्या पुण्याईमुळे शक्य झाले आहे.

त्यांना विचारत मी माझ्या काळजाला जो भावार्थ जाणावला तो नैवेद्य म्हणून पुढे ठेवला आहे. ‘गीताय’ लिहिताना जिथे जिथे अडचण आली तिथे विनोबांनी लिहिलेल्या मराठी गीतेचा आधार घेतला आहे, हे सांगायला बाकीबाब विसरले नाहीत. ‘‘कोकणी ही माझ्या जिवाची आई आणि गीता ही माझ्या आत्म्याची आई. हे अद्वैत मी या गीतेमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

भगद्‍वदगीता म्हणजे भगवंताचे गीत. म्हणून त्या मूळ गीताची धून मी दिवस-रात्र माझ्या प्राणामध्ये घोळवलेली आहे. कोकणीचे खास छंदशास्त्र आणि तिचा अर्थगौरव याचेही भान ‘गीताय’ रचताना मी ठेवले आहे. म्हणून ही फक्त वाचन करण्याची नव्हे तर गाऊन म्हणायची गीता आहे,’ असे बाकीबाब सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com