esakal | पाणलोटाची दीक्षा देणारा ‘फादर’ I Harman Bakhar
sakal

बोलून बातमी शोधा

Father Herman Bakhar

पाणलोटाची दीक्षा देणारा ‘फादर’

sakal_logo
By
बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

नगरसारख्या दुष्काळी भागात विहिरींची खोदाई, सामुदायिक पाणीपुरवठा योजना आणि पाणलोट असे सिंचनाबाबतचे विविध प्रयोग फादर हर्मन बाखर यांनी यशस्वी करून लोकांचे हित साधले. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या या कल्याणकारी कार्याविषयी...

वयाच्या चोविसाव्या वर्षी स्वीस तरुण भारतात येतो. आपल्या कृतिशील आयुष्याची साठ वर्षे या मातीत खर्च करतो. अपेक्षेशिवाय पाणलोटाच्या क्षेत्रात अभूतपूर्व काम करतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जर्मन सरकार त्यांना सर्वोच्च ‘ऑर्डर ऑफ मेरीट’ पुरस्काराने सन्मानित करते. महाराष्ट्र सरकारही त्यांचा कृषिभूषण पुरस्काराने आणि त्यांनी स्थापलेल्या संस्थेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरव करते. फादर हर्मन बाखर यांचे व्यक्तिमत्व असे विलक्षण होते. नुकतेच त्यांचे स्विझर्लंडमध्ये निधन झाले. स्वातंत्र्यानंतर देशात ग्रामीण विकासाचे आव्हान होते. शेतीला शाश्वत पाण्याची सोय नव्हती. सिंचनाच्या सुविधा अपुऱ्या होत्या. अशा काळात सिंचन आणि पाणलोट क्षेत्रात देश पातळीवर जे उल्लेखनीय काम झाले, त्यात फादर हर्मन बाखर यांचा उल्लेख क्रमप्राप्त आहे.

महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित होऊन फादर बाखर १९४८ मध्ये भारतात आले. सुरुवातीला भारतातल्या ख्रिश्चन मिशनरी शाळांमध्ये ज्ञानदान केले. ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि जोडीला कोरडवाहू शेतजमिनीमुळे ते अस्वस्थ झाले. उपाशीपोटी माणसाला अध्यात्माचे ज्ञान देता येत नाही, या कष्टकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि १९६७ मध्ये नगर जिल्ह्यात ‘सोशल सेंटर’ची स्थापना केली.

विहीर सिंचनावर भर

प्रथमत: विहिरीद्वारे सिंचनासाठी या संस्थेने पुढाकार घेतला. ‘फूड फॉर वर्क’ अर्थात कामाच्या बदल्यात अन्न ही संकल्पना राबविली. मात्र काही ठिकाणी विहिरीसाठी खडक फोडणे, बांधकाम करणे इत्यादींसाठी मशिनरीचा वापर क्रमप्राप्त होता. त्यासाठी शेतकऱ्यांना पतपुरवठा गरजेचा होता. त्या काळात पतपुरवठ्याची साधनेही पुरेशी नव्हती. जमीन तारणाच्या बदल्यात कर्जपुरवठा करणारी एकमेव अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती भूविकास बँक अस्तित्वात होती. मात्र त्यासाठी शेतकऱ्याचे तारण पुरेसे नव्हते. अशावेळी सोशल सेंटरने भू विकास बँकेसोबत समन्वय साधून स्वतः तारण राहण्याचा निर्णय केला. यासोबतच फादर बाखर यांनी विहिरीचे खोदकाम व्यर्थ जाऊ नये, यासाठी शास्त्रीय पद्धतीने पाणी तपासणीचा आग्रह धरला. दिल्लीतील ॲफ्रो (ॲक्शन फॉर फूड प्रोडक्शन) ही संस्था पिण्याचे पाणी आणि भूजल सर्वेक्षणात प्रामुख्याने काम करते. त्यांचे नगरमध्ये कार्यालय सुरू केले. जिल्ह्यातून विहिरी खोदकामासाठी एक हजार अर्ज आले, या सर्व ठिकाणी भूजल सर्वेक्षण केले. त्यातल्या सातशे विहिरीसाठी पतपुरवठा केला.

योजनाबद्ध आणि शिस्तबद्धरीत्या शेतकऱ्याला फादर बाखर यांनी मदत केली. शिवाय शेतकऱ्याने कर्ज हप्ता नियमित भरल्यास त्याला व्याज अनुदान देण्याची अभिनव योजनाही राबविली. त्यामुळे शेतकऱ्याला फक्त मुद्दल भरावी लागत होती. विशेष म्हणजे त्या सर्व कर्जाची वसुली ९० टक्क्यांवर होती. फादर बाखर यांनी त्या काळात विहिरींच्या कठीण कामांसाठी मशिनरीचा वापर केला. काळी माती असल्यामुळे विहिरीचे बांधकाम आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी स्वतः वेळ देऊन लोखंडी साचे बनवले. बांधकामासाठी सिमेंट ब्लॉक वापरण्यासाठी सोशल सेंटरच्या वतीने कारखानाही सुरू केला. वीजपंप, मोटारीच्या सुविधाही दिल्या. हे सारे १९६५-७० दरम्यान होत होते.

१९७२ चा दुष्काळ आजही महाराष्ट्रातील ज्येष्ठांना आठवतो. सरकारच्या वतीने या काळात खेड्यांत सामुदायिक विहिरी खोदण्याचा उपक्रम राबवला. १९७४-७५ मध्ये दुष्काळ हटला, मात्र या विहिरी अपूर्णावस्थेतच राहिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी फादरना विहिरींच्या कामांसाठी मदत मागितली. फादर यांनी जिल्हा बँकेला सोबत घेऊन या विहिरींचे सर्वेक्षण केले. नियमात बसू शकतील अशा तीस सामुदायिक विहिरींची कामे केली. वीजजोडणी, वीजपंप बसवणे, विहिरीचे बांधकाम यासाठी सोशल सेंटर आणि जिल्हा बँकेने स्वभांडवलातून निधी दिला. ही योजना यशस्वी होते आहे असे लक्षात आल्यानंतर तिला व्यापक रुप देण्याची संकल्पना पुढे आली.

जिल्हा बँक, सोशल सेंटर आणि नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्रितपणे सामुदायिक पाणी पुरवठा योजना सुरु करण्याचा निर्णय केला. त्याचा कोरडवाहू शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे हा हेतू होता. आदिवासी आणि अनुसूचित जातीतील बांधवांनाही याचा अधिक लाभ व्हावा, जीवनमान उंचवावे यासाठी प्रयत्न केला. खरंतर सामुदायिक पाणीयोजना फार यशस्वी झालेल्या नव्हत्या. तरीही अत्यंत सचोटीने ही योजना राबविली. १९७४ ते १९८५ दरम्यान जवळजवळ १४० सामुदायिक पाणीपुरवठा योजना एकट्या नगर जिल्ह्यात राबविल्या. सुमारे अकरा हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले.

कौटुंबिक स्नेहबंध

१९७०-७२ मध्येच माझ्या कुटुंबाचा हर्मन बाखर यांच्याबरोबर स्नेहबंध जुळला. वडील भाऊसाहेब थोरात सहकार आणि बँकिंगद्वारे सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. त्यामुळे दोघांच्या नात्याचे मैत्रीत रूपांतर झाले. दोघांनीही एकत्रित मोठे काम केले. भाऊसाहेब कार्यकर्त्यांना, जनतेला नेहमी विचारायचे, तुम्ही देवदूत पाहिला का? आणि फादर बाखर यांच्याकडे बोट करत म्हणायचे, ‘हा पहा देवदूत. जो साक्षात माझ्या शेजारी उभा आहे.’ जिल्हा बँकेच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी फादर बाखर यांच्या कामाला बळ दिले. १९८५ मध्ये मी आमदार झालो.आम्ही त्यानंतर अधिक रचनात्मक आणि व्यापक काम एकत्रित केले. प्रामुख्याने पाणलोट विकासावर भर दिला. याचे सर्व प्रयोग फादर बाखर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्जन्यछायेचा प्रदेश आणि अवर्षण प्रवणग्रस्त माझ्या संगमनेर मतदारसंघात झाले. १९८९ मध्ये फादर बाखर यांनी आपले सहकारी क्रिस्पिन लोबो यांच्याबरोबर महाराष्ट्रात इंडो-जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रकल्प या द्विपक्षीय कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्थेमार्फत पाणलोटाचे उल्लेखनीय कार्य झाले.

जलसंधारणाचा संगमनेर पॅटर्न

‘माती आडवा, पाणी जिरवा’ या जलसंधारणाच्या कामासाठी फादरनी स्वतःला वाहून घेतले. आम्ही दोघांनी एकत्रित ग्रामसभांद्वारे दुष्काळाला आणि गरिबीला हटवण्यासाठी जलसंधारणाला पर्याय नाही, हे पटवून दिले. दुष्काळी मेंढवण (ता. संगमनेर) गावातला प्रयोग उल्लेखनीय ठरला. या गावात कायमचे दुर्भिक्ष्य! पिण्याच्या पाण्यासाठी गावात वर्षभर टँकर यायचा. तेथे फादर बाखर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाशेजारील दूधेश्वराच्या डोंगरावर सलग समतल चर केले. काम झाल्यानंतर त्यावर्षी बरा पाऊस झाल्यामुळे गावातल्या ओढा, बंधाऱ्यात पाणी साठले. फादर बाखर यांना डोंगरावर अधिक काम व्हायला हवे होते. मात्र त्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक होती. फादरनी राज्य शासनाकडे सचिव स्तरापर्यंत पाठपुरावा केला आणि सरकारने जीआर काढून या पाणलोटाच्या कामाला परवानगी दिली. माथा ते पायथा ही जलसंधारणाची संकल्पना यशस्वीपणे राबविली. मेंढवनच्या प्रयोगाच्या यशानंतर अन्य गावांत लोकसहभागातून कामे सुरू झाली. आमदार म्हणून मीच कामात लक्ष घातल्याने सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. लोकसहभाग, शासकीय यंत्रणा, नाबार्ड आणि सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त सहभागाने जलसंधारणाचे हे काम संगमनेर पॅटर्न म्हणून नावारूपाला आले. राज्यातल्या जवळजवळ बावीस जिल्ह्यांमध्ये हे काम झाले. आजही १४ राज्यात शंभरावर मागास जिल्ह्यात इंडो-जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रकल्प कार्यरत आहे.

जर्मनीचे अर्थमंत्री स्प्रिंगर यांच्या नेतृत्वाखाली मेंढवण येथे झालेल्या कार्यक्रमात फादर बाखर यांना ऑर्डर ऑफ मेरीट हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. दरेवाडी (ता. संगमनेर) येथे जलसंधारणाचे प्रशिक्षण देणारी संस्था फादर बाखर यांनी उभारली, २००९ पर्यंत बाखर यांचे तेथेच वास्तव्य होते. स्वित्झर्लंडच्या अल्पस पर्वतराजीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण दीपस्तंभासारखे पाणलोटाचे मोठे कार्य ते मागे ठेवून गेले हे नक्की.

पाणलोटाचे बाप्तिस्मा

फादर बाखर यांनी पाणलोटाच्या कामात अखेरपर्यंत हिरारीने सहभाग घेतला. ‘तुम्हाला चांगलं जगायचं असेल, तर पाणलोटाशिवाय पर्याय नाही’ असं ते सांगत. त्यांचे भारतभूमीवर विलक्षण प्रेम होते. ते ६० वर्षे महाराष्ट्रात राहिले. साधेपणाने जीवन व्यतीत केले. ते अस्खलित मराठी बोलायचे. अखेरपर्यंत सेवेला त्यांनी प्राधान्य दिले. एका पत्रकाराने त्यांना खोचक प्रश्न विचारला, ''फादर तुम्ही किती बाप्तिस्मा केले? फादर हसले आणि क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, ‘बाप्तिस्मा? पाणलोटाचे बाप्तिस्मा मी केले.’

loading image
go to top