भाष्य :  मार्ग समूह प्रतिकारशक्तीचा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाष्य :  मार्ग समूह प्रतिकारशक्तीचा 

समूहाची रोगप्रतिकारशक्ती म्हणजे समाजात मोठ्या प्रमाणात सुरक्षित झालेले लोक असल्यास काही असुरक्षित अशा घटकांचे आपोआप संरक्षण होते. मोठ्या प्रमाणात पोलिओसारख्या रोगांचे लसीकरण करण्याचे हेच कारण आहे. 

भाष्य :  मार्ग समूह प्रतिकारशक्तीचा 

स्वीडनसारख्या देशांनी लॉकडाउन करण्यापेक्षा सगळा भर समूहाच्या एकत्रित प्रतिकारशक्तीवर दिला. अशा एकत्रित प्रतिकारशक्तीचे फायदे काय आणि तोटे काय आणि मुळात समूहाची प्रतिकारशक्ती म्हणजे नक्की काय, अशा काही प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न. 

महाभारतात अशी कथा आहे की, युद्धाच्या शेवटच्या पर्वात दुर्योधन आणि भीम यांचे गदायुद्ध होणार, हे निश्‍चित होते. त्या वेळी गांधारी आपल्या डोळ्यांत आयुष्यभर साठवलेले तेज दुर्योधनाच्या शरीरावर सोडते आणि त्यामुळे त्याचे शरीर धातूसारखे टणक होते. यामुळे गदायुद्धात भीमाने केलेल्या वारांचा काहीही परिणाम दुर्योधनाच्या शरीरावर होत नाही. ‘कोरोना’ आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या बाबतीत आपण असाच काहीसा विचार करू शकतो काय? आपण हे ऐकलेच असेल की आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपल्याला रोगाचा संसर्ग झाला तरी आपण आजारी पडत नाही किंवा पटकन बरे होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती ही दुर्योधनाच्या टणक शरीरासारखी आहे. लसीकरणाने विषाणूच्या बाबतीत अशी शक्ती निर्माण केली जाते. पण लसीकरण हा काही आपले शरीर रोगप्रतिकारक करण्याचा एकमेव उपाय नाही. लस न दिलेल्या एखाद्या व्यक्तीस विषाणूचा संसर्ग झाला आणि ती व्यक्ती काही काळाने रोगमुक्त झाली, तर बऱ्याचदा अशा व्यक्तीच्या शरीरात त्या विषाणूचा नाश करणारे प्रतिद्रव्य तयार झाल्याचे आढळून येते. याच विषाणूचा पुन्हा एकदा अशा व्यक्तीला संसर्ग झाला तर उघडच आहे की तिच्या शरीरातील प्रतिद्रव्य या विषाणूला नष्ट करून टाकेल आणि व्यक्ती आजारी पडणार नाही. मात्र यातला एक मोठा धोका म्हणजे सगळ्या व्यक्तींमध्ये असे प्रतिद्रव्य तयार होऊन ते बरे होतीलच असे नाही, आणि मग अशा आजारी पडलेल्या बऱ्याच व्यक्ती मरू शकतात. मग लसीकरण न झालेल्या आणि प्रतिद्रव्यही तयार होणे अवघड असणाऱ्या व्यक्तींना इतर एखाद्या मार्गाने आपण वाचवू शकतो काय? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

चिलखत आपल्या शरीराला दुर्याधनाच्या शरीरासारखे बनवत नाही, ते फक्त शरीरावर होणारा वार आपल्यापर्यंत पोचू देत नाही. ‘कोरोना’सारखे संसर्गजन्य रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. आपण सध्या एकमेकांपासून अंतर राखणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे वगैरे मार्गांनी कोरोना विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याची शक्‍यता कमी करतो आहोत. मात्र हे तात्कालिक आहे. काही व्यक्तींना संसर्गापासून वाचवण्याचा एक विचित्र वाटेल असा उपाय आहे तो म्हणजे ‘समूहाच्या प्रतिकारकशक्ती‘चा (हर्ड इम्युनिटी). स्वीडनसारख्या देशांनी तर लॉकडाउन करण्यापेक्षा सगळा भर अशा समूहाच्या एकत्रित शक्तीवर दिला. अशा एकत्रित प्रतिकारशक्तीचे फायदे काय आणि तोटे काय? आणि मुळात समूहाची प्रतिकारशक्ती म्हणजे नक्की काय? 

  समजा कांजिण्यांसारखा साथीचा रोग आहे. या रोगापासून दोन प्रकारच्या व्यक्ती ‘सुरक्षित’ आहेत : एक म्हणजे ज्यांना कांजिण्या पूर्वी होऊन गेल्या आहेत असे आणि दुसरे, ज्यांना लस मिळाली आहे असे. असे सुरक्षित, म्हणजेच ‘इम्युन’ असलेले लोक स्वतःही रोगग्रस्त होत नाहीत आणि इतरांपर्यंत रोग पोचवतही नाहीत. हे लक्षात घेऊन साथीचा रोग कसा पसरतो ते आपण चित्राद्वारे समजून घेऊ. एखाद्या समाजाचे प्रातिनिधिक चित्र म्हणून सोबत जोडलेले चित्र पाहू. यातील प्रत्येक ठिपका म्हणजे एक माणूस आहे, अशी कल्पना करा. ती व्यक्ती ज्या व्यक्तींच्या संपर्कात येत असेल त्या हिच्याशी एका रेषेमार्फत जोडलेल्या आहेत (ही मंडळी म्हणजे तिच्या घरचे लोक असतील किंवा शेजारी, किंवा रोजचा भाजीवाला वगैरे.) साथीचा रोग अशा जोडलेल्या व्यक्तींमार्फत पसरतो. सुरुवातीला कोणालाही हा रोग होऊ शकतो म्हणून सर्व ठिपके निळ्या रंगात दाखवले आहेत. ज्या कोणाला प्रत्यक्ष आजार होतो तो ठिपका लाल होतो आणि साथीच्या रोगानुरूप जोडलेल्या रेषांमार्फत एका व्यक्तीकडून दुसरीकडे पसरत जातो आणि ठिपके लाल लाल होत जातात. अर्थात आजार काही दिवसांनी बरा होतो. जे बरे झालेले लोक आहेत ते सुरक्षित आहेत आणि ते पिवळ्या रंगात दर्शविलेले आहेत. ‘पिवळ्या ठिपक्‍यां’ना पुन्हा रोग होणार नाही आणि ते इतरांकडे पसरवणारसुद्धा नाहीत. याप्रकारे सरतेशेवटी साथ निघून जाते जेव्हा कोणीही ‘लाल’ शिल्लक राहत नाहीत. त्या वेळी बहुतांश ठिपके सुरक्षित झालेले असले तरी काही निळे ठिपके तसेच राहिले आहेत. तसे पहिले तर त्यांना आजार होण्याची शक्‍यता होती; पण केवळ आजूबाजूचे बहुतांश लोक ‘सुरक्षित’ झाल्यामुळे या सुदैवी मंडळींपर्यंत रोग पोचू शकला नाही. हीच ती हर्ड इम्युनिटी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 थोडक्‍यात सांगायचे झाले तर समूहाची रोगप्रतिकारशक्ती म्हणजे समाजात मोठ्या प्रमाणात सुरक्षित झालेले लोक असल्यास काही असुरक्षित अशा घटकांचे आपोआप संरक्षण होते. मोठ्या प्रमाणात पोलिओसारख्या रोगांचे लसीकरण करण्याचे हेच कारण आहे. एकदा का समाज मोठ्या प्रमाणात सुरक्षित झाला की बाकी राहिलेल्यांना आपोआप संरक्षण मिळते. त्यामुळे चुकून जरी एखाद्याला रोग झाला तरी तो सर्वदूर पसरत नाही. दोन बाबी नमूद करणे गरजेचे आहे. पहिली म्हणजे समूहाची प्रतिकारशक्ती ही संकल्पना फक्त साथीच्या रोगांनाच लागू पडते (मधुमेह, रक्तदाब अशा रोगांना नाही), आणि त्याच साथीच्या रोगांना जे परस्पर संपर्कातून पसरतात. डेंगीसारखे जे इतर माध्यमांमार्फत पसरतात त्यांना हे लागू नाही.

आता ‘कोविड-१९’कडे वळू. ‘कोविड’वर अशी समूह प्रतिकारशक्ती वापरून मात करता येऊ शकते काय? स्वीडनने हा मार्ग अवलंबला, असे म्हणतात. अशा प्रतिकारशक्तीद्वारे आपण काही घटकांचे नक्कीच संरक्षण करू शकतो. उदाहरणार्थ, ज्यांना औषधे पचू शकत नाहीत किंवा काही कारणास्तव उपलब्ध होऊ शकत नसतील, त्यांच्यापर्यंत रोग पोचला नाही तर उत्तमच. पण ते साध्य करायला एकच मार्ग म्हणजे आजूबाजूची खूप सारी मंडळी ‘सुरक्षित’ असली पाहिजेत. मेख नेमकी इथेच आहे. दुर्दैवाने ‘कोविड’साठी अजूनही लस नसल्याने सुरक्षित (इम्युन) होण्याचा एकच मार्ग म्हणजे रोग होऊन जाऊ देणे! पण मग नेमक्‍या किती लोकांना ‘कोविड’ झाला म्हणजे पुरेसे आहे? तसे नक्की सांगणे कठीण आहे. मात्र गणितीय प्रारुपांद्वारे अंदाज बांधता येऊ शकतो. त्यानुसार, जवळजवळ २० टक्के लोकांना सामूहिक प्रतिकारशक्तीमार्फत रोग होण्यापासून वाचवता येते, असा अंदाज आहे. मग असे म्हणता येईल का की, नवजात अर्भक, अतिवयस्क, दुर्धर व्याधीग्रस्त अशासारख्या संवेदनशील घटक असलेल्या २० टक्के लोकांना आपण पूर्णपणे वाचवू शकतो? दुर्दैवाने नाही. नेमके कोणते २० टक्के वाचणार हे ठरवणे अवघड आहे, त्यासाठी समाजातील प्रत्येक जण कोणाशी कशा प्रकारे संपर्कात येतो, याची बारीक माहिती असणे गरजेचे आहे. पण ते जवळपास अशक्‍य आहे. शिवाय ८० टक्के लोक व्याधिग्रस्त होणार हेही ध्यानात घ्यायला हवे. अर्थात ‘कोविड’ची हीही खासियत आहे. यातल्या बहुतांश मंडळींना रोग झाला आहे, याची जाणीवही होणार नाही. तरीही रोग झालेल्यांपैकी फक्त एक टक्का लोकांना जीव गमवावा लागतो, असे मानले तरी पूर्ण लोकसंख्येच्या ०.८ टक्के लोक दगावण्याची शक्‍यता निर्माण होते. दुर्दैवाने भारताच्या बाबतीत ०.८ टक्के म्हणजे एक कोटीपेक्षाही अधिक! त्यामुळे कमीतकमी भारतासारख्या मोठ्या देशांनी तरी हा पर्याय न निवडणे हे शहाणपणाचे ठरेल. स्वीडनसारख्या देशात मुळातच लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता कमी असल्याने रोगाच्या प्रसारावर निसर्गतः मर्यादा येतात. त्यांनी लॉकडाउन केला नसला तरी लोकांना व्यक्तिगत अंतर ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिले तर त्यांच्याकडे झालेले मृत्यू हे अमेरिकेपेक्षाही अधिक आहेत. नुकतेच स्वीडनच्या आरोग्यतज्ज्ञांनी हे कबूल केले, की ‘हर्ड इम्युनिटी’पायी देशात बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागले आणि पुन्हा अशी वेळ आलीच तर वेगळा मार्ग शोधलेला बरा! 

(लेखकद्वय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन’मध्ये संशोधक आहेत.)