esakal | भाष्य : बदलांच्या प्रवाहातही बहरेल मराठी

बोलून बातमी शोधा

Marathi
भाष्य : बदलांच्या प्रवाहातही बहरेल मराठी
sakal_logo
By
भारत सासणे

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या एकसष्टीत मराठीच्या स्थितिगतीचा धांडोळा घेणेही आवश्यक आहे. मराठी भाषेचा, साहित्याचा आणि अस्मितेचा इतिहास प्राचीन आहे. आजवर अनेक बदल पचवूनही या गोष्टी टिकल्या. नजीकच्या काळात बदलांचा वेग वाढणार असला तरी भाषा ही बदलत्या स्वरूपात, जिवंत व प्रवाही म्हणून अस्तित्वात असेल.

भाषिकदृष्ट्या आणि साहित्याच्याही संदर्भात पुढच्या पन्नास वर्षांत महाराष्ट्र कुठे असणार आहे, याचा काही धांडोळा घेता येईल का? वर्तमानातून भविष्याकडे बघायचं ठरवलं तर आज आपण जे काही मिळवले आहे, त्यावरून त्यावरून येणाऱ्या उद्याकडे बघायचं आहे. अर्थात, हे बघणं भाषेच्या संदर्भातले असेल. साहित्याच्या संदर्भातले असेल. एका निमित्ताने आपण मराठी भाषेच्या संदर्भात एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. त्यात आपण पुरेसे पुरावे दिले. आपण असं दाखवून दिलं, की मराठी भाषा अभिजात भाषा असून, अडीच हजार वर्षांपासून बोलली - लिहिली जात आहे. जो प्रदेश ‘मारहरठ्ठ’ म्हणून ओळखला जातो, त्यात जी बोलली जाते ती ‘मारहरठ्ठी’ म्हणजे आजची मराठी. विद्वानांनी दाखवून दिलं की ‘पैशाची’ म्हणजे मराठीच. आज हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र शासनदरबारी पडून असला, तरी मराठी माणसाला पुराव्यांची गरज नसतेच. मराठी अस्मिता त्याच्या रक्तातून वाहत राहिलेली असते.

शंभर वर्षांपूर्वी आपलं म्हणून काही ‘भाषिक अस्तित्व’ होतं आणि शंभर वर्षांनंतर ते ‘भाषिक अस्तित्व’ काय राहणार आहे, याची मराठी माणसाला जाणीव असते आणि म्हणून त्याला पुराव्याची गरज नसते. भाषा पूर्णतः मृत होत नसते. भाषा पूर्णतः विस्मृतही होत नसते; पण भाषेमध्ये परिवर्तन अवश्‍य होत राहतं. आजची जी प्रौढ, सुघड, सौष्ठवपूर्ण अशी मराठी भाषा आहे, ती या ना त्या स्वरूपातील शंभर वर्षांपूर्वीचीच मराठी भाषा आहे. शिवकालीन मराठी अजूनही कुठे-कुठे बोलली जातेच. ज्ञानेश्‍वरीतली मराठी आजही समजते आहे. काल आपण जे काही जगलो, ते जगणं प्रवाहित होऊन आजच्या जगण्यातूनसुद्धा वाहत राहतं. पण मग उद्या?

आजची मराठी तरुणांची एक वेगळीच भाषा आहे. ती मराठी आहेही आणि नाहीही. ती इंग्रजी आहेही आणि नाहीही. त्यांच्या समस्या - भाषिक समस्या वेगळ्याच असतात. जे बोललं, सांगितलं जातं ते नेमकं त्यांना समजतंच असं नाही; पण त्यामुळे त्यांचं बिघडत पण नाही. त्यांनी त्यांचे शब्द शोधलेले असतात. त्यांची व्यक्त व्हायची पद्धत ही वेगळीच असते. ही मंडळी पारंपरिक पद्धतीने व्यक्त होत नाहीत. ही मंडळी पत्रं लिहीत नाहीत. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून ही मंडळी बोलतात, अभिव्यक्त होतात. यांचं म्हणून साहित्यही आहेच. ‘ब्लॉग लेखना’ला साहित्यप्रकार म्हणून मान्यता द्या, असं कुणीतरी म्हटलं होतंच. ही उद्याची चिन्हं आहेत.

ज्ञानाचं रूप पालटतं

आजच पर्यावरणवाद्यांनी ‘पेपरलेस बुक’ची कल्पना मांडली आहे. झाडं तोडून त्यापासून कागद बनवून त्यावर मजकूर छापण्याऐवजी प्रचंड मजकूर ‘इलेक्‍ट्रॉनिकली’ संकलित करून उपलब्ध करावा, अशी ती संकल्पना. आज ‘ई-बुक’ या नावाने ही संकल्पना रुजू पाहते आहे. आजपासून ५० वर्षांनंतर ग्रंथ-व्यवहार आणि साहित्य-व्यवहार प्रभावित झालेला असणार. तो वेगळ्या स्वरूपात रूढ झालेला दिसणार आहे; पण पुस्तकांचं, ग्रंथांचं आकर्षण स्मृतीस्वरूपात कायम राहील. तसं ते कायम राहतच असतं. आजदेखील प्राचीन आणि दुर्मिळ ग्रंथांचा शोध घेणारे ‘कलेक्‍टर’ अस्तित्वात आहेत आणि त्यांनी काळानुरुप होणारा ‘कथित ऱ्हास’ काही अंशी थोपविलेला असतो. तशीच परिस्थिती तेव्हाही राहीलच. आजपासून ३० वर्षांनी जन्मणारी पिढी त्यापुढील ३० वर्षांत जे-जे भोवताली प्राप्त आहे ते स्वीकारून काळाच्या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सिद्ध असणार आहे. त्यांच्याभोवती त्या वेळेस काय असणार आहे?

उदाहरणार्थ, सद्यस्थितीत नव्या पिढीने ‘महाभारत' हा ग्रंथ मुळातून वाचला नाही. तो सोप्या आणि रंजक पद्धतीने आणि काहीएक आविर्भावातून नव्या पिढीला ‘कॉमिक्‍स’ आणि टीव्ही मालिकेच्या माध्यमातून सांगावा लागला. हेच झालेले संस्कार ही पिढी पुढे चालवीत नेणार. ५० वर्षांनी अस्तित्वात आलेली विशी-पंचविशीची तरुण पिढी याच संस्कारावर पुढे जाणार आहे. त्यांनी हा ग्रंथ वाचलेला नसणार; पण ज्ञान विस्मृत तर होत नसतंच. ज्ञानाचं रूप पालटतं. संस्थात्मक पातळीवर, आधुनिक तंत्राच्या आधारे संस्कृतीविषयक ग्रंथांचा अभ्यास मात्र त्याही वेळेला सखोल पातळीवर पोचला असण्याची शक्‍यता आहे आणि म्हणून अस्मिता वाहत राहते, ज्ञान हस्तांतरित होत राहतं म्हणून महाराष्ट्रही नव्या रूपानं नव्या झळाळीनं उभा राहिलेला दिसेल.

पन्नास वर्षांनी भाषिक वातावरण काय असेल महाराष्ट्रातले? कोणतं साहित्य वाचलं - लिहिलं जाईल? उद्याची भाषा मराठी असणार आहेच; पण ती वैश्‍विक असेल. लवचिक असेल. कदाचित वेगळ्याच सामर्थ्याने उभी राहिलेली असेल. आजची विशीची मंडळी तेव्हा सत्तरीची असतील. त्यांना ‘पसायदान’ माहीत असेल, पण पाठ नसणार. त्याची त्यांना गरजही वाटलेली नसणार. दरम्यानच्या काळात आणि तेव्हाची विशीतली मुलं वेगळीच असतील. त्यांच्या जाणिवा जास्त व्यापक आणि वैश्‍विक असणार आहेत. पण तंत्रज्ञान विकसित झालं असल्यामुळे नखभर जागेत प्रचंड ज्ञान संकलित करून ठेवलेलं असणार. ज्ञानाचं जतनही केलं जाईल. बहुभाषिक समाज अस्तित्वात आलेला असेल. आज ‘इंग्रजी, मराठी, हिंदी’ पुरतंच ज्ञान समाजात सीमित आहे. तेव्हाचा समाज जास्त भाषा जाणणारा आणि जास्त भाषा बोलणारा असेल. यातून साहित्याचं स्वरूपही बदललेलं असणार आहे. पण अस्मिता मात्र वाहत राहिलेली असेल.

बदलांचा स्वीकार

अस्तित्वाची जाणीवही वाहत राहतेच. लोकस्मृतीतून अभिजात असं जे आहे, चांगलं म्हणून जे आहे ते वाहत राहीलच. या वहनातून मराठी टिकून राहणार, जिवंत राहणार. या वहनातून ‘मराठीपण’ टिकून राहणार. म्हणून महाराष्ट्रही टिकून राहणार. पन्नास वर्षांनंतर अभिजात साहित्य टिकून असेल. भाषा ही बदलत्या स्वरूपात, जिवंत व प्रवाही म्हणून अस्तित्वात असेल. मराठी माणूस मराठी अभिमानाने ताठ उभा असेल आणि महाराष्ट्रही. भाषा मृत होत नसते; बदलते फार तर आणि अस्मिता अखंड प्रवाहित होत राहिलेली असते. पण होणारे बदल येऊ घातलेत; ते स्वीकारावे लागतील.

( लेखक साहित्यिक आहेत.)