भाजप, काँग्रेसची शक्तिपरीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पंजाब आणि गोव्यातील निवडणुकांना हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची पार्श्‍वभूमी आहेच. शिवाय, सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचेही अनेक प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत.
 

पंजाब आणि गोव्यातील निवडणुकांना हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची पार्श्‍वभूमी आहेच. शिवाय, सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचेही अनेक प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत.
 

नव्या वर्षात देशातील पाच राज्यांत होऊ घातलेल्या पहिल्या-वहिल्या निवडणुकांचा नारळ हा उद्या (शनिवारी) पंजाब आणि गोव्यात होणाऱ्या मतदानाने वाढवला जाणार आहे. या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेशातील निवडणुका या सर्वार्थाने लक्षवेधी असल्या, तरीही पंजाब आणि गोव्यातील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून, त्याचे प्रमुख कारण हे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सुसाट सुटलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला तिथे कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, केवळ यापुरत्याच या निवडणुका आगळ्या-वेगळ्या ठरलेल्या नाहीत; कारण मोदी यांच्या उदयानंतर सातत्याने दारूण पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसला याच दोन राज्यांतील निवडणुकांच्या निमित्ताने काही हाती लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पंजाबात गेली दहा वर्षे सत्तारूढ असलेल्या अकाली दल-भाजप यांच्या आघाडी सरकारपुढे काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षासारख्या छोट्या पक्षाने कडवे आव्हान उभे केले आहे. तर गोव्यात ऐन निवडणुकांच्या तोंडावर एकेकाळचे कट्टर स्वयंसेवक सुभाष वेलिंगकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडून ठोकलेल्या शड्डूमुळे संघपरिवारातील मतभेदांची लक्‍तरे चव्हाट्यावर आली होती. त्यातच आता महाराष्ट्रात भाजपची विधुळवाट लावण्यासाठी भात्यातील सर्व बाण काढून सज्ज झालेली शिवसेना, तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांची आघाडी, भाजप आणि विशेषत: संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापुढे नसते दुखणे म्हणून उभी राहिली आहे. गोव्यातील या लढाईत बहुमत टिकवणे हे भाजपपुढे आव्हान आहे.  

पंजाब आणि गोव्यातील निवडणुकांना हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची पार्श्‍वभूमी आहेच. शिवाय, सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचेही अनेक प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. अकाली-भाजप यांच्या प्रकाशसिंग बादल सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या राजवटीत पंजाबात अमली पदार्थ मुक्‍तपणे उपलब्ध होऊ लागले आणि तोच तेथील निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनला आहे. गोव्यात शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न वेलिंगकर यांनी ऐरणीवर आणला असला तरीही तेथील कॅसिनो आणि त्याचबरोबर परदेशी प्रवाशांचा काही प्रमाणात ‘ड्रग्ज’ घेऊन सुरू असलेला गदारोळ यामुळे या सुवर्णभूमीला काही प्रमाणात कलंक लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर पंजाबातील तरुण मतदारांनी घेतलेली ड्रग्जविरोधी भूमिका आश्‍वासक आहे. पंजाबी तरुणांना आता कोणत्याही प्रकारे टीव्ही वा मोबाइल फोन वा अन्य इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌स राजकीय पक्षांकडून फुकटात नको असून, त्यांना मोफत दर्जेदार शिक्षण हवे आहे! शिक्षण आणि त्यातही कौशल्याधारित शिक्षणाची पंजाबात वानवा असून, त्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. नोकऱ्या नाहीत, म्हणून त्यांच्याकडे भरपूर मोकळा वेळ आहे आणि या वेळेचा दुरुपयोग ते ड्रग्जच्या नशेसाठी करत आहेत. नेमका हाच मुद्दा काँग्रेस तसेच ‘आप’ पंजाबात ‘कॅश’ करू पाहत आहे.

त्यातच कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या मदतीला आता नवज्योतसिंग सिद्धू यांची फटाकडी बोलकी तोफ येऊन दाखल झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला पहिला-वहिला विजय पंजाब मिळवून देऊ शकतो, असे काँग्रेसला उत्साहित करणारे वातावरण तयार झाले आहे. निवडणूकपूर्व पाहणी अहवाल हेच सांगत आहेत. यात ‘आप’ किती मजल मारणार आणि काँग्रेसला बहुमतापासून रोखणार काय हा लक्षवेधी मुद्दा असेल.

गोव्यातील निवडणूक ही खऱ्या अर्थाने भाजपपेक्षा पर्रीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच त्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी धुराळा उडवून दिला आहे. ‘निवडीचे स्वातंत्र्य असते तर संरक्षणमंत्रिपदापेक्षा आपण गोव्याचे मुख्यमंत्रिपदच पसंत केले असते!’आणि ‘कोणी पैसे दिले, तर अवश्‍य घ्या!’ अशी मुक्‍ताफळे त्यांनी प्रचारात उधळली. शिवसेना आणि ‘आप’ यांनीही आरोपांची राळ उडवून दिल्याने एरवी सुशेगात असलेल्या या राज्यात एकच धमाल सुरू आहे. पंजाबात ‘आप’साठी मोठ्या प्रमाणात परदेशस्थ शीख समाज एवढ्या मोठ्या संख्येने का अवतीर्ण झाला आहे, हाही प्रश्‍न अनेकांना डाचत आहे. २०१४च्या निवडणुकीत ‘आप’चे चारही खासदार पंजाबातूनच निवडून आले होते. पुढे त्यापैकी कोणी केजरीवाल यांच्याबरोबर राहिले नाहीत, हे खरे; मात्र पंजाबात ‘आप’ला असलेला पाठिंबा बघूनच केजरीवाल जातीने प्रचारात उतरले असून, त्यांना भाजप व काँग्रेसनेही लक्ष्य केले. पंजाबच्या निवडणुका हा  राहुल गांधी यांच्यासाठी राजकीय प्रवासातील मैलाचा दगड ठरू शकतो. समजा काँग्रेसने पंजाब जिंकला तर राहुल यांच्यासाठी साजरे करण्याजोगे ते पहिलेच लक्षणीय यश असेल. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्याबरोबर त्यांनी केलेली आघाडीही भाजपसमोर आव्हान बनते आहे. त्यामुळेच या दोन राज्यांचा कौल कोणता हे भाजप आणि काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेच, पण दिल्लीबाहेर पसरू पाहणाऱ्या ‘आप’ची ताकदही जोखणारे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp congress power presentation