एकाधिकाराकडून लवचिकतेकडे

लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकांच्या निकालांनी भाजपला आणि विशेषत्वाने मोदी-शहांना मोठा धक्का दिला आहे.
bjp nda form modi cabinet govt over victory in lok sabha election 2024
bjp nda form modi cabinet govt over victory in lok sabha election 2024Sakal

- विकास झाडे

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपला जमिनीवर आणले आहे. यावेळी भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मदतीशिवाय सरकार चालवणे शक्य नाही. आतापर्यंत एकाधिकारशाहीने सरकार चालविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवे सरकार चालवताना किती लवचिक होतात तेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत आली आहे. परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये भाजप बहुसंख्येत असल्याने अन्य मित्रपक्षाला दुय्यम वागणूक मिळत गेली. सरकार ‘एनडीए’चे असले, तरी ते भाजपचे सरकार म्हणून ओळखले गेले.

मोदी-शहांच्या भूमिकेमुळे सहकारी पक्ष दूर होत गेले. काही पक्षांचे तुकडे करण्यात भाजपला यश आले. राजकारणाचा चिंधीबाजार करणाऱ्या भाजपला मतदारांनीच आता जमिनीवर आणले आहे.

यावेळी भाजपला एनडीएतील घटक पक्षांच्या मदतीशिवाय सरकार चालवणे शक्य नाही. आतापर्यंत एकाधिकारशाहीने सरकार चालविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवे सरकार चालवताना किती लवचिक होतात तेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. स्वभावात बदल झाला नाही, तर सत्तेतून कडेलोट होण्याची शक्यताच अधिक असेल.

लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकांच्या निकालांनी भाजपला आणि विशेषत्वाने मोदी-शहांना मोठा धक्का दिला आहे. ‘चारशे पार’च्या घोषणा करणाऱ्या मोदी यांच्या आशा कलचाचण्यांनी (एक्झिट पोल) पल्लवित केल्या होत्या.

ता. एक जूनला मतदानाचा शेवटचा टप्पा आटोपल्यानंतर जी मतदानोत्तर कलचाचणी झाली, ती म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ यासारखी होती. एकापेक्षा एक सरस आकडे आले, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार या आकड्यांमागील मोदींच्या सुरस कथा सांगू लागले.

मात्र, हा आनंद चार जूनला दुपारपर्यंतच कसाबसा टिकू शकला. निकाल लागल्यानंतर सगळ्याच भविष्यकार संस्था आणि व्यक्तींचा ढोल फुटला. मोदी पुराण सांगणाऱ्या टीव्ही पत्रकारांचे चेहरेही पडले. ‘कलचाचण्यांच्या आकड्यांनी देशातील लोकांचा घात केला’, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या मते हे बनावट ‘एक्झिट पोल’ होते.

मोदी आणि शहा यांनी त्यांच्या मुलाखतींतून ४ जून रोजी भाजप विक्रमी आकडा गाठणार असल्याने शेअर बाजारही विक्रमी उच्चांक गाठेल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे लोकांनी शेअर्स खरेदी केले. प्रत्यक्षात निकालांनंतर शेअर बाजार कोसळला.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा ३० लाख कोटी रुपयांनी घात झाला. सेबीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या एका समूहाच्या मालकीच्या टीव्ही वाहिन्यांना मोदी आणि शहांनी मुलाखती दिल्यात. यामागे मोदी-शहांच्या हेतूवर प्रश्‍न उभे करीत राहुल गांधी यांनी संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशीची मागणी केली आहे.

कॉंग्रेसचा आकडा शंभरीनजीक गेल्याने राहुल गांधी पूर्ण जोशात आहेत. ते नव्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी कोणतीही संधी सोडणार नाहीत. याआधी त्यांच्या प्रश्‍नांना मोदींकडून जराही दाद दिली जात नव्हती.

संसदेत अतीच बोलतो म्हणून राहुल गांधींना संसदेतून आणि सरकारी घरातून बाहेर काढण्याचे काम भाजप आणि मोदी सरकारने केले. त्या पार्श्वभूमीवर २४० जागा जिंकूनही मनासारखे राज्य चालविता येणार नाही याची खंत मोदी यांना आहे. विरोधकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून संकट ओढवून घेणे त्यांना परवडणारे नसेल.

मोदी लाट नव्हतीच!

मोदी लाटेने याआधीच्या दोन लोकसभा निवडणुका जिंकल्या, यात दुमत नाही. सन २०१४ मध्ये गुजरात मॉडेल घेऊन आलेले मोदी मतदारांच्या मनांत वसले. नंतर २०१९ मध्ये मोदी सरकारला महागाई, रोजगार हे विषय आव्हान देणारे होते; परंतु पुलवामा हल्ल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे समीकरण बदलले.

मोदींनी तो राष्ट्रवादाचा मुद्दा केला. यात मतदारांनी भाजपला ३०३ जागांवर विजय मिळवून दिला. त्यानंतर आपण आता बलाढ्य आहोत हीच हवा भाजपमध्ये गेली. यंदाच्या निवडणुकीतही मोदी लाट असल्याचा प्रचार व्हायला लागला. या काळात राममंदिराची उभारणी झाली. वाराणसीचा कायापालट झाला.

हिंदुत्वाचा हुंकार भरण्यात आला. मुस्लिमांना शक्य तितके बाजूला ठेवले गेले; परंतु ज्या उत्तर प्रदेशच्या भरवशावर विश्वास व्यक्त केला जात होता, त्यानेच भाजपला पंक्चर केले. भाजपने २०१४ मध्ये ८० पैकी ७१, तर २०१९ मध्ये ६२ जागांवर विजय मिळवला होता.

यावेळी मात्र राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या जोडीने भाजपला जेरीस आणले. काही दिवसांपूर्वी मोदी वाराणसीतून ‘दस लाख पार’ करतील अशा बातम्या टीव्ही आणि वृत्तपत्रांतून झळकायला लागल्या. मात्र, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी मोदी यांना जोरदार टक्कर दिली.

मोदींनी २०१४ मध्ये ५ लाख ८१ हजार, तर २०१९ ला ६ लाख ७५ हजारच्या आसपास मते घेतली होती. यावेळी मोदी यांना जवळपास ६ लाख १३ हजार, तर अजय राय यांना ४ लाख ६० हजारांवर मते मिळाली. फक्त दीड लाख मतांनी मोदींना विजय मिळाला. दहा लाख मतांचे स्वप्न पाहणारे मोदी मतमोजणीत पहिले चार तास राय यांच्यापेक्षा मागे होते. खरे तर मोदींसाठी हाच मोठा धक्का होता.

अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यात आले; परंतु इथल्याच फैजाबाद मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. अलाहाबाद मतदारसंघातून १९८४ मध्ये अमिताभ बच्चन निवडणूक जिंकले होते. त्यानंतर आता कॉंग्रेसला पहिल्यांदा विजय मिळाला. मोदी लाटेची जादू कुठेही चालली नाही.

विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी झाली, तेव्हा मोदी यांनी त्याचीही खिल्ली उडवली. प्रत्येक भाषणातून आणि मुलाखतीमधून ते या आघाडीचा उल्लेख ‘इंडी’ या नावाने करू लागले. भाजपचे अन्य नेतेही तसेच उच्चारू लागले.

काही वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनीही आकस ठेवत असाच शब्दप्रयोग केला. मतदारांनाही ते आवडले नाही. भाजपला शेवटी धडा मिळाला. एनडीएमधील ३८ पक्षांपैकी २३ पक्ष एकही जागा जिंकू शकले नाहीत.

सात पक्षांनी एक, तीन पक्षांनी दोन, लोकजनशक्ती पक्षाने पाच जागा जिंकल्या. नितीशकुमारांच्या जनता दल (संयुक्त)ने १२ आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने १६ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागांवर विजय मिळवला आहे. आतापर्यंत मित्रपक्षांची पर्वा केली जात नव्हती.

आता सगळ्यांचे लाड पुरवावे लागतील. गेली दहा वर्षे ‘मोदी सरकार, मोदी सरकार’ असा जप झाला; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान सदनात शुक्रवारी झालेल्या एनडीएच्या पहिल्या बैठकीत दर दोन मिनिटांनी ‘एनडीएचे सरकार, एनडीएचे सरकार’ असा राग आळवत होते.

या भाषणात ‘अमृतकाळ, राममंदिर, सीएए, एनआरसी, मुस्लिम आरक्षण’ या शब्दांचा उल्लेखही त्यांनी केला नाही. हा बदल नजरेत भरणारा आहे. ‘मोदी-३.०’ सरकार यशस्वी करण्यासाठी मोदींना स्वत:मध्ये बदल करावे लागणार आहेत. मोदी खरेच बदलतील का? हा खरा प्रश्‍न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com