अंदमान-निकोबार बेटांची अभ्यासपूर्ण भ्रमंती

अंदमान बेटांतील अगदी एकाकी अशा बेटावरील ओंगे (Onge) आणि जारवा (Jarawa) या टोळ्यांची माहिती या पुस्तकात आहे.
book The Last Island The Story of the Andamans and the Most Elusive Tribe in the World
book The Last Island The Story of the Andamans and the Most Elusive Tribe in the WorldSakal

- आ. श्री. केतकर

अंदमान आपल्याला माहीत असते सेल्युलर जेलमुळे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ पुस्तकामुळेही अनेकांना अंदमानविषयी कुतूहल वाटते. साधारण तीनशे बेटांचा हा समूह भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून तेराशे किलोमीटर अंतरावर आहे.

नेताजींनी या बेटसमूहाला ‘स्वराज्य बेटे’ म्हटले होते. एकेकाळी या बेटांना ‘काळे पाणी’ असेही म्हटले जाई. तेथे आजही काही मोजक्या आदिम जमाती जगापासून दूर राहून त्यांचे वैशिष्ट्य जपून आहेत. ॲडम गुडहार्ट यांनी दोन दशकांच्या अंतराने त्याला भेट देऊन पुस्तक लिहिले आहे.

अंदमान बेटांतील अगदी एकाकी अशा बेटावरील ओंगे (Onge) आणि जारवा (Jarawa) या टोळ्यांची माहिती या पुस्तकात आहे. या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ही बेटे मुख्य भूमीपासून तशी अलिप्तच होती.

इसवीसन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर प्रथमच येथे ‘रॉस’ बेटावर वसाहत निर्माण केली गेली. त्या युद्धातील कैद्यांना तेथे इतर गुन्हेगारांबरोबर येथील तुरुंगात ठेवले होते. ब्रिटिशांनी या बेटांवर पाऊल टाकल्यापासून येथील रहिवाशांनी बाह्य जगताशी संपर्क ठेवणे टाळले.

पुस्तकाची सुरुवात सेंटिनल बेटाचा शोध लागला तेव्हापासूनच्या इतिहासाने होते आणि संपूर्ण अंदमानमध्येच एक वसाहत स्थापण्याच्या ब्रिटिशांच्या प्रयत्नाचा एकूणच या बेटांवर कसा परिणाम झाला, याचे वर्णन येते.

येथील ब्रिटिश आणि अनेक देशांतील संशोधकांनी स्थानिक टोळ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न कसे केले, हे सांगून सध्याची तेथील परिस्थितीही लेखकाने वर्णन केली आहे. ब्रिटिशांनी या बेटांवरील आदिम रहिवाशांना ‘सुसंस्कृत’ करण्याचा प्रयत्न केला; पण तो कसा फोल ठरला, हे सांगितले आहे. हा प्रबंध एखाद्या साहसकथेप्रमाणे लालित्यपूर्ण वाटतो.

गुडहार्ट यांनी प्रथम १९९८ आणि नंतर २०२० मध्ये अंदमानला भेट दिली होती. या भेटींदरम्यानच्या काळात तेथे झालेल्या बदलाची नोंदही त्यांनी घेतली आहे. या बेटांचा शोध लागला तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने त्यांचा इतिहास सुरू झाला, असे लेखक म्हणतो.

सेंटिनलीज लोकांबाबतच्या कुतूहलापासून ते आता पाण्याखालून ऑप्टिक फायबर केबल्स टाकल्या गेल्या, तोपर्यंतचे बदल पुस्तकात वाचायला मिळतात. अभ्यासू मानववंशशास्त्रज्ञांप्रमाणे काहीजण आदिमानववंशीय लोक पाहण्याच्या कुतूहलापोटी येथे येतात.

महत्त्वाचे म्हणजे देशभक्त स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या येथील तुरुंगातील वास्तव्यामुळे जणू काही तीर्थस्थान बनलेले मध्यमवर्गीय पर्यटकांचे आवडते स्थळ कसे झाले आहे, हे लेखक ओघवत्या शैलीत सांगतो.

त्यामुळेच मूळ रहिवाशांना त्यांची संस्कृती जतन करण्याचा अधिकार असायला हवा. सक्तीने त्यांच्यात सध्याच्या मूल्यांनुरूप बदल घडवण्याचा प्रयत्न न करता त्यांच्या पद्धतीनेच बदलाचे स्वातंत्र्य द्यावे, असे लेखक म्हणतो.

लेखकाला सेंटिनलीज लोकांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधता आला नाही. तरी त्याने अंदमानमध्ये बराच काळ घालवून त्या भागाचा अनुभव घेतला, तेथील टोळीवाल्या रहिवाशांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या.

सुरुवातीच्या वसाहत स्थापण्याच्या प्रयत्नांचा आणि अलीकडच्या काळातील जागतिकीकरणाचा या बेटांवर कसा परिणाम झाला आहे, हे त्याने सांगितले आहे. अंदमान आणि निकोबार बेटे आणि विशेषत: सेंटिनेल बेट हे ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या धोरणाशी जोडले गेले आहे.

तेथील रहिवाशांबाबतची त्यांची वृत्ती आणि त्यांची या लोकांबाबतची भूमिका याचा या मूलवासीयांवर अगदी जाणवण्याइतका खोल परिणाम झाला आहे. सेंटिनेल टोळ्यांबद्दलची माहिती वाचणे हा वेगळाच थरारक अनुभव आहे.

त्याबरोबरच आता जगापासून कटाक्षाने दूर राहिलेल्या या लोकांना त्यांच्या कोशातून जबरदस्तीने बाहेर काढले जात असल्याचे वाचत असताना लेखकाच्या वेदना आपणही अनुभवतो. आता ते साऱ्या जगाला माहीत झाले आहेत आणि याचे परिणाम काय असतात ते ठाऊक असल्याने आपण चिंतीत होतो. हे या पुस्तकाचे यश. लेखकाने बरेच संशोधन केले.

मॉरिस पोर्टमन या इंग्लिश अधिकाऱ्याच्या खासगी नोंदी ब्रिटिश पुराभिलेख संग्रहालयामधून मिळवून त्या आधारे पोर्टमन यांचे परिणामकारक व्यक्तिचित्र उभे केले आहे. गुडहार्ट यानी लेखनात अशा साऱ्या सामुग्रीचा वापर केला आहे आणि त्यात नर्मविनोदाची खुमारीही आहे.

द लास्ट आयलंड : द स्टोरी ऑफ द अंदमान्स अँड द मोस्ट एल्युझिव्ह ट्राइब इन द वर्ल्ड

लेखक : ॲडम गुडहार्ट; प्रकाशक : जगरनॉट

पाने : २३६ किंमत : ६९९ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com