ढिंग टांग! दुर्भिक्ष्याची आर्जवे! 

ब्रिटीश नंदी
सोमवार, 13 मे 2019

ढिंग टांग! दुर्भिक्ष्याची आर्जवे! 

किती पाहसी रे किती अंत आता 
पुरे ना अनंता तुझे खेळणे 
असे काय आम्ही कुठे पाप केले 
सेवेत बा काय राही उणे 

माथ्यावरी रोज अस्मान फाटे, 
सत्तेत सुलतानही माजला 
पोटावरी एक मारी तडाखे, 
आसूड पाठीवरी वाजला 

कुणी पेरिला गा शिवारात माझ्या 
असा नष्ट अवकाळ फोफावला 
बियाणेच सारे विषारी निघाले 
अनायास दुष्काळ सोकावला 

सुरु आमुची रोजची रे लढाई 
खलाटीस गेले करंटे जिणे 
कसे बाळगू म्या हत्त्यार बापा 
कुडी वाहिली तूस चिंतामणे! 

आधीचे निघाले, नव्यानेहि आले 
तारेवरी डोलती कावळे 
तरीही निघे पिंड अस्पृश्‍य माझा, 
चोचीविना जीव हाही जळे! 

भाळी असे हे आभाळ आले 
कुणी विंधले, जीर्ण अन फाटके 
सटवाईच्या संहितेतून होती 
साकार दु:खार्त ही नाटके 

नभालाच आली जिथे गा बकाली 
तिथे जीविते रे टिकावी कशी? 
जगण्यातल्या येरझारेत बापा 
कितीदा पडू म्या असे रे फशी? 

कशापायी केले मला तू असे रे 
जाहलो ना असा कास्तकार 
भेगाळले रान, शुष्कावलेले 
आटे जीवनाची अंतिम धार 

डोळ्यांपरी खोल विहिरीत माझ्या 
खडकेल हंडा रिकामा परी 
रक्‍ताळले पाय, छाती फुटे बा 
पाण्याविना काय नेऊ घरी? 

मौनातले गाव ओसाड झाले 
इथे श्‍वास उच्छ्वास होती मुके 
चौकामध्ये रांग ती बादल्यांची 
हापशीस येती सदा आचके 

कुठे रावराण्या, नुरे थेंब काही 
जगातले काय संपे जळ? 
सभोवार येथे धुळीचे उसासे 
तरी श्‍वास उच्छ्वास ये निर्बळ 

इलाख्यातले लुप्त झाले जिव्हाळे 
तळ्याच्या बुडाशी हाडेकातडी 
गिधाडांस येथे मिळे मेजवानी 
निष्पर्ण वृक्षावरी मेलडी 

खुंटावरी बैल बसला, उठेना 
चघाळा न येतो मुखाशी कधी 
हाडेकातडेही न उरले कुडीला 
कशी गा टळावी अशी ही बदी 

तुझे काय जाते अनंता तुला रे 
मिळे सर्व वैकुंठ भोगावया 
कंठून दावी क्षण दोन येथे 
म्हणणार नाहीस- जितं मय:! 

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य माझे 
नको पाहू आता पुरे बा पुरे! 
थकली कुडी ही, निघे प्राण माझा 
ऊर्मी जीवाची आता ना उरे 

कृपाळूपणे येई गावात माझ्या 
पखाली पखाली पाण्यासवें 
भिजो सृष्टी नाथा, पिको भूमी आता 
चरणी तुझ्या रे करी आर्जवे 

- ब्रिटिश नंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: British Nandi Write Dhing tang article in sakal