ढिंग टांग : कर्तृत्ववान पुरुषाची लक्षणे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

competent person

ढिंग टांग : कर्तृत्ववान पुरुषाची लक्षणे!

प्रिय, तुझ्याशी संवाद साधण्याचा मी काही दिवस बराच प्रयत्न केला. पण दर वेळी तू मोबाइल फोनमध्ये डोके घालून बसला होतास. आता तर काय, आयपीएलचा उत्सव सुरु होणार असल्याने तुला वेळ मिळणार नाही! म्हणून हे पत्र लिहीत आहे. व्हाटसॅप करीन, काळजी करु नकोस! हल्लीच्या मुलांना कागदावरील मजकूर कुठे वाचता येतो? तेव्हा सावकाश वाच...

तू खूप मोठा व्हावास असे मला पालक म्हणून वाटते. तुला मिसरुड फुटले आहे! या वयात आमचे वडील मुस्कटात भडकावून जे काही असेल ते सांगत असत. किंवा काहीही सांगत नसत. मी काही तुझ्या मुस्कटात भडकावणार नाही. मागल्या खेपेला मी नुसता हात उगारला, तर माझ्या डोक्यावर मोबाइल फोनचा चार्जर आदळला होता. तो तुझ्याकडून आला की तुझ्या आईच्या दिशेने हे अजूनही ध्यानात आलेले नाही.

माझी काही स्वप्ने अपूर्ण राहिली. मला दोन खोल्यांचा ब्लॉक घ्यायचा होता. त्यावरुन आजही मी तुझ्या आईचे टोमणे निमूटपणे खात असतो. एका भविष्यवाल्याने माझ्या कुंडलीत ‘चार चाकीचा योग आहे’ असे सांगितले तेव्हा तुझी आई कुचकट हसली होती, ते मी विसरलेलो नाही. मला एक शेतघरही विकत घ्यायचे होते. कुंडीत कोबीची लागवड करुन चारेक कोटी रुपयांचे उत्पन्न घ्यायचे होते. मला हाडाचा शेतकरी व्हायचे होते. मगर...मगर वह हो न सका!

तू फार शिकू नयेस, एवढी किमान अपेक्षा मात्र आहे. शिकून खर्च तेवढा होतो! शेजारच्या गणपुल्यांचा छब्या इंजिनीअर झाला. परवा अगरबत्त्यांचे सँपल द्यायला आला होता. नवा व्यवसाय सुरु केला म्हणाला! डॉक्टर व्हायचे म्हंजे फार खर्च होतो. त्यापेक्षा तू राजकारणात

जा!! तेथे बारा महिने सुगी असते. शिक्षणाची अट नाही की काही नाही. अक्षरश: वर्ष दोन वर्षात सर्व स्वप्ने पूर्ण होतील! हल्ली राजकारणी मंडळींकडील पैशाची बरीच चर्चा होत असते. दहा-दहा मजली बंगले!! परवा आपल्या प्रभागातील नगरसेवक मा. बंटीभाऊ भेटले होते. त्यांच्याकडे इडीचे तपास अधिकारी येणार आहेत, अशी वावडी त्यांनीच उठवून दिली आहे. ‘पब्लिकमध्ये भाव वाढतो’ असे त्यांचे म्हणणे. तेही खरेच आहे. इडी किंवा आयटीचे छापे पडले नाहीत, तर त्या नेत्याला साइडलाइनलाच जावे लागते. माणसाने कसे कायम आघाडीवर राहावे!!

माझे तुला खूप खूप आशीर्वाद आहेत. सदगदित होऊन इतकेच सांगतो की, ‘‘मुला, एवढा मोठा हो की इडीचे अधिकारी दर महिन्याला तुझ्या घरी येऊन झडत्या घेतील! तुझ्या कर्तृत्त्वाचा पाढा साक्षात फडणवीसनाना सभागृहात पेन ड्राइव्हवर सादर करतील! तुझ्या प्रत्येक ब्यांक अकौंटमधल्या रकमा दररोज वर्तमानपत्रात जाहीर होतील! तुझ्या प्रॉपर्टीच्या जागा साक्षात सोमय्याजी टीव्हीवर हिंडून दाखवतील! तुझ्यावरील कारवायांखातर प्रेस कॉन्फरन्स होतील! तुझा ‘बाइट’ मिळवण्यासाठी टीव्ही च्यानलांचे पत्रकार सकाळी आठ वाजल्यापासून तुझ्यामागे धावतील!...असा आदर्श कर्तृत्त्ववान पुरुष तू व्हावास, हीच माझी शुभेच्छा.

आलिशान शेतघराच्या हिरवळीवर बसून मी लस्सी पितो आहे, असे स्वप्नदृश्य माझ्या नजरेसमोर तरळते आहे. करशील ना पूर्ण? फेडशील ना पांग? ‘जीवनात माझ्या मुला, उंच मार उडी, दारी येवो मंगल माझ्या आयटी आणि इडी!’ एवढेच मागणे आहे. अनेक उ. आ. तुझाच बाप.

टॅग्स :Editorial Article