‘मार्क्‍स’वंतांना शुभेच्छा! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मे 2019

बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. आपल्याला ज्ञानार्थी घडवायचे आहेत, की निव्वळ परीक्षार्थी, याचाही विचार करायला हवा.

बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. आपल्याला ज्ञानार्थी घडवायचे आहेत, की निव्वळ परीक्षार्थी, याचाही विचार करायला हवा.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ‘सीबीएसई’तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या यंदाच्याही निकालाचे वर्णन ‘घवघवीत’ आणि ‘घसघशीत’ अशा शब्दांतच करावे लागेल. यंदा या मंडळाच्या बारावीच्या निकालाची देश पातळीवरील सरासरी ८३.४० टक्के आहे. महाराष्ट्राचा समावेश या मंडळाच्या चेन्नई विभागात होतो. त्याची सरासरी तर ९२.९३ टक्के एवढी आहे. या सर्व विद्यार्थ्यांबरोबरच अन्य दहा लाख उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचेही हार्दिक अभिनंदन ! त्यांचे यश महत्त्वाचे आहेच; परंतु गुणांचे उच्चांक क्षणभर विचार करायला लावणारे आहेत. एकेकाळी पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणे म्हणजे यशाची परिसीमा असे. आज त्या वर्गाची अवस्था मुंबईतील लोकलच्या पहिल्या वर्गासारखी झाली आहे. भरपूर गर्दी असते तेथे. त्यामुळे हल्ली पालकही आपल्या मुलाने पहिला वर्ग मिळवू नये, अशीच प्रार्थना करीत असतात. त्यांना हवे असतात ९० वा ९५ टक्‍क्‍यांच्या पलीकडचे गुण. ‘सीबीएसई’च्या निकालात यंदा तसे गुण मिळवणाऱ्या परीक्षार्थींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान २७ हजारांनी वाढली आहे. त्यांनी गेली किमान दीड-दोन वर्षे आपल्या पाल्याबरोबर केलेला अभ्यास, उपसलेले कष्ट, स्वतःच्या आवडी-निवडींना घातलेली मुरड यांचे हे यश आहे. घरात दीड-दोन वर्षे टीव्हीचे कार्यक्रम पाहण्यावर बंदी असणे, हे किती कष्टमय जीवन आहे याची दहावी-बारावीग्रस्त पालकांशिवाय इतरांना कल्पना येणार नाही. त्यामुळे त्यांच्या पुढच्या शैक्षणिक संघर्षासाठी शुभेच्छा. त्याची त्यांना नक्कीच गरज असेल. याची दोन कारणे आहेत.

एक म्हणजे गुण आणि गुणवत्ता यांतील फरक. दहावी वा बारावी परीक्षेत गुण मिळतात. सर्वांची धाव सुरू असते ती त्या गुणांसाठीच. ते प्राप्त करण्याचे तंत्र आत्मसात करण्यासाठी. महाराष्ट्रात गुणप्राप्तीचे विविध ‘पॅटर्न’ उदयाला आले, ते या अश्‍वशर्यतीतूनच. या गुणांचा गुणवत्तेशी काही संबंध आहे की नाही, हे कोणी तपासून पाहिलेच नाही. एक खरे की, दहावी वा बारावीच्या परीक्षा म्हणजे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसारख्या चाळणी परीक्षा नाहीत. तेथे स्पर्धा परीक्षांचे निकष लावणे चूक असते. त्यामुळे त्यातील उत्तीर्णांचे प्रमाण वाढणे स्वाभाविकच आहे. आक्षेप आहे तो हे करताना निर्माण झालेल्या गुणफुगवट्याला. आजारपणात औषधे घेऊन अंगावर सूज चढावी, तसे या गुणांचे झाले आहे, हे किमान शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी तरी लक्षात घ्यायला हवे; परंतु त्यातीलच अनेक ‘मार्क्‍स-वादी’ गुणवत्तावाढीचे ढोल वाजवताना दिसतात. ही समाजाची दिशाभूल आहे. यातून काही पिढ्यांचे नुकसान आपण करीत आहोत, हे ध्यानी घेतले पाहिजे. बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, ते तेथे कितपत यशस्वी होतात याचा अभ्यास केला, तर हेच दिसेल की काही प्रज्ञावंत विद्यार्थी वगळता इतरांच्या नशिबात ठेचकाळणेच लिहिलेले असते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ‘घरोघरी ज्ञानेश्‍वर जन्मावेत,’ अशी अपेक्षा व्यक्त केली जात असे. ते जन्मू शकत नाहीत, याची कारणे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनविणाऱ्या आपल्या शिक्षण पद्धतीतच आहेत, हे मान्य करायला हवे. त्याचबरोबर हेही मान्य करायला हवे, की शिक्षणाची ही पद्धत समाजनिरपेक्ष नसते. ती सामाजिक गरजांतूनच निर्माण झालेली असते. खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी ही आपल्या समाजाची गरज आहे काय? मध्यंतरी ‘थ्री इडियट्‌स’ नामक चित्रपट सर्वांनी डोक्‍यावर घेतला होता. त्यातील त्या ‘विद्या-अर्थी’ नायकाप्रमाणे आपले पाल्य वागले, तर आपल्याला ते चालेल काय?
तसे कोणालाच नको असते, म्हणूनच आज या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छांची नितांत गरज आहे. बारावीनंतर काही महत्त्वाच्या ज्ञानशाखांत प्रवेश घेण्यासाठी त्यांना आणखी परीक्षा द्याव्या लागतात. त्याचे एक कारण बारावीतील हा गुणफुगवटा आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. या अशा भारंभार परीक्षा देऊन हे परीक्षार्थी पदवी महाविद्यालयांत जातील. त्यातील अनेक मळलेल्या वाटाच तुडवतील. हल्ली अभियांत्रिकीच्या मार्गात वाहतूक कोंडी झालेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश जेवढा कठीण, त्याहून कठीण असतो वैद्यकीयचा व्यवसाय सुरू करणे. ते अनेकांच्या परवडण्यापलीकडे असते. त्यामुळेच हल्ली बहुतेक ‘मार्क्‍सवंतां’चा प्रवास औषध निर्माणाकडे सुरू झालेला आहे. बंद पडलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत हल्ली फार्मसीची ‘दुकाने’ सुरू झाली आहेत. उद्या त्या फार्मसिस्टांचाही महापूर येईल; पण आज त्याचा विचार करताना कोणी दिसतच नाही. देशाला पुढील दहा-पंधरा वर्षांत कोणत्या क्षेत्रातील किती कुशल मनुष्यबळ हवे, हे पाहून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशमर्यादा नक्की करणे हा यावरचा एक उपाय असू शकतो; परंतु तसे केल्यास शिक्षणाचा बाजार कसा चालेल? आपले हे ‘मार्क्‍स-वंत’ त्या बाजाराचे ग्राहक. तेथे उद्या ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील; परंतु त्यानंतर...? त्यानंतरच्या काळासाठी या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना घसघशीत शुभेच्छा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cbse hsc result and education in editorial