बदलांचे स्वरूप जाणून घेऊया

chakor gandhi
chakor gandhi

वास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या बदलांचा वेग खूपच जास्त आहे. पालकांना मुलांविषयी काळजी वाटते. वर्षानुवर्षे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी भीतीची भावना असते. नोकरदारांनाही असुरक्षित वाटते. आजच्या घडीला गरज आहे, ती बदलांचे स्वरूप जाणून घेण्याची. याचे कारण जमाना बदल रहा है...
व्यापार, उद्योग, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, बॅंकिंग, दळणवळण, प्रवास- पर्यटन यातले कोणतेच क्षेत्र या प्रक्रियेतून सुटलेले नाही. दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहारांसाठी इंटरनेटचा होत असलेला वाढता वापर, सोशल मीडिया, अंगवळणी पडत असलेले वेगवेगळे ॲप्स, लहान होत चाललेली कुटुंबे, बदलत असलेली मूल्ये, वाढती स्पर्धा, वाढत्या आकांक्षा असे सध्या समाजाचे चित्र आहे. या बदलांचा आणि त्याच्या परिणामांचा जगभरच अभ्यास सुरू आहे. अलीकडे प्रचलित झालेला शब्द म्हणजे ‘मिलेनियल’. जी मुले १९८४नंतर जन्मलेली आहेत, ती आणि त्यांची पिढी यांना उद्देशून हा शब्द वापरला जातो. त्यांचे एक स्वतंत्र विश्‍व तयार झालेले दिसते. त्यांचा मोबाईल, त्यांचे बॅंक खाते, त्यांचे क्रेडिट कार्ड वगैरे. वाटून घेण्याची, इतरांना सामावून घेण्याची वृत्ती बरीच कमी झालेली दिसते. या पिढीतील अनेक जण लग्न करण्यासही उत्सुक नसतात. याचे कारण जबाबदाऱ्या घेण्याची तयारी नाही. त्यांच्या ग्राहक म्हणून गरजा खूपच वेगळ्या आहेत. विकत घेण्यापेक्षा घर भाड्याने घेण्याकडे बऱ्याच जणांचा कल होऊ लागला आहे. पूर्वी ‘पैसे वाचवा नि साठवा,’ हे तत्त्व मनात पक्के बिंबलेले असे. आता क्रेडिट कार्डचा अवलंब होत आहे. साहजिकच खर्च करण्यावर भर दिसतो. प्रत्येक गोष्ट हप्त्यावर घेण्याची प्रवृत्ती दिसते. दैनंदिन वापरातल्या वस्तू, हॉटेलमधील खाद्यपदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींची खरेदीदेखील ऑनलाइन होऊ लागल्याने रिटेल व्यापाराची सारी समीकरणे अक्षरशः उलटीपालटी होत आहेत. केवळ वस्तूंचीच खरेदीच नाही, तर एखादी रिक्षा-टॅक्‍सी स्थानिक प्रवासासाठी बुक करण्यापासून एखादी विमा योजना खरेदी करण्यापर्यंतचा व्यवहार डिजिटल होऊ लागला आहे. सोन्याचे दागिने वापरणे किंवा नुसते सोने घेऊन ठेवणे यापेक्षा इतर उपयुक्त वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सगळे काही झटपट झाले पाहिजे, असाही एक आग्रह दिसतो. त्यामुळे संयम, प्रतीक्षा करण्याची तयारी यांचा अभाव जाणवतो.

 वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यापार करणाऱ्यांना या बदलांचा, बदलत्या अभिरुचींचा अभ्यास करून स्वतःच्या व्यवसायात योग्य ते काळानुरूप बदल करावे लागतील. कुटुंबाच्या पातळीवर आणि सामाजिक पातळीवरही या बदलांचा विचार करायला हवा. समाजातील बुजुर्गांनी नव्या पिढीचे मानस समजावून घेतले पाहिजे. सगळे काही बिघडत चालले आहे, अशीच धारणा ठेवली तर त्यांना स्वतःला त्रास होईल आणि तरुणांनाही. ‘आमच्या वेळेला असे नव्हते’ असे ज्येष्ठ मंडळी नवीन पिढीला सांगतात, तर नव्या पिढीतील तरुण म्हणतात- ‘आम्ही तेच तर म्हणत आहोत, तुमच्या वेळचे आता सगळे बदलले आहे, त्यामुळे आमच्याकडूनही तुम्ही जुन्याच अपेक्षा करू नका.’
एकंदरीतच पूर्वीप्रमाणेच सर्व काही होत राहील, हा हट्ट सोडावा लागेल. दुसरे म्हणजे सगळे बदल अनिष्ट आहेत, असे मानू नये. लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा, आरोग्य, तंदुरुस्ती याविषयीची जागरूकता या चांगल्या गोष्टी नव्या पिढीत दिसताहेत. त्यांच्यासमोरची आव्हाने वेगळी आहेत आणि आनंद मिळविण्याच्या कल्पनाही. त्यांना समजावून घेऊयात. त्यांच्यावर भरवसा ठेवूयात. त्यांना ज्या गोष्टींमध्ये रस आहे, त्यात आपणही स्वारस्य दाखवूयात, असा निर्धार ज्येष्ठांनी करायला हवा. वाढलेले आयुर्मान ही आधुनिक वैद्यकशास्त्राची देणगी आहे. पण हा मिळालेला वेळ चांगल्या रीतीने व्यतीत करण्यासाठी उत्तम आर्थिक नियोजन आणि आरोग्यविमा ही काळाची गरज आहे. जमानाच बदलत असतो, तेव्हा समाजातील सर्वच घटकांना त्या बदलांच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी आपाल्या चालीरीतींना, स्वभावाला काही प्रमाणात मुरड घालावी लागते. त्यामुळेच काही बदल पचवावे, आत्मसात करावे लागतील. ते जमले तर जीवन किती सुंदर आहे, याचा नव्याने प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com