आंध्र,ओडिशातील ‘वादळ’

प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा एरवी प्रादेशिक पक्षांना बळ देतो. परंतु ओडिशात तोच मुद्दा भाजपने वापरला. आंध्रात चंद्राबाबूंच्या ‘वादळा’त जगनमोहन रेड्डी यांची सत्ता गेली.
Chandrababu Naidu andhra pradesh assembly poll result 2024
Chandrababu Naidu andhra pradesh assembly poll result 2024Sakal

ईशान्य भारतातील दोन राज्यांत सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत कौल देऊन जनतेने पुन्हा सत्तेवर आणले असले तरी ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन शेजारील राज्यांत मात्र सत्तापरिवर्तन घडवले आहे. मुख्यमंत्रिपदी दीर्घकाळ राहण्याचा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावरील ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा नवीन पटनाईक यांच्या सुमारे अडीच दशकांच्या कारकिर्दीला जनतेने रामराम ठोकला आहे.

भाजपने लावून धरलेला ‘उडिया अस्मिते’चा मुद्दा तेथे प्रभावी ठरला आणि जनतेने त्याला प्रतिसादही दिला. या सत्तांतराने इतिहासात पहिल्यांदा ओडिशामध्ये भाजपचे स्वबळावरील सरकार येईल.

शेजारील आंध्र प्रदेशात गेल्यावेळी आंदोलने, पदयात्रांद्वारे माहोल तयार करून सत्तेवर आलेल्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला चितपट केले. त्यांच्या पक्षाला १७५ सदस्यांच्या विधानसभेत केवळ अकरा जागा मिळाल्याने विरोधी पक्ष नेतेपदही मिळणार नाही.

अशी वेळ तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी एन.टी. रामाराव आले होते, तेव्हा काँग्रेसवर आली होती. राष्ट्रीय राजकारणापासून दुरावलेले तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांचे राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात यावेळच्या निवडणुकीने धमाकेदार पुनरागन करणारा कौल तेलुगू जनतेने दिला आहे.

ते रामाराव यांचेच जावई आहेत. नायडू यांच्या तेलुगू देसमने चित्रपटअभिनेते पवनकल्याण यांच्या जनसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्षाबरोबर ऐनवेळी केलेली आघाडी सगळ्यांच्याच पथ्यावर पडली. एकत्रित आंध्र प्रदेशचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि विभाजित आंध्रचे पहिले मुख्यमंत्री झालेल्या चंद्राबाबूंच्या राजकारणाला या निकालाने नवसंजीवनीच मिळाली आहे.

केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सत्तेत आणण्यासाठी भाजपला तेलुगू देसमसह संयुक्त जनता दलाचे नेते नितिशकुमार यांच्या सहकार्याची गरज आहे. त्यांच्याकडे विधानसभेतील सत्ताच नव्हे तर लोकसभेतील संख्याबळही लक्षणीय आहे. जगनमोहन रेड्डींनी मुख्यमंत्रिपदाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली.

मात्र प्रशासन हे सर्वांगीण विकासावर चालते, याचा त्यांना विसर पडला. पायाभूत सुविधांपासून ते औद्योगिकीकरण आणि त्याच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीची प्रक्रिया त्यांच्या काळात थंडावली. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अडचणीच्या काळात मदत करणारे रेड्डी राज्याच्या स्थापनेपासून अपेक्षित खास राज्याचा दर्जा मिळवू शकले नाहीत.

आंध्र कौशल्य विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना गजाआड केले होते. त्यामुळे जनतेत क्षोभ होता. जनभावनेचा अंदाज त्यांना आला नाही. चंद्राबाबूंना याचा राजकीय फायदा मिळाला.

ओडिशामध्ये नवीनबाबूंच्या बिजू जनता दलाचा भाजपबरोबरील आघाडीचा किरकोळ अपवाद वगळता सुमारे चोवीस वर्षे एकछत्री अंमल होता. अभिनव कल्याणकारी योजना त्यांच्या कारभाराचे वैशिष्ट्य. महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य अशा बाबतीत प्रभावी काम.

मात्र सातत्यपूर्ण सत्तेमुळे येणारा बेमुर्वतखोरपणा त्यांच्या पक्षीय सहकारी आणि मंत्र्यांमध्ये बळावला. सरकारी कर्मचाऱ्यांतील भ्रष्टाचार, गैरकारभाराने सरकारची प्रतिमा मलिन झाली. शिवाय, सत्ताधाऱ्यांविरोधात जनमतही तयार झाले.

त्याची किंमत मोजावी लागली. तथापि, भाजपच्या संकटसमयी नित्यनेमाने उभ्या राहिलेल्या नवीनबाबूंना सत्ताच्युत करायच्या उद्देशानेच भाजपने प्रचारयंत्रणा राबवली. उडिया अस्मितेला भावनिक साद घालत असतानाच नवीनबाबूंच्या छायेत सनदी अधिकारी आणि त्यानंतर त्यांचे पक्षीय सहकारी झालेल्या व्ही.के. पांडियन यांच्याविरोधात भाजपने प्रचाराची राळ उडवली.

मोदींसह भाजप नेत्यांनी सत्ताधाऱ्यांची केलेली कोंडी जनतेवर प्रभाव टाकणारी ठरली. त्यातच पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडाराच्या चावीचा उपस्थित केलेला मुद्दा आणि ओडिशातील संपत्ती तमिळनाडूच्या वाटेवर चालली अशा हाकाटीमुळे जनता भाजपच्या पाठीशी राहिली.

अर्थात, भाजपने अनेक सोयी-सवलतींची जाहीरनाम्यात केलेली घोषणाही त्यांचे बळ वाढवणारी ठरली. प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने एखाद्या राज्यात स्वतःसाठी पूरक वातावरण निर्माण करायचे आणि त्याच्या सहकार्याने रुजल्यानंतर त्याच पक्षाला आव्हान द्यायचे, हे भाजपच्या अलीकडील राजकारणाचे व्यवच्छेदक स्वरुप आहे. त्याची प्रचीती ओडिशात आली.

वडिलांच्या निधनानंतर अनुनभवी नवीनबाबूंनी बिजू जनता दलाचा व राज्याचा कारभार केला. पण एकखांबी नेतृत्व थकल्याने त्याची धुरा कोणाकडे हा प्रश्‍न निर्माण झाला. मूळचे तमीळ असलेले पांडियन त्यांची जागा घेऊ पाहात असताना त्यांना पक्षातून असलेला विरोध लक्षात घेऊन भाजपने त्याचेच भांडवल करत उपस्थित केलेला उडिया अस्मितेच्या मुद्दा भाजपला सत्तेचा सोपानापर्यंत नेणारा ठरला.

तैसे शब्दांचे व्यापकपण । देखिजे असाधारण ।

पाहतया भावज्ञा फावती गुण ।चिंतामणीचे ।.

— संत ज्ञानेश्‍वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com